कोपरगावात चैतन्य, उत्साहाच्या वातावरणात विघ्नहर्त्या गणरायाची प्रतिष्ठापना
Installation of Vighnahartya Ganaraya in an atmosphere of vitality and enthusiasm in Kopargaon
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onTue 19Sep24, 19.10Pm
By राजेंद्र सालकर
कोपरगाव :सर्व धर्मियांच्या भक्तांच्या लाडक्या बाप्पांची १९ सप्टेंबर रोजी घरोघरी तसेच सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये ढोल-ताशांच्या निनादात आणि “गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात उल्हासात प्रतिष्ठापना करण्यात आली. मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही डिजेचा आवाज बंद झाला असला तरी पारंपरिक डफडे, दिंडी पथके, ढोल ताशांच्या तालावर तरुणाई थिरकली. गणरायाच्या आगमनामुळे शहरातील वातावरण मंगलमय आणि भक्तिमय झाले.
श्रीगणेश चतुर्थीच्यापर्वावर पहाटेपासून घरोघरी बाप्पांना आणण्याची तयारी सुरू होती. १९ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा ते दुपारी दीड या दरम्यान गणपती स्थापनेचा मुहूर्त होता. विविध ठिकाणी सकाळी अकरानंतर गणेश स्थापना सुरू झाली. परंतु, घरोघरीही शक्य होईल त्या वेळेप्रमाणे गणपतीची स्थापना करण्यात आली. अनेक कुटुंबीयांनी एक ते दोन दिवसांपूर्वीच गणपतीची मूर्ती घरी आणून ठेवली होती.
शहरातील तहसील कार्यालय लगतच्या अलंकापुरीनगरी मैदानात लहान तसेच मोठ्या गणेश मूर्तींच्या खरेदीसाठी महिला-पुरुषांसह बच्चेकंपनीने गर्दी केली होती. शहरातील मुख्य रस्त्यावर नारळ, गुलाल, कापूर, अगरबत्ती, विड्याची पाने, लाल सुपारी आदी पूजेच्या साहित्याची दुकाने सजली होती. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे ट्रक, ट्रॅक्टर आपापल्या मूर्तीच्या प्रतीक्षेत होते. कायदा सुव्यवस्था चोख राखण्यासाठी पोलिस बंदोबस्तासह वाहतूक पोलिस ठिकठिकाणी तैनात होते. शहरात लहान-मोठ्या अशा गणरायांच्या मूर्तींची पहाटेपासून रात्री बारा वाजेपर्यंत स्थापना झाली.
सजावटीवर भर : दरवर्षीप्रमाणेपारंपारिक गणेशमूर्तींसह अधिकाधिक सजावट केलेल्या मूर्तींना अधिक मागणी दिसून आली. यामध्ये गणपतीचे पितांबर टिकल्यांनी सजवून, मुकुटावर रंगीत काच, रेशमी धागे, जरी आदींच्या सजावटीला नागरिकांनी पसंती दिली. तसेच छत्रपती शिवाजी महाराज, साईबाबा, तिरुपती बालाजी, मयुरेश्वर, चिंतामणी, श्रीमंत बाजीराव पेशवे, अष्टविनायक, बालकृष्णरुपी गणेश, जास्वंदाच्या फुलातून साकारलेल्या गणेशमूर्ती, सिद्धी विनायक, लालबागचा राजा, बाहुबली आदी मूर्तींनाही चांगली मागणी होती. याचबरोबर ईको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मखरही बाजारात आले होते. यामध्ये लहान ते मोठ्या आकाराच्या मखराचा समावेश होता.
शहरात १०० तर तालुक्यात ७० च्या जवळपास सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची नोंदणी झाली आहे. गल्लीबोळातील बाल गणेश मंडळे लक्षात घेतल्यास ही संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. पोलिस बंदोबस्तही चोख ठेवण्यात आला आहे. सार्वजनिक मंडळांनी पूजेच्या गणेश मूर्तीची मुहूर्तावर स्थापना केली. तसेच मुख्य मूर्तीची स्थापना रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
शहरातील मानाच्या तुळजाभवानी, प्रगत शिवाजी रोड, सराफ बाजार, मुंबादेवी, हिंदूवाडा, रीक्षा संघटना, गांधीनगर, टिळक नगर, वैष्णव देवी, राजमुद्रा, विजेता, त्रिमूर्ती, निवारा सुभद्रानगर, येवला रोड, शुक्लेश्वर, मोहिनीराज नगर, शिवनेरी, सनी ग्रुप, लक्ष्मीनगर, सोमय्या कॉलेज, एस सी जी एम कॉलेज, गोदावरी दूध संघ, संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेज, एसटी स्टँड, पतसंस्था, बँका या ठिकाणच्या गणपतीची स्थापना सायंकाळी सातच्या सुमारास करण्यात आली.
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांचा हस्ते विधीवत पुजेने श्रीगणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली.
कर्मवीर शंकरराव काळे कारखाना कार्यस्थळावर कारखान्याचे चेअरमन आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते विधिवत पूजन करून श्री गणेशाची स्थापना करण्यात आली.
मातीच्या गणेश मूर्तींवर भर
पर्यावरण रक्षणासाठी ईको-फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन प्रशासनासह सामाजिक संघटनांनी केले. शाडू मातीच्या गणेश मूर्ती निर्मितीच्या कार्यशाळाही पार पडल्या. अनेक शाळांनीही पुढाकार घेतला. त्यामुळे मातीच्या गणेश मूर्तीची मागणी अनेक गणेशभक्तांनी केली. मागणीच्या तुलनेने मातीच्या मूर्ती कमी असल्याने त्यांच्या किमती वधारल्या होत्या
Post Views:
192