दिव्यांगांच्या चेहऱ्यावरील हास्य हीच माझ्यासाठी खरी देवपूजा-आमदार आशुतोष काळे

दिव्यांगांच्या चेहऱ्यावरील हास्य हीच माझ्यासाठी खरी देवपूजा-आमदार आशुतोष काळे

The smiles on the faces of differently-abled individuals constitute true worship of the Divine for me – MLA Ashutosh Kale.

कोपरगावात १९७ दिव्यांगांना कृत्रिम अवयव व सहाय्यक साहित्याचे वितरण; 

Rajendara C. Salkar, Portal, वृत्तवेध ऑनलाईन,Jun26Fir 19.20 Pm.By  सालकर राजेंद्र 

कोपरगाव :दिव्यांग बांधवांना दयेची नव्हे तर सन्मानाने जगण्याची संधी मिळाली पाहिजे. त्यांच्या चेहऱ्यावर उमटणारे समाधान आणि हास्य हीच माझ्यासाठी खरी देवपूजा, ध्यान आणि जप आहे. दिव्यांगांनी कोणावरही अवलंबून न राहता स्वाभिमानाने जीवन जगावे, या उद्देशातून गेल्या काही वर्षांपासून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांद्वारे आतापर्यंत ८०० हून अधिक दिव्यांगांना कृत्रिम अवयव आणि विविध सहाय्यक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या जीवनातील अडचणी कमी होऊन स्वावलंबनाला बळ मिळाले, असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले.

श्री भगवान महावीर विकलांग सहायता समिती, मुंबई (जयपूर) आणि आमदार आशुतोष काळे यांच्या संयुक्त विद्यमाने कोपरगाव मतदारसंघातील दिव्यांग बांधवांसाठी दोन दिवसीय विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्या दिवशी दिव्यांगांची वैद्यकीय तपासणी करून त्यांच्या गरजेनुसार कृत्रिम अवयवांचे अचूक मोजमाप घेण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी कोपरगाव येथील महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात १९७ दिव्यांगांना कृत्रिम अवयव आणि सहाय्यक साहित्याचे वितरण करण्यात आले.

यावेळी बोलताना आमदार काळे म्हणाले की, दिव्यांग प्रमाणपत्रासाठी अहिल्यानगर येथील जिल्हा रुग्णालयात जाण्यास अनेक अडचणी येत असल्याने गेल्या सात वर्षांपासून प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी मोफत वाहनसेवा सुरू ठेवण्यात आली आहे. या सुविधेचा लाभ आजपर्यंत दोन हजारांहून अधिक दिव्यांगांनी घेतला असून त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळविणे सुलभ झाले आहे.

मतदारसंघातील जनतेने सलग दुसऱ्यांदा आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली असून त्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी जनसेवेचे कार्य सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. दिव्यांगांचे परावलंबी जीवन स्वावलंबी करण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू राहील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

या कार्यक्रमाला कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे पदाधिकारी, श्री भगवान महावीर विकलांग सहायता समितीचे प्रतिनिधी, साईबाबा संस्थान शिर्डी रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव, त्यांचे पालक आणि नातेवाईक उपस्थित होते.

चौकट : समाजाप्रती बांधिलकी कायम

“शारीरिक व्यंगामुळे कोणालाही परावलंबी आयुष्य जगावे लागू नये. प्रत्येक दिव्यांगाने आत्मविश्वासाने आणि स्वाभिमानाने स्वतःच्या पायावर उभे राहावे, हीच माझी मनापासूनची इच्छा आहे. त्यांच्या आयुष्यातील वेदना कमी करून त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा उमटणारे हास्य आणि आत्मविश्वास हेच माझ्यासाठी सर्वात मोठे आशीर्वाद आहेत,” असे आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले.

Leave a Reply

You cannot copy content of this page