दिवाळीपूर्वी मदत देण्याची घोषणा करुनही शासनाकडून अद्याप हालचाल नाही – परजणे
Despite announcing aid before Diwali, the government has not taken any action yet-Parajane
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Thu 28 Oct 2021,17:48Pm.
कोपरगांव : अतिवृष्टी व पुरामुळे शेतीचे नुकसान झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीं मदत देण्याची घोषणा सरकारने केली असली तरीही अद्याप शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर मदतीच्या रकमा जमा झाल्या नसल्याने सर्वत्र असंतोष पसरला आहे. तातडीने मदत जमा करावी अशी मागणी जिल्हा परिषदेचे सदस्य राजेश परजणे यांनी मुख्यमंत्री ना. उध्दव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
यावर्षींच्या जून ते ऑक्टोंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे लाखो हेक्टरवरील खरीप पिकांचे व फळबागांचे प्रचंड प्रमाणावर नुकसान झालेले आहे. अशा परिस्थितीत उभे राहण्यासाठी शासकीय मदतीची शेतकऱ्यांना गरज आहे. त्यातही ३३ टक्क्यांच्यावर नुकसान झालेल्यांनाच मदत देण्याचा निर्णय शासन पातळीवर झालेला आहे. शेतकऱ्यांना सरकारच्या या मदतीतून किती दिलासा मिळू शकतो ? हा खरा प्रश्न आहे. अहमदनगर जिल्ह्यातील नुकसान तब्बल ७५ कोटीच्या आसपास आहे. शासनाने या नुकसानीपोटी केवळ १० कोटीची घोषणा केलेली असल्याने ही रक्कम अतिशय तुटपुंजी असून या रकमेतून शेतकऱ्यांच्या हातात काहीच पडणार नाही. अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ तसेच कृषिमंत्री ना. दादा भुसे यांनी दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देण्याची घोषणा तीन – चार दिवसापूर्वी केली होती. येत्या २ तारखेपासून धनत्रयोदशीला दिवाळी सणाचा प्रारंभ होत आहे. ४ तारखेला दिवाळी आहे. असे असताना मदत मिळण्याची अजूनही सुतराम शक्यता दिसत नाही. शासनाने शेतकऱ्यांच्या अडचणीचा विचार करुन येत्या दोन दिवसात मदत मिळवून द्यावी अशीही मागणी श्री परजणे पाटील यांनी मा. मुख्यमंत्री महोदयांकडे निवेदनाद्वारे केली.