आमदार वल्गना करण्यातच पटाईत – साहेबराव रोहोम
वृत्तवेध ऑनलाईन। 9 Sep 2020
By : Rajendra salkar, 13.40
कोपरगाव : वादळी पावसाच्या तडाख्यात ग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांचे याही वेळी पंचनामे करण्याचे आदेश आमदारांनी दिले आहेत परंतु नेहमीप्रमाणे शेतक-यांचा भ्रमनिरास होणार असल्याने ही मंडळी खोट्या वल्गना करुन हवा करण्यात पटाईत आहेत, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम यांनी आमदार काळे यांचे नाव न घेता केली.
गेल्या पाच वर्षाच्या सत्ता काळात ज्या ज्या वेळी नैसर्गिक आपत्तीचे संकट मतदारसंघावर ओढवले त्या त्या वेळी शासकीय यंत्रणेकडून पचंनाम्याची कार्यवाही करवून घेतली, सौ स्नेहलता बिपीन कोल्हे यांनी शेतक-यांच्या नुकसानीची वस्तुस्थिती मांडून सरसरकट भरपाईची मागणी केल्यामुळेच त्यावेळची नुकसानीची रक्कम शेतक-यांच्या खात्यावर जमा झालेली आहे, निवडणुकीपासून मतदार संघासाठी एक छदामही न आणणा-या विदयमान आमदारांनी सौ. कोल्हे यांनी आणलेल्या निधीतील विकासकामांवरच पाटया लावण्याचे काम चालविलेले आहे, असा टोलाही त्यांनी लगाविला.
६ सप्टेंबर रोजी झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी विदयमान आमदारांनी केली, अशीच मागणी १५ जून २०२० रोजी याच भागात झालेल्या नुकसानीच्या वेळी दिली होती. परंतु गेल्या तीन महिन्यापासून शेतक-यांच्या पदरात काहीही पडले नाही. केवळ वल्गना करण्यात माहिर असलेल्या आमदारांनी याही वेळी पंचनामे करण्याचे आदेश दिले, परंतु नेहमीप्रमाणे शेतक-यांचा भ्रमनिरास होणार असल्याने माजी आमदार सौ कोल्हे ताई यांनी शेतक-यांच्या बांधावर जाउन त्यांना धीर देण्याचे काम केले, आणि तातडीने पैसे मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. गेल्या पाच वर्षात सौ कोल्हे यांनी आणलेल्या निधीतील कामावर निवडणुकीपासून फेरफटका मारणे आणि पाटया लावण्याचे काम करणा-या आमदारांनी मतदारसंघासाठी एक छदाम तरी आणला का, असा सवालही श्री रोहोम यांनी केला.
सध्याच्या कोरोना परिस्थितीमुळे जगासह देश आणि राज्यावर मोठे आर्थिक संकट आलेले आहे, मोठया आर्थीक संकटाचा सामना करत शेतकरी मार्ग काढत असतांना वारंवार येणा-या नैसर्गिक आपत्तीमुळे मेटाकुटीस आलेला आहे. त्यामुळे अशा परिस्थीतीत शेतक-यांना आश्वासन नको त्यांना तातडीने आर्थीक मदत हवी आहे. यासाठी सौ कोल्हे यांनी मागणी करणे निष्चितच गैर नाही, सौ कोल्हे यांनी गेल्या पाच वर्षात मतदार संघात केलेल्या विकासकामाची कधीही बरोबरी होणार नाही, हे त्रिवार सत्य त्यांनाही माहित असल्यामुळे निवडणुकीपासून मतदार संघासाठी काहीही करू न शकलेल्या आमदार काळेंच्या पंचनामे करण्याच्या वल्गना पुन्हा हवेतच विरणार असल्याने त्यांनी कोल्हे यांचेवर आखपाखड सुरू केली असा आरोपही रोहम यांनी केला आहे.