खाजगी साखर कारखान्यांशी स्पर्धेसाठी व्यवस्थापन प्रणालीत बदल करावे लागतील – आ. आशुतोष
Management system will have to be changed to compete with private sugar mills – A. Ashutosh Kale
६८ व्या गळीत हंगाम बॉयलर अग्निप्रदीपन 68th neck season boiler fire lighting
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Thu 6 Oct , 20.20 pm
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : राज्यात सहकारी एवढेच खासगी साखर कारखाने निर्माण झाले आहेत. त्यामुळे खाजगी साखर कारखान्यांशी स्पर्धा करताना भविष्यात नवीन आवाहनांना सामोरे जातांना कार्यक्षमता व व्यावसायिकता यांची कास धरून व्यवस्थापन प्रणालीत भरीव व सकारात्मक बदल करावे लागतील असे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे साखर कारखान्याचे चेअरमन आ. आशुतोष काळे यांनी ६८ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभात केले. अध्यक्षस्थानी मार्गदर्शक व जेष्ठ संचालक माजी आमदार अशोकराव काळे होते .
व्हा.चेअरमन दिलीपराव बोरनारे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. अलकाताई बोरनारे यांच्या शुभहस्ते विधिवत पूजा करण्यात आली .
पुढे बोलतांना आ. आशुतोष काळे म्हणाले की, मागील दोन वर्षापासून राज्यात उसाचे क्षेत्र वाढत आहे व साखर कारखानदारी देखील वाढली आहे. मात्र दुसरीकडे ऊस तोडणी करणाऱ्या मजुरांची संख्या मात्र दिवसेंदिवस घटत चालली आहे. त्यामुळे यापुढील काळात ऊस तोडणी यंत्राची गरज भासणार आहे. भविष्यात पुढील पाच वर्षात कमीत कमी २५ टक्के उसाची तोडणी ही केन हार्वेस्टर ने करावी लागणार आहे. तोडणी अभावी शेतकऱ्यांचा ऊस शिल्लक राहिला तर राज्य सरकारला नुकसान भरपाई द्यावी लागते हे टाळण्यासाठी व शेतकऱ्यांचा ऊस वेळेत तोडला जावा यासाठी ज्याप्रमाणे केन हार्वेस्टर साठी यापूर्वी राज्यशासन अनुदान देत होते त्याप्रमाणे विद्यमान राज्य शासनाने अनुदान देण्यासाठी सकारात्मक विचार करावा.
चालू हंगामात राज्यामध्ये १४ लाख ८७ हजार हेक्टर क्षेत्र गाळपास उपलब्ध असून हेक्टरी सरासरी टनेज ९५ मे. टन गृहीत धरून १३८ लाख टन साखर उत्पादन होईल असा साखर आयुक्तालयाचा अंदाज आहे. त्याप्रमाणे कारखान्याने देखील ७.५० लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट्य ठेवले आहे. हवामान खात्याकडून ऑक्टोबर महिन्याच्या शेवटपर्यंत पावसाचा अंदाज सांगितला असून अजूनही पाऊस सुरूच आहे आजही शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचलेले आहे त्यामुळे ऊस तोडणीसाठी अडचणी निर्माण होणार आहे. हंगाम लांबला तर उन्हाळ्यात ऊस तोडणी मजुरांचा प्रश्न निर्माण होईल अशा दुहेरी संकटाचा हा गळीत हंगाम आहे.
सर्वच शेतकऱ्यांची को -२६५ या ऊस जातीला पसंती असून हा ऊस परिपक्व होण्यासाठी १३ ते १४ महिने कालावधी लागत असल्यामुळे गळीत हंगाम सुरू करतांना परिपक्व ऊसाचा प्रश्न निर्माण होतो. जास्तीत जास्त ऊस उत्पादना बरोबरच साखर उतारा देखील तेवढाच महत्वाचा आहे त्यामध्ये ऊस उत्पादक शेतकरी व साखर कारखानदारीचे हित दडलेले आहे त्यासाठी ज्या शेतकऱ्यांना पाण्याची उपलब्धता आहे त्या शेतकऱ्यांनी आडसाली ऊस लागवड करावी व वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ने प्रसारित केलेल्या नवीन उसाच्या १८१२१ सारख्या ऊसाची लागवड करावी असे आवाहन केले. कारखान्याचा गळीत हंगाम सुरु करतांना पहिल्या टप्प्यातील आधुनिकीकरणाचे काम पूर्ण होत आले असून नवीन ११० टन क्षमतेचा बॉयलर, ०८ मेगा वॅटचे टर्बाईन व चार मिलचे काम पूर्णत्वाकडे जात आहे.पुढील वर्षी संपूर्ण कारखान्याचे आधूनिकिकरणाचे काम पूर्ण होवून पुढील हंगाम हा नव्या कारखान्यात होवून सर्वच प्रकारच्या खर्चातही मोठी बचत होणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील दोन वर्ष बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ साध्या पद्धतीने व मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आला होता. मात्र यावर्षी कोरोना संकटाची तीव्रता बऱ्याच अंशी कमी झाल्यामुळे हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात ऊस उत्पादक शेतकरी सभासदांच्या उपस्थित संपन्न झाला. यावेळी कारखान्याचे व्हा.चेअरमन दिलीपराव बोरनारे, सर्व संचालक मंडळ, कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक सुनील कोल्हे, आसवणी विभागाचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर आभाळे, सेक्रेटरी बाबा सय्यद, असि. सेक्रेटरी एस. डी. शिरसाठ तसेच सर्व सलग्न संस्थानचे चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक व सर्व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अरुण चंद्रे यांनी केले तर संचालक वसंतराव आभाळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.