कालव्याचे आवर्तन सुरु शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होणार – आ. आशुतोष काळे
Water supply of the city will be smooth. Ashutosh Kale
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onWed28 Dec22 , 17.50 Pm By राजेंद्र सालकर
कोपरगाव :- ठरलेल्या वेळापत्रकाच्या पाच दिवस अगोदरच गोदावरी डाव्या-उजव्या कालव्यांना आवर्तन सोडण्यात आले आहे. त्यामुळे कोपरगाव शहराचा विस्कळीत झालेला पाणी पुरवठा सुरळीत होणार असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.
आ. आशुतोष काळे यांनी पुढे असे म्हटले आहे की, कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत मागणी केल्याप्रमाणे गोदावरी डाव्या-उजव्या कालव्यांना एक रब्बी व तीन उन्हाळी आवर्तन देण्यात येणार आहे. यातील पाहिले आवर्तन हे १ जानेवारी रोजी सोडण्यात येणार होते. मात्र कोपरगाव शहरातील विस्कळीत झालेल्या पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांना विशेषतः महिला भगिनींना त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे लवकरात लवकर आवर्तन सोडण्याच्या केलेल्या सूचनेनुसार बिगरसिंचनासाठी व सिंचनासाठीचे आवर्तन मंगळवार (दि.२७) रोजी पाच दिवस अगोदरच डाव्या-उजव्या कालव्यांना सोडण्यात आले आहे.
आवर्तन सुरु असतांना कोपरगाव नगरपरिषदेने व आवर्तनावर अवलंबून असणाऱ्या अनेक गावातील पाणी पुरवठा योजनांचे सर्व साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरून घ्यावेत. हे सर्व साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याशिवाय कालवे बंद करू नका. टेल टू हेड सर्वच लाभधारक शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळाले पाहिजे याची पाटबंधारे काळजी घ्यावी. कोपरगाव शहरातील ५ नंबर साठवण तलावाचे काम प्रगतीपथावर असून मोठ्या क्षमतेचे नवीन जलकुंभ नव्याने होणाऱ्या वितरण व्यवस्थेच्या पाईपलाईन मुळे भविष्यात शहरातील नागरिकांना स्वच्छ व नियमित पाणी पुरवठा होणार आहे. सुरु असलेल्या आवर्तनातून कोपरगाव नगरपरिषदेने सर्व साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरून घेवून पाणी वाटपाचे योग्य नियोजन करावे जेणेकरून नागरिकांच्या तक्रारी येणार नाही याची काळजी घ्यावी अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी केल्या आहेत. कालव्यांना आवर्तन सोडण्यात आल्यामुळे विस्कळीत झालेला पाणी पुरवठा सुरळीत होणार असल्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.