श्री क्षेत्र सराला बेट पवित्र उर्जास्थान -स्नेहलता कोल्हे
Shree Kshetra Sarala Island Holy Power Station – Snehlata Kolhe
सरला बेट विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही मंत्री गिरीश महाजन Minister Girish Mahajan will not let the funds for Sarla Island development go down
सरला बेट आणि कोल्हे परिवार एक अतूट नाते Sarla Island and the kolhe family have an unbreakable bond
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Thu 12Jan 24, 18.30Pm.By राजेंद्र सालकर
कोपरगाव : ब्र. योगीराज सदगुरू गंगागिरीजी महाराज यांनी शेकडो वर्षांपूर्वी सुरू केलेली अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा अखंड चालू आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र सराला बेट येथील संत-महंतांच्या आशीर्वादाने आम्हाला काम करण्याची ऊर्जा मिळते, असे प्रतिपादन माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केले.
सदगुरू श्री गंगागिरीजी महाराज यांच्या १२१ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह, श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व तुकाराम महाराज गाथा भजन सोहळ्याची सांगता गुरुवारी (११ जानेवारी) श्रीक्षेत्र गोदावरी धामचे मठाधिपती महंत प.पू. रामगिरीजी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने असंख्य भाविक-भक्तांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात झाली.
याप्रसंगी राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, रोहयो व फलोत्पादनमंत्री तथा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे, खासदार सदाशिव लोखंडे, वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे, दिनेशसिंह परदेशी, गोर्डे पाटील आदींसह सदगुरु श्री योगीराज गंगागिरीजी महाराज संस्थानचे विश्वस्त, पदाधिकारी, भक्त मंडळ तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, महंत प.पू. रामगिरीजी महाराज व स्नेहलता कोल्हे व अन्य मान्यवरांच्या हस्ते श्रीक्षेत्र गोदावरी धाम, सराला बेटला जोडणाऱ्या रस्त्याचे व इतर विविध कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन म्हणाले, श्रीक्षेत्र सराला बेट हे राज्यातील मोठे तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी लाखो भाविक येऊन नतमस्तक होतात. या भूमीतून प्रत्येकाला प्रेरणादायी ऊर्जा मिळते. श्रीक्षेत्र सराला बेटाच्या विकासासाठी आ. रमेश बोरनारे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचा शासनाकडे सतत पाठपुरावा सुरू असतो. या ठिकाणी येणाऱ्या भाविकांसाठी घाट, भव्य डोमचे बांधकाम व या तीर्थक्षेत्राला जोडणाऱ्या रस्त्याचे काम शासनाच्या वतीने लवकरात लवकर पूर्ण केले जाईल. त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, योगीराज सदगुरू गंगागिरी महाराज हे महान संत होते. लोकांचे दु:ख व अज्ञान दूर करून त्यांना भक्तिमार्ग दाखविण्यासाठी त्यांनी अखंड हरिनाम सप्ताह सुरू केले. ‘लेने को हरिनाम, देनेको अन्नदान। तरने को लीनता, डुबने को अभिमान॥’ हे त्यांचे ब्रीदवाक्य होते. ते स्वत: नेहमी याचे तंतोतंत पालन करीत असत. माजी मंत्री सहकारमहर्षी स्व. शंकरराव कोल्हे यांचे श्रीक्षेत्र सराला बेटाशी अतिशय जवळचे नाते होते. वै. नारायणगिरीजी महाराजांशी त्यांचे जिव्हाळ्याचे ऋणानुबंध होते. आजही कोल्हे परिवाराचे श्रीक्षेत्र सराला बेटाशी व मठाधिपती प. पू. रामगिरीजी महाराज यांच्याशी ऋणानुबंध कायम असून, प.पू. रामगिरीजी महाराज यांचे आशीर्वाद कायम कोल्हे परिवाराच्या पाठीशी आहेत हे आमचे परमभाग्य आहे.
मठाधिपती प. पू. रामगिरी महाराज त्यांच्या पुढाकारातून या ठिकाणी सद्गुरू श्री गंगागिरी महाराजांचे भव्य समाधी मंदिर उभारण्यात आले आहे. आज या ठिकाणी ब्र. गंगागिरीजी महाराज व नारायणगिरीजी महाराज यांच्या समाधीसमोर नतमस्तक होऊन मी धन्य झाले. श्रीक्षेत्र सराला बेट येथे अखंड हरिनाम सप्ताह, कीर्तन व धार्मिक सोहळ्यासाठी उभारण्यात येणाऱ्या डोम, घाट तसेच या तीर्थक्षेत्राला जोडणाऱ्या रस्त्यासाठी व अन्य विकास कामासाठी ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी शासनाच्या वतीने भरीव निधी दिला आहे. त्याबद्दल सर्व भाविक-भक्तांच्या वतीने मी त्यांचे मन:पूर्वक आभार मानते, असेही कोल्हे म्हणाल्या.
प्रारंभी संस्थानच्या वतीने महंत प.पू. रामगिरी महाराज यांनी मंत्री गिरीश महाजन, संदीपान भुमरे, स्नेहलता कोल्हे व अन्य मान्यवरांचे स्वागत केले. महंत प.पू. रामगिरी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी असंख्य भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
Post Views:
136