निळवंडेचे ओव्हरफ्लोचे पाणी डाव्या कालव्याद्वारे ११ गावांना सोडा; स्नेहलता कोल्हे
Release overflow water of Nilwande to 11 villages through left canal; Snehlata Kohle
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Wed2Aug24,20.20Pm
By राजेंद्र सालकर
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : कोपरगाव तालुक्यात दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्यामुळे नागरिकांचे व जनावरांचे पिण्याच्या पाण्याअभावी हाल होत असून, खरीप पिकेही धोक्यात आली आहेत. निळवंडे च्या लाभ क्षेत्रातील कोपरगावच्या ११ गावांसाठी निळवंडेचे ओव्हरफ्लो पाणी खुल्या पद्धतीने डाव्या कालव्याद्वारे सोडा; अशी मागणी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी राज्य सरकारकडे केली आहे
स्नेहलता कोल्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेली ५३ वर्षे रखडलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात असणाऱ्या निळवंडे धरणाचे (उर्ध्व प्रवरा प्रकल्प) काम भाजप-शिवसेना युती सरकारमुळे मार्गी लागले असून, डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी ३१ मे २०२३ रोजी यशस्वीरीत्या पूर्ण झालेली आहे.
तालुक्यातील जवळके, रांजणगाव देशमुख, बहादरपूर, अंजनापूर, वेस, सोयगाव, बहादराबाद, धोंडेवाडी, शहापूर, काकडी, मल्हारवाडी या ११ गावांचा समावेश माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे झाला असून, या जिरायत भागातील सुमारे १३ हजार ९९६ एकर (५ हजार ६६६ हेक्टर क्षेत्र) निळवंडे धरणामुळे ओलिताखाली येणार आहे. बंद पाइपातून पाणी शासनाचे धोरण असले तरीही लाभक्षेत्रातील शेती ही कोरडवाहू असल्याने जमिनीवर वितरीका खोदून प्रचलित खुल्या पध्दतीने शेतकऱ्यांना पाणी देण्यात यावे. परिणामी सदर पाण्याचा पाझर होऊन भूगर्भातील पाण्याची पातळी वाढून सभोवतालच्या नागरिकांना व जनावरांच्या पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.
निळवंडे धरण डाव्या कालव्याच्या वितरीका तसेच चाऱ्यांची-पोटचाऱ्यांची कामे तात्काळ टेलपासून सुरू करावीत.या दोन्ही मागण्यांबाबत संबंधित यंत्रणेस त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश द्यावेत, असे सौ कोल्हे यांनी या निवेदनात नमूद केले आहे
Post Views:
237