उबाठा’चे नगर उत्तर जिल्हा समन्वयक नितीन औताडे यांचा राजीनामा; ठाकरे गटाला कोपरगावात मोठा धक्का
Resignation of Ubatha’s Nagar North District Coordinator Nitin Autade; Big blow to Thackeray group in Kopargaon
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Sat10 Feb 24, 15.30Pm.By राजेंद्र सालकर
कोपरगाव : ‘उध्दव बाळासाहेब ठाकरे’ पक्षाचे उत्तर विभाग अहमदनगर जिल्हा समन्वयक नितीन औताडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे पाठविला आहे. संकुचित विचाराच्या वृत्तीमुळे आपल्याला पदाला न्याय देता येत नसल्याने व पक्षातील गटबाजीला कंटाळून आपण राजीनामा देत आहोत. आपण राजीनामा देत असलो तरी, एक शिवसैनिक म्हणून काम करणार आहोत, असे औताडे यांनी म्हटले आहे.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जनसंवाद यात्रेच्या तोंडावर नितीन औताडे यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.
जिल्हा समन्वयक नितीन औताडे यांनी शनिवारी (दि.१०) रोजी थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना राजीनामा पत्र दिले. त्यात त्यांनी म्हटले आहे की, अंतर्गत गटबाजीमुळे अनेक नव्या जुन्या शिवसैनिकांच्या विचारात भिन्नता आली. २०१७ मध्ये मी मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधल्यानंतर गेली ७ वर्ष पक्षाचे निष्ठेने काम केले.या ७ वर्षाच्या कालावधीत आलेल्या संपर्कातून आपल्या संयमी आणि प्रेमळ स्वभावाचा जवळून अनुभव घेता आला हे मी माझे भाग्य समजतो. गेल्या ७ वर्षात मला मा.आ.सुनील शिंदे व माजी ना. शंकराव गडाख यांचे मोलाचे सहकार्य लाभले, पक्षाचे निष्ठेने काम करून पक्ष संघटना वाढविण्याचा, तसेच पक्षातील गटबाजी संपविण्याचा मी प्रामणिक प्रयत्न केला. नव्या जुन्या शिवसैनिकाचा वाद गटबाजी संपुष्टात आणण्यासाठी अनेक बैठका लावल्या. मात्र कुणी कुणाला मागे सारून पुढे जातो की काय या संकुचित विचाराने गटबाजी सुरूच राहिली. ग्रामीण भागासह शहरात शिवसेनेचा मोठा वर्ग आहे.मात्र तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचा एकमेकात मेळ नसल्याने अनेक कार्यकर्ते पक्षातून निघून गेले तर काही कार्यकर्ते पक्षवाढीसाठी काम करतात मात्र त्यांना काम करू दिले जात नाही ही बाब अत्यंत खेदाची आहे. वरिष्ठ पातळीवर याचे आत्म चिंतन होणे गरजेचे आहे.अशा संकुचीत विचारांच्या कार्यकर्त्या बरोबर काम करणे यापुढे शक्य नसल्याने मी या पत्राद्वारे माझ्या जिल्हा समन्वयक या पदाचा राजीनामा देत आहे. आपण तो स्वीकारावा अशी नम्र विनंती केली आहे.
याबाबत त्यांच्याशी संपर्क साधला असता नितीन औताडे म्हणाले की, आपण सातत्याने प्रामाणिकपणे पक्ष वाढीसाठी प्रयत्न करीत होतो नुकतेच शहराच्या प्रश्नासाठी संपर्क कार्यालय सुद्धा सुरू केले होत. परंतु आपल्याला काम करताना वेळोवेळी काही संकुचित विचाराच्या लोकांकडून काम करण्यात अडचणी येत होत्या मुक्तपणे काम करता येत नसल्याबाबत आपण जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या कानावर सुद्धा या गोष्टी घातल्या होत्या परंतु त्यांच्याकडूनही काही कारवाई झाली नाही. त्यामुळे आपला केवळ आर्थिक वापर होतो की काय अशी भावना मनात निर्माण झाली. हा मनस्ताप नको म्हणून आपण आपल्या पदाचा राजीनामा देत आहोत, पण एक शिवसैनिक म्हणून यापुढेही काम करीतच राहणार असेही त्यांनी सांगितले.
तालुकाप्रमुख बाळासाहेब राहाणे यांना आपले समर्थक समजले जाते. आपण राजीनामा दिल्यामुळे त्यांचे काय ? असे विचारले असता औताडे म्हणाले, ते तालुकाप्रमुख पदावर चांगले काम करीत आहेत. त्यांचे काम व्यवस्थित सुरू आहे. त्यामुळे त्या बाबतीत मी बोलणे योग्य नाही असे म्हणून त्यांनी यावर ज्यादा भाष्य करणे टाळले.
नितीन औताडे हे जिल्हा परिषद पोहेगाव गटातील एक दमदार नेते आहेत. गेल्या पंधरा वीस वर्षापासून त्यांनी या भागात कधी कोल्हे यांच्या साथीने तर बऱ्याच वेळा प्रस्थापित राजकीय नेतृत्व असलेल्या काळे कोल्हे या राजकीय मातब्बरांशिवाय स्वबळावर ग्रामपंचायत असेल पंचायत समिती व जिल्हा परिषद गट व गणात स्वबळावर सातत्याने उमेदवार निवडून आणण्याचे काम केलेले आहे. गेल्या पंधरा वर्षापासून त्यांनी औताडे गटाच्या कार्यकर्त्याला बाजार समितीवर सन्मानाने प्रतिनिधित्व मिळवून देऊन आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. सहकार व शिक्षण सम्राट यांचा जिल्हा असलेल्या नगर जिल्ह्यात त्यांनी मोठ्या हिमतीने हिंदुरुदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे महाविद्यालयाची स्थापना करण्याचे धाडस दाखवले आहे.त्यांच्या असण्यामुळे उद्धव ठाकरे शिवसेनेला कोपरगाव मतदार संघाच्या दक्षिणेकडील ग्रामीण भागात चांगलेच बळ मिळाले होते. महिन्याभरापूर्वी संक्रांतीच्या मुहूर्तावर शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी शहरात शिवसेनेचे मध्यवर्ती कार्यालय नितीन औताडे यांनी सुरू केले होते. परंतु अवघ्या एका महिन्यात त्यांनी अचानक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या १४ तारखेच्या जनसंवाद यात्रेच्या तोंडावर नितीन औताडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने चर्चेला कोपरगाव शहर व ग्रामीण भागात उधाण आले आहे. नाही म्हंटले तरी ग्रामीण भागाचा विचार करता ठाकरे सेनेला हा मोठा धक्का आहे.
Post Views:
299