लावणी सम्राज्ञी कौशल्याबाई कोपरगावकर यांचे नाव शासनाच्या सांस्कृतिक कार्यक्रमातून  डावलले – अरूण खरात 

लावणी सम्राज्ञी कौशल्याबाई कोपरगावकर यांचे नाव शासनाच्या सांस्कृतिक कार्यक्रमातून  डावलले – अरूण खरात 

Lavani Empress Kaushalyabai Kopargaonkar’s name omitted from government cultural programme – Arun Kharat

 कोपरगावच्या कलाकारांकडून नाराजी सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांना पत्र

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! ,Sun 2 Feb 25  16.10 Pm.By  सालकर राजेंद्र

कोपरगाव: विविध कला क्षेत्रातील मान्यवरांचे स्मरण होण्यासाठी तसेच विविध कलाप्रकारांचा अनुभव  जनसामान्यांना घेण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यास नुकतीच शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली आहे मात्र या शासन निर्णयामध्ये कोपरगावच्या लावणी सम्राज्ञी कौशल्याबाई कोपरगावकर यांचे नाव डावलल्याने लोककला व कलावंत अभ्यासक अरुण खरात यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

दरवर्षी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत राज्यातील विविध कला प्रकारात ज्यांचे भरीव योगदान आहे अशा लोकांचे स्मरण व्हावे व त्यांची कला व त्यांचा इतिहास जगासमोर यावा यासाठी छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. मात्र याही वर्षी कोपरगावच्या लावणी सम्राज्ञी कौशल्याबाई कोपरगावकर यांचे नाव कार्यक्रमातून डावलल्याने कोपरगावकर ह्या सांस्कृतिक कार्यक्रमास मुकले आहे. ह्या कार्यक्रमामुळे कोपरगावचा सांस्कृतिक इतिहास लोकांसमोर आला असता असे मत अरुण खरात यांनी व्यक्त केले. 
विविध कला प्रकारातील कलावंतांच्या जीवनावर आधारित कार्यक्रमास शासन प्रत्येकी दोन लाख रुपये खर्च करणार आहे. लावणी कलाप्रकारातील कलावंत यमुनाबाई वाईकर तसेच सत्यभामाबाई पंढरपूरकर यांच्यासह एकूण ३६ कलावंतांच्या जीवनावरील कार्यक्रमास व त्यावर खर्च होणाऱ्या रक्कमेस प्रशासकीय मंजुरी भेटली आहे.
 मात्र संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या ज्यांच्या लावणी नृत्य व गायनाचे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, आचार्य प्र. के. अत्रे, पु्. ल. देशपांडे प्रसिद्ध शहनाई वादक बिस्मिल्लाखाँ साहेब, नामवंत तबलावादक अल्लाखाॅ, मास्टर भगवान तसेच बालगंधर्वही चाहते होते. ज्यांना प्रति गंधर्व म्हणून संबोधले जायचे 
१९६६ मध्ये दिल्ली येथील सांस्कृतिक कार्यक्रमात तत्कालीन पंतप्रधान इंदिराजी गांधी यांनी कौशल्याबाई कोपरगावकर यांचा गौरव केला होता. 
विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात कौशल्याबाईंचे लावणी गायनाचे रेकॉर्ड ही निघाले होते. महाराष्ट्र शासनाच्या अनेक तमाशा व लावणी प्रशिक्षण शिबिरात कौशल्यबाईंनी प्रशिक्षक म्हणून अनेक नवोदितांना मार्गदर्शनही केले होते. कोपरगावचा दिवाणखाना बंद करून कौशल्याबाईने पुण्याचे आर्यभूषण थिएटर गाजवले होते. पुण्यातील बावनखणी चाळीतील दिवाणखान्यात कौशल्याबाईची अदाकारी बघण्यास अनेक दिग्गज लोक येत असे.
      अशा या महान कलासम्राज्ञीचा महाराष्ट्र शासनाला कसा विसर पडला हेच कळत नाही असा प्रश्न लोककला व कलावंत अभ्यासक अरुण खरात यांनी  उपस्थित केला असून सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार व सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालकांना ई-मेल पाठवून नाराजी व्यक्त केली आणि कौशल्याबाईंची महती सांगणारा लेख पाठवला आहे. 
तसेच पुढील वर्षी कौशल्याबाई कोपरगावकर यांच्या नावाचा निश्चित विचार करावा अशी विनंती संबंधितांना केली असून स्थानिक आमदार आशुतोष  काळे माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनीही यात लक्ष घालावे यासाठी त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांनाही नम्र विनंती करणार आहे असे अरुण खरात यांनी सांगितले.

Leave a Reply

You cannot copy content of this page