पतसंस्थांच्या प्रश्नासंबंधी ते १५ आमदार नागपूर अधिवेशनात लक्षवेधी मांडणार – काका कोयटे
Regarding the issue of credit institutions, he will raise attention in the Nagpur session of 15 MLAs – Kaka Koyte
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onWed28 Dec22 , 18.00 PmBy राजेंद्र सालकर
कोपरगाव : पतसंस्थांच्या समोरील विविध प्रलंबित प्रश्न निकाली काढण्यासाठी नागपूर अधिवेशनात लक्षवेधी मांडणार असल्याचे आश्वासन १५ आमदारांनी नागपूर येथे सोमवारी (दि.२६) रोजी सायंकाळी पार पडलेल्या बैठकीत दिले असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. यामुळे पतसंस्था फेडरेशनच्या लढ्याला बळ मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सावकारशाही मोडून काढण्यासाठी महाराष्ट्रात ही चळवळ टिकणे अत्यावश्यक आहे. या चळवळीला बळ देण्याचा प्रयत्न करू राजकारणविरहित प्रश्न आम्ही सरकारपुढे मांडू,’ लक्षवेधी मांडून पतसंस्थांना न्याय मिळवून देणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
नागपूर येथील या बैठकीला माजी विधानसभाध्यक्ष आमदार हरिभाऊ नाना बागडे, आमदार सुभाषबापू देशमुख (सोलापूर), आमदार प्रकाश आबिटकर (राधानगरी), आमदार आशुतोष काळे (कोपरगाव), आमदार सौ. श्वेताताई महाले (चिखली), आमदार सुभाष धिटे (राजुरा), आमदार अतुल बेनके (जुन्नर), माजी आमदार शरद सोनवणे, आमदार विकासभाऊ कुंभारे (नागपूर), माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार कृष्णाभाऊ खोपडे (नागपूर), आमदार प्रतापदादा अडसड (अमरावती), आमदार ऍड. अभिजित वंजारी (नागपूर), आमदार रणधीर सावरकर (अकोला), आमदार डॉ. सुधीर तांबे (संगमनेर) उपस्थित होते. फेडरेशनच्या वतीने काकासाहेब कोयटे, माजी कार्याध्यक्ष राजुदास जाधव, माजी महासचिव डॉ. शांतीलाल सिंगी, माजी खजिनदार दादाराव तुपकर, सुदर्शन भालेराव, नूतन संचालक सुभाष आकरे यांनी सर्वांचे स्वागत केले.
या बैठकीत अंशदानाची रक्कम नाममात्र असावी, केवळ नियामक मंडळाचा खर्च चालण्याइतकी ती असावी, परंतु ठेव विमा संरक्षण अहमदनगर जिल्हा स्थैर्यनिधी संघाप्रमाणे तरलतेच्या आधारावर ठेवून विमा संरक्षणासाठी शासनाने आर्थिक योगदान द्यावे, थकबाकी वसुलीचा कलम १०१ चा कायदा गतिमान करावा, शासकीय अधिकाऱ्यांमुळे यात येत असलेल्या अडचणींवर शासनाने मार्ग काढावा थकबाकी वसुली यंत्रणा गतिमान करण्यासाठी सहकार खात्याने चर्चा घडवून आणावी, नियामक मंडळाच्या बैठकांना राज्य फेडरेशनचा प्रतिनिधी निमंत्रित सदस्य म्हणून घ्यावा, आदी मागण्या फेडरेशनच्या वतीने करण्यात आल्या.
यावेळी काका कोयटे म्हणाले, ‘पतसंस्था चळवळींचं लॉबिंग करून दबाववगट तयार करण्याचा प्रयत्न करू. त्याशिवाय आता पतसंस्थांचे प्रश्न सुटणार नाहीत. आजच्या बैठकीमुळे या चळवळीला आता बळकटी येणार आहे. आजचा दिवस पतसंस्था चळवळीतील माइल स्टोन ठरणारा आहे.’
नागपूर येथील गिरनार पतसंस्थेचे चेअरमन आमदार कृष्णा खोपडे व राजेंद्र घाटे यांनी सर्व आमदारांचा सत्कार करून आभार मानले. मुख्य कार्यकारी संचालक सौ. सुरेखा लवांडे यांनी कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन केले.