“देवस्थान इनाम जमिनींवर डोळा?; गुरव समाजाचा कल्याणमध्ये एल्गार”
Eyes Set on Temple Endowment Lands? Gurav Community Launches Agitation in Kalyan
“हक्क, अस्तित्व आणि पुढच्या पिढ्यांचा प्रश्न”; प्रस्तावित कायद्याविरोधात संघटित लढ्याचा निर्धार
Rajendara C. Salkar, Portal, वृत्तवेध ऑनलाईन, May 24 Sun13.00 Pm.By सालकर राजेंद्र
कल्याण/कोपरगाव : “देवस्थान इनाम जमिनी या केवळ मालमत्ता नसून वाडवडिलांच्या सेवेची आणि त्यागाची ओळख आहेत. त्या हिरावण्याचा कुठलाही प्रयत्न सहन केला जाणार नाही,” असा तीव्र सूर कल्याण येथे झालेल्या गुरव समाजाच्या विशेष चिंतन बैठकीत उमटला. ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ (इनाम जमीन वर्ग ३) या प्रस्तावित कायद्याच्या पार्श्वभूमीवर गुरव समाज रायगड-ठाणे-मुंबई संस्थेच्या वतीने ही बैठक पार पडली.
कल्याण येथील श्री हनुमान मंदिर परिसरात झालेल्या या बैठकीत समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कायद्याच्या मसुद्यावर सखोल चर्चा केली. प्रस्तावित कायद्याचे जाहीर वाचन श्री. उमेश खंडागळे यांनी केले. या कायद्यामुळे समाजाच्या पारंपरिक हक्कांवर, देवस्थान इनाम जमिनींवर आणि भावी पिढ्यांच्या अस्तित्वावर परिणाम होऊ शकतो, अशी भावना उपस्थितांमध्ये व्यक्त करण्यात आली.

संस्थेचे अध्यक्ष बंडू वि. खंडागळे यांनी आपल्या भाषणात स्पष्ट शब्दांत इशारा दिला. “आज आपण जागे झालो नाही, तर उद्या आपल्या पुढच्या पिढ्यांना मोठी किंमत मोजावी लागेल. शासनाकडे कायदेशीर आणि सनदशीर मार्गाने हरकती नोंदवून हा लढा संघटितपणे लढावा लागेल,” असे ते म्हणाले.
कार्याध्यक्ष श्री. विजय खंडेराव साळुंखे यांनीही समाजबांधवांना संघटित होण्याचे आणि कायद्यातील तांत्रिक बाबी समजून घेऊन प्रभावीपणे भूमिका मांडण्याचे आवाहन केले.
बैठकीत कल्याण, डोंबिवली, नेरळ, कर्जतसह विविध भागांतून आलेल्या गुरव समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. विशेष म्हणजे महिलांची उपस्थितीही लक्षणीय होती. “हा लढा केवळ जमिनींचा नाही, तर समाजाच्या अस्मितेचा आहे,” अशी भावना महिला प्रतिनिधींनी व्यक्त केली.
सभेच्या शेवटी “हक्क आपल्या अस्तित्वाचा… लढा आपल्या अस्मितेचा!” हा निर्धार व्यक्त करत शासनाकडे एकत्रितपणे हरकती आणि सूचना नोंदवण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. गुरव समाजाच्या या बैठकीने राज्यभरातील समाजबांधवांमध्ये नव्या चळवळीची नांदी दिल्याची चर्चा उपस्थितांमध्ये होती.
Post Views:
7