कोपरगाव | प्रतिनिधी : कोपरगाव मतदारसंघातील वीज समस्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी महावितरणचे स्वतंत्र सर्कल कार्यालय कोपरगाव किंवा शिर्डी येथे सुरू करण्यात यावे, अशी जोरदार मागणी आमदार आशुतोष काळे यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात सरकारकडे केली. यावेळी त्यांनी भूमिगत वीजवाहिन्या, शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा, स्मार्ट मीटरबाबतच्या तक्रारी तसेच वीज कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसह ऊर्जा विभागाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधले.
आमदार काळे म्हणाले की, सध्या महावितरणचे सर्कल कार्यालय अहिल्यानगर येथे असून ते कोपरगाव मतदारसंघापासून सुमारे 110 किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे स्थानिक स्तरावरील अनेक कामांमध्ये विलंब होत असून त्याचा थेट फटका वीज ग्राहकांना बसत आहे. हा त्रास कमी करण्यासाठी आणि प्रशासन अधिक कार्यक्षम करण्यासाठी कोपरगाव किंवा शिर्डी येथे स्वतंत्र सर्कल कार्यालयाची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कोपरगाव शहरातील वीजवाहिन्या भूमिगत करण्याची मागणी
कोपरगाव शहरातील संजयनगर, सुभाषनगर, गांधीनगर, हनुमाननगर आणि गजानननगर या दाट लोकवस्तीच्या भागांमध्ये विजेच्या खांबांमध्ये विद्युत प्रवाह उतरत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होत असल्याचे सांगत, भविष्यातील अपघात टाळण्यासाठी शहरातील वीजवाहिन्या तातडीने भूमिगत करण्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. यासंदर्भातील प्रकल्प अहवाल शासनाकडे सादर करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.
शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या; सौर प्रकल्पांना गती द्या
मतदारसंघातील अनेक गावांमध्ये शेतीपंपांना रात्री वीजपुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांना सर्पदंश, बिबट्याचा हल्ला आणि अन्य वन्यप्राण्यांचा धोका पत्करावा लागत असल्याचे आमदार काळे यांनी सभागृहात मांडले. शासनाने सौर ऊर्जा प्रकल्पांच्या माध्यमातून दिवसा वीज देण्याचा निर्णय घेतला असला तरी मंजूर प्रकल्पांची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. ही कामे युद्धपातळीवर पूर्ण करून शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा सुरू करावा, अशी त्यांनी मागणी केली.
याशिवाय, ७.५ अश्वशक्तीपर्यंतच्या शेतीपंपांना मोफत वीज देण्याची शासनाची घोषणा असतानाही काही शेतकऱ्यांना वीजबिले दिली जात असल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला आणि अशा प्रकारची बिले तातडीने बंद करण्याची मागणी केली.
स्मार्ट मीटरबाबत नागरिकांमध्ये नाराजी
स्मार्ट मीटरमुळे वीज वापर अधिक दाखवला जात असल्याच्या आणि वीजबिलात मोठी वाढ होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी सभागृहात मांडताना आमदार काळे म्हणाले की, प्रीपेड रक्कम संपताच वीजपुरवठा आपोआप खंडित होत असल्याने नागरिकांमध्ये असंतोष आहे. कोणतीही पूर्वकल्पना किंवा जनजागृती न करता स्मार्ट मीटर बसवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती थांबवावी किंवा व्यापक जनजागृती मोहीम राबवावी, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली.
कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडेही लक्ष वेधले
महावितरणमधील कुशल, अकुशल, लाईन कर्मचारी आणि सबस्टेशन ऑपरेटर म्हणून कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसह विविध प्रलंबित प्रश्नांकडेही आमदार आशुतोष काळे यांनी सरकारचे लक्ष वेधत त्यावर सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी केली.
ऊर्जा विभागाशी संबंधित नागरिक, शेतकरी आणि वीज कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी आमदार काळे यांनी विधानसभेत केली.
