संवाद’ कोपरगाव विकासाचा: आ.काळेंचा हा अभिनव उपक्रम; नागरिकांशी साधला संवाद
Samvad’ of Kopargaon Development: This innovative initiative of A. Kale; Interaction with citizens
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onMon 18Sep24, 20.10Pm
By राजेंद्र सालकर
By राजेंद्र सालकर
कोपरगाव: आमदारकीचा चार वर्षाचा कार्यकाल पूर्णत्वाकडे जात असताना निवडणुकांची चाहूल लागल्याने संवाद’ कोपरगावच्या विकासाचा नावाचा कार्यक्रम घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. आशुतोष काळे यांनी शहरातल्या वेगवेगळ्या स्तरातील नागरिकांना जोडण्याचा प्रयत्न केला.संवाद या कार्यक्रमातून त्यांनी शहराच्या विकास कामांविषयीच्या नागरिकांच्या मनातील त्यांच्या संकल्पना आशुतोष काळे यांनी जाणून घेतल्या आहेत.
कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार विद्यमान आ. आशुतोष काळे यांनी सोमवारी (१८ )रोजी शहरातील कृष्णाई मंगल कार्यालयात शहरातील मान्यवर व्यक्तींना एकत्र करून,त्यांच्या शहराच्या विकासा विषयीच्या संकल्पना जाणून घेतल्या. तसेच गेल्या चार वर्षात आपण केलेली विकास कामांची,सध्या परिस्थिती काय आहे याची माहिती शहरातील नागरिकांना करून दिली. तुमच्या पाठिंब्यावर कोपरगाव जिल्हा कसा होईल हे ध्येय घेऊन निघालो आहे. असा खुलासा करताना कोपरगाव मध्यवर्ती असून रेल्वे, विमान, समृद्धी महामार्ग, अनेक राष्ट्रीय महामार्गामुळे, दळणवळणासाठी सर्वात चांगले शहर आहे त्यामुळे विकासात ते एक नंबर व्हावे,कोपरगाव जिल्हा कसा होईल हे ध्येय घेऊन याकरिता त्यांच्या असलेल्या संकल्पना जाणून घेण्यासाठी कोपरगावच्या विकासाचा संवाद’ हा सर्व स्तरातील मतदार वर्गाला जोडणारा एक नावीन्यपूर्ण असा संवादात्मक कार्यक्रम हाती घेतला आहे .
प्रास्ताविक मुख्याधिकारी तथा प्रशासक शांताराम गोसावी यांनी केले
या कार्यक्रमात प्रत्यक्ष संवाद आणि भेटीगाठींच्या माध्यमातून शहराच्या विकासाविषयी, तसेच विकासकामांविषयीच्या नागरीकांच्या मनातील त्यांच्या संकल्पना आशा आकांक्षा आशुतोष काळे यांनी जाणून घेतल्या आहेत. या कार्यक्रमाला चांगला प्रतिसादही मिळाला.
विधानसभा निवडणुकीत दिलेल्या वचनांच्या पूर्तीबाबत आपण चार वर्षात २३०० कोटीचा निधी मिळविला असून कोपरगाव शहराच्या विकासासाठी देखील जवळपास ३०० कोटी निधी देऊन कोपरगाव शहराचा देखील चेहरा मोहरा बदलवून वर्षानुवर्षापासून कुणालाही न सोडविता आलेला अत्यंत महत्वाचा असलेला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावून दिलेल्या वचनाची पूर्तता केली आहे. त्याबरोबर कोपरगाव शहराचा सर्वांगीण विकास करतांना धुळगाव ही संकल्पना पुसण्याचा प्रयत्न केला सर्व प्रमुख रस्ते, वैभवशाली शासकीय इमारती, ग्रामीण पोलीस स्टेशन इमारत व कर्मचारी वसाहत, सामाजिक सभागृह, अमरधाम, कब्रस्थान विकास, उद्यान विकास अशा विविध विकास कामांना कोट्यावधी निधी दिला आहे. ५ नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेचे काम प्रगतीपथावर असून बहुतांश रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. या सर्व सुरू असलेल्या विकास कामांसंदर्भात तसेच प्रलंबित असलेल्या विकास कामे हे जनतेसमोर मांडण्याबरोबरचत्यांच्या शहराच्या विकासा विषयीच्या संकल्पना जाणून घेतल्या. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पाच नंबर साठवण तलाव भूमिगत गटारी क्रीडा, साहित्य, इतिहास, उद्योग, पर्यटन, शिक्षण मूलभूत सुविधा यांसह अन्य विषयांचे अभ्यासक या कार्यक्रमाला उपस्थित होते.
आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहराविषयीच्या विकासाच्या संकल्पना, शहर प्रगतीच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी आमदार म्हणून काय प्रयत्न करणं गरजेचं आहे, याविषयीची मतं जाणून घेतली या कार्यक्रमाला शहरातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी काका कोयटे यांनी शहरातील विविध प्रश्नांचा आढावा घेताना कशा पद्धतीने गावाला गाव पण देता येईल यावेळी याबाबत घर असावे घराला घरपण असावे या छोट्याशा कवितेतून सविस्तर माहिती दिली. आपण कॅलिफोर्निया हे नाव का गमावले काळे कोल्हे यांच्या लढाईचा राज्यभर उल्लेख व्हायचा आज या लढाईने दंड थोपटण्याची पातळी गाठली आहे हे बरे नाही, हे चित्र बदलावे लागेल पालिका अधिकाऱ्यांनो पाण्यासाठी आम्हाला प्रशासकीय शब्दात गुंतवू नका, असा सज्जड इशारा त्यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे पाहत दिला. नेत्यामध्ये निधीसाठी चढाओढ असावी ही चांगली गोष्ट आहे ती पाहायला सध्या मिळत आहे. तर इंजिनीयर, डॉक्टर, व्यापारी, अभ्यासक, पत्रकार, वकील यांच्या वेगवेगळ्या बैठका घ्याव्यात म्हणजे खऱ्या अर्थाने प्रश्नांची उकल होईल, जी कामे झाली त्याच्या गुणवत्तेसाठी काय करणार ? अभ्यासक व निवृत्त कर्मचारी यांची एक समिती करा, असाही विचार त्यांनी मांडला. शहराच्या पाण्यासाठी विकासासाठी तुम्ही मंत्रीपदाचा त्याग केला. शिर्डीत उपजिल्हाधिकारी कार्यालय झाले आहे, तर एमआयडीसी तिकडेच होत आहे, तेंव्हा त्यात वेळ आणि पैसा खर्च करावा का ? त्याऐवजी जिल्हा व एमआयडीसीच्या बदल्यात आपल्याला आणखी काय मिळवता येईल ? यासाठी प्रयत्न केले पाहिजे, निळवंडे चे पाणी हे येऊ द्या, असा विचार करा असे ते म्हणाले, एसटी. स्टँडच्या परीसरात नियोजनबद्ध व्यापारी संकुल केले असते तर शहरातील ५०% युवकांना रोजगार मिळाला असता. आजही बीओटी तत्त्वावर त्या ठिकाणी गाळे बांधण्यासाठी प्रयत्न करावे, अशी ही मागणी कोयटे यांनी केली.
यावेळी अनिल सोनवणे यांनी कोपरगाव शहरात पूर परिस्थिती निर्माण झाल्यास बाहेर पडण्यासाठी रिंग रोडची मागणी केली तसेच पाणी योजने संदर्भातील अधिकाऱ्यांच्या फसव्या आकडेवारीवर थेट आक्षेप घेत आमदारांना अधिकाऱ्यांच्या कामावर लक्ष ठेवण्याची विनंती केली.
शुक्लेश्वर देवस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांनी शुक्लेश्वर देवस्थान या ठिकाणी जगातील पहिली प्रेम कथा घडली संजीवनी मंत्राचा उच्चार येथे झाला गुरु शुक्राचार्य यांचे येथे वास्तव्य होते. गुरू शुक्राचार्य संजीवनी विद्या ययाती देवयानी प्रेम कथा याचा थीम पार्क केल्यास कोपरगाव राज्याच्याच नव्हे तर देशाच्या व जगाच्या नकाशावर एक नंबर होईल अशी सूचना मांडली.
हिरालाल महानुभव यांनी शहरातील आरक्षित केलेल्या जागा विक्रीस काढल्यास आम्ही त्या विकत घेऊ असे सांगितले तर सुधीर डागा यांनी गावात पार्किंग व्यवस्था व वन’वे ची मागणी केली.
शहराच्या विकासाविषयी साधलेल्या संवादातून आ. आशुतोष काळे यांचा आपली नवी छबी नागरिकांच्या मनात उभी करण्याचा हा प्रयत्न आहे.
नगरपालिका मुख्याधिकारी तथा प्रशासक शांताराम गोसावी, शहर पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख, राज्य पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष काका कोयटे, माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे, पद्माकांत कुदळे, ज्येष्ठ नागरिक विजय बंब, अनिल सोनवणे, आदिनाथ ढाकणे, शुक्रेश्वर देवस्थान अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड, डॉ. कृष्णा फुलसुंदर, डॉ. राजेंद्र उंबरकर, डॉक्टर आतिश काळे,ॲड. विद्यासागर शिंदे,ॲड. देशमुख, ॲड. काजळे, विनायक गायकवाड, सचिन गवारे, अजय विघे, उमावती पाटील, उद्योजक रत्नपारखी, पीपल्स बँकेचे चेअरमन कैलासशेठ ठोळे, शिंदे शिवसेना जिल्हाप्रमुख विमल पुंडे, संगीता मालकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यासह विविध स्तरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट
अभियंता राजेंद्र मुंजे यांनी १३१ कोटीची पाणी योजना त्याचबरोबर शहरात दोन ठिकाणी बांधण्यात येणाऱ्या व्यापारी संकुलाबाबत पडद्यावर चित्रफित दाखवून माहिती दिली.
Post Views:
132