कोल्हे कुटुंबीयांनी केला मागासवर्गीय समाजाचा सन्मान
Kolhe family honored the backward class society
सामान्य मजुराचा मुलगा बनला साखर कारखान्याचा उपाध्यक्षThe son of a common laborer became the vice president of a sugar factory
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sun 7 Aug, 14.00
By
राजेंद्र सालकर
अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात मोठा नावलौकिक मिळविला आहे. संजीवनी उद्योग समुहाचे संस्थापक, माजी मंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांनी स्थापन केलेल्या या कारखान्याने अनेक पायलट प्रोजेक्ट यशस्वीरीत्या राबवून सहकार क्षेत्रात नवे मापदंड प्रस्थापित केले आहेत. सहकार क्षेत्रातील इतर संस्थांसाठी आदर्शवत ठरलेल्या या साखर कारखान्याची यंदाची निवडणूक बिनविरोध झाली आणि ती ऐतिहासिक ठरली. संचालकांच्या 21 जागांसाठी तेवढेच अर्ज दाखल झाल्यानंतर सर्व सभासदांच्या सहमतीने ही निवडणूक बिनविरोध झाली. कारखान्याच्या अध्यक्षपदी स्व.शंकरराव कोल्हे यांचे नातू, युवा नेते विवेकभैय्या बिपीनदादा कोल्हे यांची तर उपाध्यक्षपदी रमेश दादा घोडेराव यांची बिनविरोध निवड झाली. राज्यात कमी वयात साखर कारखान्याचे अध्यक्ष होण्याचा बहुमान विवेकभैय्या कोल्हे यांना मिळाला असून, देशात प्रथमच रमेश दादा घोडेराव यांच्या रूपाने मागासवर्गीय समाजाला उपाध्यक्षपदाचा सन्मान प्राप्त झाला आहे. यानिमित्ताने रमेश घोडेराव यांचे मनोगत त्यांच्याच शब्दांत येथे देत आहोत.
माजी मंत्री सहकारमंत्री स्व. शंकरराव कोल्हेसाहेब यांना विकासाची दूरदृष्टी होती. ते धडाडीचे लढाऊ लोकनेते होते. सर्वसामान्य जनतेच्या हिताविषयी आंतरिक तळमळ होती. शेती, पाणी, शेतकरी, सहकार, साखर उद्योग हे त्यांच्या आवडीचे आणि जिव्हाळ्याचे विषय होते. या सर्व विषयांचा त्यांना दांडगा अभ्यास होता. 1960 च्या दशकात त्यांनी कोपरगाव येथे संजीवनी सहकारी साखर कारखान्याची मुहूर्तमेढ रोवली. संजीवनी कारखान्याबरोबर त्यांनी विविध सहकारी संस्थांचे जाळे या परिसरात उभारले. अचूक व दूरगामी नियोजन, पारदर्शी कारभार आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करीत अथक प्रयत्नातून त्यांनी या सर्व संस्था नावारूपाला आणल्या. कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक सुबत्ता आणली. सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून सर्व जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेऊन विकासाचे राजकारण केले. त्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नेहमी सन्मानाची वागणूक दिली. गेली 30 वर्षे मी त्यांच्यासोबत काम केले. दीन-दलित, शोषित, वंचित, कष्टकरी वर्गाला त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी स्व. शंकरराव कोल्हे साहेबांनी अविरत संघर्ष केला. समाजातील उपेक्षित घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न स्व. कोल्हेसाहेब व त्यांच्या कुटुंबीयांनी सातत्याने केला. त्यातूनच आज मला सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्ष पदावर काम करण्याची मोठी संधी मिळाली.
हिमालयासारखे विशाल व्यक्तिमत्त्व
स्व. शंकरराव कोल्हेसाहेब यांनी आपले संपूर्ण जीवन जिरायती भागातील कष्टकरी, गोरगरीब शेतकऱ्यांचे राहणीमान उंचावण्यासाठी खर्ची घातले. कष्टकरी कामगार, शेतकरी व सर्वसामान्य जनतेचे भले व्हावे यासाठी ते आयुष्यभर लढले. समाजातील नाही रे वर्गाचा आवाज बनून त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी त्यांनी नेतृत्वाची धुरा स्वत:च्या खांद्यावर घेऊन अहर्निश लढा दिला. ग्रामपंचायत, पंचायत समितीपासून ते विधिमंडळापर्यंत सरपंच, सभापती, आमदार, मंत्री आणि सहकार क्षेत्रात विविध पदांवर काम करताना जनहिताला प्राधान्य देत त्यांनी आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवला आहे. स्व. कोल्हेसाहेबांचे व्यक्तिमत्त्व हिमालयासारखे विशाल होते. त्यांंच्या व्यक्तिमत्त्वाला कोहिनूर हिऱ्यासारखी चकाकी होती. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत त्यांनी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना (पूर्वीचा संजीवनी सहकारी साखर कारखाना) व संजीवनी उद्योग समुहाचे वैभव निर्माण केले. ऊस, भुसा व साखर या तीन गोष्टींव्यतिरिक्त त्यांनी संशोधन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानावर भर देत महाराष्ट्रात सर्वप्रथम रासायनिक उपपदार्थांची निर्मिती सुरू करून हे प्रकल्प यशस्वी करून दाखविले. संजीवनी उद्योग समुहाच्या माध्यमातून कोपरगाव तालुक्यात खऱ्या अर्थाने ङ्गसंजीवनीङ्घ निर्माण करणाऱ्या स्व. शंकरराव कोल्हे साहेबांचे 16 मार्च 2022 रोजी अकाली निधन झाले. स्व. कोल्हे साहेबांच्या निधनानंतर 98 दिवसांनी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. यावर्षी कारखान्याच्या 21 संचालक पदांसाठी तेवढेच म्हणजे 21 च उमेदवारी अर्ज दाखल झाले. संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सभासद शेतकऱ्यांनी ही निवडणूक बिनविरोध करून स्व. शंकरराव कोल्हेसाहेबांना अनोखी आदरांजली अर्पण केली व सहकार क्षेत्रात आदर्श पायंडा पाडला. 21 जुलै 2022 रोजी नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या बैठकीत कारखान्याचे नूतन अध्यक्ष म्हणून विवेकभैय्या कोल्हे यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब झाले. याच बैठकीत बिपीनदादा कोल्हे यांनी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदर्श तत्त्वांचा उल्लेख करीत कारखान्याच्या उपाध्यक्ष पदासाठी अनपेक्षितपणे माझ्या नावाची घोषणा केली. हा प्रसंग माझ्यासाठी अतिशय आनंददायी होता.
मागासवर्गीय समाजाचा गौरव
स्व. शंकरराव कोल्हेसाहेब यांच्या आदर्श विचारांचा वारसा जपत यशस्वीपणे वाटचाल करणारे संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे आणि सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष, युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्यामुळे मला कारखान्याचे उपाध्यक्षपद मिळाले. ही माझ्या जीवनातील मोठी उपलब्धी आहे. मागासवर्गीय समाजातील एका सामान्य शेतमजुराचा मुलगा आज सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या साखर कारखान्याचा उपाध्यक्ष बनला आहे. ही केवळ माझ्यासाठीच नव्हे तर समस्त मागासवर्गीय समाजासाठी अभिमानाची गोष्ट आहे. यामुळे मला, माझ्या कुटुंबाला खूप आनंद झाला आहे तो मी शब्दांत वर्णन करू शकत नाही. कसलाही जातीभेद न करता सर्व समाजाला सोबत घेऊन काम करणाऱ्या कोल्हे कुटुंबीयांनी मागासवर्गीय समाजाला हा जो सन्मान दिला आहे यातच त्यांचे मोठेपण दिसून येते. स्व. शंकरराव कोल्हेसाहेबांनंतर त्यांच्या दुसऱ्या व तिसऱ्या पिढीने अंगिकारलेला हा सामाजिक दृष्टिकोन इतरांसाठी प्रेरणादायी आहे.
बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न बिपीनदादा कोल्हे, विवेकभैय्या कोल्हे यांनी पूर्ण केले
यापूर्वी स्व. शंकरराव कोल्हेसाहेबांनी आमच्या समाजातील पोपटराव पगारे यांना सलग तीन वेळा संजीवनी सहकारी साखर कारखान्यावर संचालक म्हणून संधी दिली होती. आता बिपीनदादा कोल्हे व विवेकभैय्या कोल्हे यांनी मला कारखान्याचे संचालक तर केलेच, शिवाय मला उपाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली आहे. महाराष्ट्रात प्रथमच माझ्या रूपाने मागासवर्गीय समाजातील व्यक्तीला कारखान्याचे उपाध्यक्षपद मिळाले आहे. हा ऐतिहासिक निर्णय आहे. दीन-दलितांना उच्च पदावर काम करण्याची संधी मिळावी हे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न बिपीनदादा कोल्हे, कोपरगाव तालुक्याच्या प्रथम महिला आमदार स्नेहलताताई कोल्हे आणि युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांनी पूर्ण केले आहे. मी आजपर्यंत केलेल्या सामाजिक व राजकीय कार्याची दखल घेऊन त्यांनी मला हा सन्मान दिला आहे, याबद्दल मी त्यांचे मन:पूर्वक आभार व्यक्त करतो. त्यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आहे त्यास तडा जाऊ न देता मी या संधीचे नक्कीच सोने करीन. समाजातील गोरगरीब लोकांचे प्रश्न हातात घेऊन ते कोल्हे कुटुंबीयांच्या माध्यमातून सोडविण्याचा निश्चितच प्रयत्न करीन. तसेच कारखान्याचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांच्या खांद्याला खांदा लावून कारखान्याच्या व सभासद शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी सदैव प्रयत्नशील राहीन, अशी ग्वाही मी देतो.
बारावीत असतानाच केली शिपायाची नोकरी
सिन्नर (जि. नाशिक) तालुक्यातील शहा हे माझे मूळ गाव. कोपरगाव तालुक्यातील धारणगाव हे माझे आजोळ. माझ्या घरची परिस्थिती अत्यंत बिकट होती. सुमारे पन्नास वर्षांपूर्वी माझी आई शकुंतलाबाई घोडेराव आणि वडील दादा घोडेराव हे कामधंद्यानिमित्त धारणगाव येथे आले आणि येथेच स्थायिक झाले. धारणगावात 1 मे 1971 रोजी माझा जन्म झाला. माझे प्राथमिक शिक्षण धारणगाव येथे तर माध्यमिक शिक्षण कोपरगावच्या के.बी.पी. विद्यालयात झाले. कोपरगावातील एस.एस.जी.एम. महाविद्यालयात मी 12 वीचे शिक्षण पूर्ण केले. मी बारावीत शिकत असतानाच वयाच्या 17 च्या वर्षी घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे मला शिक्षण अर्धवट सोडून नोकरी करावी लागली. वडिलांना हातभार लागावा म्हणून मी बारावीत असतानाच कोपरगाव येथे सेंट्रल बँकेत शिपाई म्हणून काम सुरू केले. दी न्यू इंडिया इन्शुुरन्स कंपनीचे सेंट्रल बँकेत खाते असल्याने तेव्हा विम्याची (इन्शुरन्स) रक्कम भरण्यासाठी अनेक लोक येत असत. त्या लोकांशी माझी ओळख झाली. त्यावेळी कोपरगाव येथे बी. एम. वक्ते हे न्यू इंडिया इन्शुुरन्स कंपनीचे व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. त्यांनी मला 1989 साली न्यू इंडिया इन्शुुरन्स कंपनीची एजन्सी दिली आणि मी या कंपनीचा विमा प्रतिनिधी म्हणून काम करू लागलो. विमा उतरविण्याच्या कामासाठी मला अनेक ठिकाणी जावे लागत असे. त्यानिमित्ताने अनेक लोकांशी माझा संपर्क आला.
अन् मी स्व. कोल्हेसाहेबांकडे आकर्षित झालो!
व्यवसायाच्या निमित्ताने मी त्यावेळी तालुक्यात फिरत असे. त्यातून अनेक लोकांची ओळख झाली. जनसंपर्क वाढला. त्या काळी स्व. शंकरराव कोल्हेसाहेब यांची कोपरगाव तालुक्यावर मजबूत पकड होती. कार्यकर्त्यांचे मोठे जाळे त्यांनी निर्माण केले होते. माझे वडील दादा घोडेराव हे स्व. कोल्हेसाहेबांचे जबरदस्त फॅन होते. 1972 साली स्व. शंकरराव कोल्हेसाहेब यांनी कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. त्यांची आमदारकीची ही पहिलीच निवडणूक होती. सिंह ही त्यांची निवडणूक निशाणी होती. त्या निवडणुकीत माझ्या वडिलांनी सायकलवर लाकडी सिंह बसवून धारणगाव ते कोपरगाव असा प्रवास करत स्व. कोल्हेसाहेबांचा प्रचार केला. त्या निवडणुकीत स्व. कोल्हेसाहेब प्रचंड मताधिक्याने विधानसभेवर निवडून आले. तेव्हा मी लहान होतो. माझे वडील स्व. शंकरराव कोल्हेसाहेब यांच्या कार्याविषयी भरभरून बोलत असत. त्याचा माझ्यावर चांगलाच प्रभाव पडला आणि मी स्व. कोल्हेसाहेबांकडे आकर्षित झालो. मी स्व. कोल्हेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करू लागलो.
पती-पत्नी बनले ग्रामपंचायत सदस्य
1992 मध्ये मी बिपीनदादा कोल्हे यांच्या संपर्कात आलो. 2016 मध्ये त्यांच्या आशीर्वादाने मी संजीवनी सहकारी मत्स्यविकास संस्थेचा संचालक झालो. 2021 पर्यंत मी या संस्थेचा संचालक म्हणून काम पाहिले. 2003 मध्ये झालेल्या धारणगाव ग्रामपंचायतच्या निवडणुकीत माझी पत्नी छाया घोडेराव हिला स्व. शंकरराव कोल्हेसाहेबांनी उमेदवारी दिली. त्या निवडणुकीत स्व. कोल्हेसाहेबांच्या नेतृत्वाखालील पॅनलकडून एकमेव माझी पत्नी ग्रा.पं. सदस्यपदी निवडून आली होती. त्यानंतर 2013 साली मी स्वत: स्व. कोल्हेसाहेबांच्या नेतृत्वाखालील पॅनलकडून ग्रा.पं. निवडणूक लढवली. त्या निवडणुकीत माझ्यासह कोल्हे गटाचे आठ ग्रा.पं. सदस्य निवडून आले होते, तर स्व. शंकरराव काळे गटाचा फक्त एकच सदस्य निवडून आला होता. मी 2013 ते 2018 या काळात ग्रा.पं. सदस्य होतो. ग्रामपंचायतची सत्ता कोल्हे गटाच्या ताब्यात होती. त्यावेळी धारणगाव व परिसरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता. स्व. शंकरराव कोल्हेसाहेबांच्या नेतृत्वाखाली सरपंच, उपसरपंच व आम्ही सर्व ग्रा. पं. सदस्यांनी मिळून पाच गावांच्या पाणीपुरवठा योजनेसाठी उपोषण केले होते. स्व. शंकरराव कोल्हेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही धारणगावात ग्रा. पं. च्या माध्यमातून अनेक विकासकामे केली. स्व. कोल्हेसाहेबांनी त्यासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला. आम्ही गावात दोन नवीन अंगणवाड्या सुरू केल्या. एका अंगणवाडीसाठी जागा मिळवली. गावासाठी नवीन फिल्टर प्लांट उभारला. स्मशानभूमीसाठी नवे शेड उभारले. गावापासून स्मशानभूमीपर्यंत सिमेंट काँक्रिटचा रस्ता तयार केला. ही सर्व विकासकामे स्व. कोल्हेसाहेबांमुळे आम्ही करू शकलो, हे मला आवर्जून सांगावेसे वाटते.
वडिलांनी मला जबाबदार माणूस बनवले
याआधी सांगितल्याप्रमाणे माझ्या घरची परिस्थिती अतिशय हलाखीची होती. घरी अठराविश्वे दारिद्य, कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविण्यासाठी कष्ट करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. माझे आई-वडील दोघेही मोलमजुरी करायचे. मी बारावीत शिकत असतानाच वडिलांनी माझ्यावर घरची जबाबदारी टाकली. जबाबदारी काय असते, ती कशी पार पाडायची याची जाणीव मला तेव्हा झाली. माझ्या वडिलांनीच मला खऱ्या अर्थाने जबाबदार माणूस बनवले. मला आई, तीन भाऊ, एक विवाहित बहीण, पत्नी, एक मुलगा व दोन मुली आहेत. मी घरातील सर्वांना सोबत घेऊन 21 वर्षे एकत्र कुटुंब चालवले. माझा मुलगा अमोल घोडेराव हा इन्शुरन्स कंपनीत सहाय्यक विकास अधिकारी (एडीओ) म्हणून कार्यरत आहे. आज माझे कुटुंब सुखी-समाधानी आहे. कोल्हे कुटुंबीयांनी माझ्यावर विश्वास दर्शवून मला सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्षपद देऊन मोठा सन्मान केला आहे. मात्र, या आनंदाच्या क्षणी मला माझ्या वडिलांची तसेच स्व. शंकरराव कोल्हे साहेबांची उणीव प्रकर्षाने जाणवते.
कोल्हे कुटुंबीयांचे मागासवर्गीय व आदिवासी समाजावर मोठे ऋण
स्व. शंकरराव कोल्हेसाहेब आणि त्यांच्या कुटुंबीयांनी दीन-दलित व तळागाळातील लोकांच्या उत्थानासाठी खूप मोठे कार्य केले आहे. स्व. शंकरराव कोल्हेसाहेब यांनी मागासवर्गीय व आदिवासी समाजातील हजारो लोकांना समाजकल्याण आणि इतर विभागांमार्फत शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला. शेतकऱ्यांना शेतीपयोगी अवजारे, गायी, म्हशींचे वाटप केले. आदिवासी व मागासवर्गीय समाजाचे मेळावे घेऊन शासकीय योजनांचा लाभ घेण्याबाबत जनजागृती केली. स्व.कोल्हेसाहेबांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, सहकारी सोसायट्या, बँक आदी संस्थांमध्ये मागासवर्गीय समाजाला प्रतिनिधीत्व दिले. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मागासवर्गीय समाजाचे प्रतिनिधी निवडून येण्यासाठी त्यांनी कसोशीने प्रयत्न केले. काकडी, जेऊर कुंभारी, मढी (बु.) व इतर अनेक गावांमध्ये विश्वरत्न, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे उभारले. त्यांची जोपासना केली. कोळगाव थडीसह इतर अनेक गावांमध्ये बौद्ध विहार उभारले. त्या ठिकाणी स्वखर्चाने भगवान गौतम बुद्ध यांची मूर्ती उभारली. कोपरगाव तालुक्यात विविध ठिकाणी समाजमंदिरे उभारली. त्यावेळी श्रीरामपूर तालुक्यात असलेल्या हनुमंतगाव येथे 1992-93 मध्ये जातीय दंगल उसळली होती. त्यावेळी स्व. शंकरराव कोल्हेसाहेब आणि तत्कालीन समाजकल्याणमंत्री रामदास आठवले यांनी हनुमंतगाव येथे जाऊन दलित आणि सवर्ण समाजाशी सुसंवाद साधत जातीय सलोखा राखण्यासाठी मोलाचे प्रयत्न केले.
आदिवासी समाजाला गायरान जमिनी मिळवून देण्यासाठी स्व. शंकरराव कोल्हेसाहेब यांनी शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा केला. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ आदींच्या माध्यमातून मागासवर्गीय समाजातील अनेक बेरोजगार तरुणांना अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले. स्व. शंकरराव कोल्हेसाहेब शिर्डी येथील साईबाबा संस्थानचे उपाध्यक्ष असताना त्यांनी मागासवर्गीय समाजातील अनेक लोकांना नोकऱ्या मिळवून दिल्या. साईबाबा संस्थानच्या रुग्णालयात उपचाराची सुविधा उपलब्ध करून देत हजारो लोकांना जीवदान दिले. रयत शिक्षण संस्थेत तसेच संजीवनी सैनिकी स्कूल, बी.एड. कॉलेज, संजीवनी इंजिअरिंग कॉलेज, पॉलिटेक्निक आदी ठिकाणी मागासवर्गीय समाजातील मुला-मुलींना शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली. स्व. शंकरराव कोल्हेसाहेबांमुळेच मागासवर्गीय समाजातील अनेक मुले-मुली उच्चशिक्षित होऊन मोठ्या पदांपर्यंत पोहोचले आहेत. मागासवर्गीय, अल्पसंख्याक समाजाच्या अडीअडचणी सोडवून त्यांना सन्मानाने जगण्यासाठी कोल्हे कुटुंबीयांनी मोठा आधार दिला आहे. त्यांचे समाजावर मोठे ऋण आहे, ते कधीही फेडता येणार नाही. यापुढील काळातही आम्ही सर्वजण कोल्हे कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना सदैव साथ देत राहू, हेच यानिमित्ताने मला सांगावेसे वाटते.
Post Views:
261