कोल्हेसह मातब्बर भाजप पदाधिका-यांची गैरहजेरी; लोखंडेच्या डोकेदुखीत वाढ
Absence of top BJP office bearers including Kolhe; Increase in Lokhande headache
भाजपच्या कोल्हेंची मंत्री केसरकर व दादा भुसेंकडून मनधरणीOpposition from Minister Kesarkar and Dada Bhusen of BJP’s Kolhen
वार्ता पत्र
Rajendara C. Salkar,News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! Fir 26April , 16.00 Pm.By राजेंद्र सालकर
कोपरगाव : कोपरगाव व शिर्डीमधील महायुतीच्या मेळाव्यापाठोपाठ सदाशिव लोखंडे यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमात कोपरगावसह शिर्डी तालुक्यातील माजी आमदार स्नेहलता कोल्हे व भाजपचे वजनदार युवा नेतृत्व विवेक कोल्हे यांच्या गैरहजेरीमुळे चर्चेला उधाण आले आहे. यामुळे सदाशिव लोखंडे यांच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे अशी जोरदार चर्चा रंगली आहे.
मागील पाच वर्ष भाजपाचेच कोल्हे विखे यांच्यात विधानसभेपासुनच ओढाताणीचे राहिले आहे. कोपरगाव मध्ये झालेल्या प्रत्येक जाहीर सभेत विखे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे यांच्या गॅरंटीचे सुतोवाच करून कोल्हे यांना डिवचण्याचा प्रयत्न केलेला आहे.
यानंतर विवेक कोल्हे यांनी थेट आव्हान देत शिर्डी मतदार संघात बाळासाहेब थोरात यांच्या मदतीने श्री गणेशनगर साखर कारखाना पाठोपाठ श्री साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटी निवडणुकीत यांच्या वर्चस्वाला धक्का देत उघड उघड शड्डू ठोकून घवघवीत यश मिळवून आव्हान देत शिर्डीतही आपले उपद्रवी मूल्य दाखवून दिले आहे भाजपातील या नेत्यांमध्ये फारसा एकोपा बघावयास मिळालेला नाहीय. त्यामुळे आजतागायत या दोघातील सांधा जुळू शकलेला नाही. कोपरगावच्या मेळाव्यास कोल्हे यांना टाळण्यात आल्याची चर्चा आहे
लोकसभेच्या निमित्ताने महायुतीचा उमेदवार म्हणून भाजपच्या नावाखाली व्यासपीठावर यावेच लागेल असे गृहीत धरून निमंत्रण द्यायचे नाही जनतेसमोर व्यासपीठावर कोल्हे यांची अनुपस्थिती असल्याचे चित्र उभे करायचे सर्वकाही आमदार आशुतोष काळे करीत असल्याचे भासवून विखे यांच्यांकडुन कोल्हे यांना कोंडीत पकडण्याची खेळी खेळली जात आहे. विशेष म्हणजे उमेदवार सदाशिव लोखंडे यांनी जाणीवपूर्वक ही दरी सांधण्याचा प्रयत्न केलेला नाही. त्यामुळे शिर्डी मेळाव्यात कोल्हे यांची अनुपस्थितीमुळे धुम्मस मात्र कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिर्डीत झालेल्या युतीच्या मेळाव्यात व शिंदे यांच्या कार्यक्रमात हा बेबनाव अधिक प्रकर्षाने दिसून आला. ना. राधाकृष्ण विखे यांच्याशी असलेल्या टोकाच्या मतभेदामुळे कोल्हे यांच्यासह कोपरगाव भाजपाचे पदाधिकारी संयुक्त मेळाव्याला अनुपस्थित असल्याची चर्चा आहे. परंतु यामुळे भाजपचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांचे टेन्शन मात्र, वाढलेले आहे.
मंत्री पदाच्या शर्यतीत स्पर्धा (अडचण) नको या एकमेव महत्त्वकांक्षेपोटी गत विधानसभेला जिल्ह्यातील अनेकांना पराभव पत्करावा लागला त्यात निवडून आल्या तर स्नेहलता कोल्हे यांचा मंत्रिपदावर प्रबळ दावा सर्वात मोठा राहिला असता. या भीतीपोटी त्यांचा अगदी हिशोबशीर पराभव केला गेला विधानसभेतील असा पराभव कोल्हेसह जिल्ह्यातील अनेकांच्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळे अनेकजण पराभवाची परतफेड करण्यासाठी आतुरतेने वाट बघत असल्याची चर्चा आधीपासूनच सुरू होती. आता लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातील त्यांची अनुपस्थिती या चर्चेला फोडणी देणारी ठरली आहे.
वारंवार येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आ. काळे यांची गॅरंटी विखे कोल्हे या दोन्ही नेत्यांमधील वादाला सत्ता संघर्षाची किनारदेखील आहे. एकंदरीत ना.विखे यांच्याशी असलेल्या मतभेदामुळेच कोल्हे मेळाव्याला गैरहजर राहिले असावेत, अशी देखील चर्चा आहे. सर्वात लक्षणीय बाब म्हणजे कोल्हे हे फडणवीसयांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी कोल्हेंनी आपली भूमिका अद्याप जाहीर केलेली नाही. त्यांच्या समर्थकांनीही आपले पत्ते अजून खुले केलेले नाहीत. राजकीय निरिक्षकांमध्ये ही वादळापुर्वीची शांतता तर नव्हे ना ? अशी चर्चा सुरू झाली आहे.
शिवसेनेच्या बळावर विजयी झालेले नंतर विखेंचे उमेदवार झालेले भाऊसाहेब वाकचौरे यांचा पराभव करून सदाशिव लोखंडे निवडून आले त्यावेळेस त्यांच्याबरोबर शिवसेना म्हणून अशोक काळे होते त्यामुळे त्यांना मताधिक्य मिळाले मात्र यावेळी कट्टर शिवसैनिक त्यांच्यासोबत नाही याचा त्यांना विसर पडलेला आहे त्यामुळे कट्टर शिवसैनिक आणि कोल्हे वजा एकटे काळे कोपरगावात मताधिक्य देतील हा भ्रमाचा भोपळा ठरू शकतो.
सदाशिव लोखंडे हे जरी आज महायुतीचे उमेदवार असले तरी ते विखेंचे उमेदवार म्हणून मिरवले जात असल्याने त्यांच्या अडचणीत मात्र वाढ झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. आता शेवटच्या टप्प्यात हे डॅमेज कंट्रोल करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.
लोकसभेची रणधुमाळी सुरू झालेली आहे.शिर्डी मतदारसंघात मात्र अतिशय शांतता बघायला मिळते आहे.विशेषतः कोपरगाव विधानसभा मतदारसंघात माजी आमदार सौ.स्नेहलता कोल्हे आणि विवेक कोल्हे यांनी आपले पत्ते अद्याप उघड केले नसल्याने एकच चर्चेला उधाण आले आहे.नक्की कुणाच्या पारड्यात कोल्हेंचे वजन पडणार आणि कोण मदतीला मुकणार याचे कोडे सुटत नसल्याने कुतूहल वाढले आहे. प्रत्येकजण कोल्हे माझ्याच पाठीशी राहतील असे भासवत आहे.विजयाची ग्वाही आणि मनसोक्त आकड्यांची उधळपट्टी कुणी इतर करत असले तरीही कोल्हे यांच्याशिवाय आपला विजयरथ कठीण आहे याची जाणीव उमेदवारांना असल्याने त्यांनी कोल्हेंच्या मनाचा ठाव घेण्याचा अनेकदा प्रयत्न केला आहे.
खासदार सदाशिव लोखंडे आणि माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे दोघेही कोल्हे यांच्या विविध कार्यक्रमात मंचावर दिसत आहेत.या निवडणुकीला किनार कोल्हे आणि विखे यांच्यात सुरू असलेल्या सुप्त संघर्षाची आहे यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत रंग भरणार अशी चर्चा सर्वत्र आहे.कोल्हे यांची मोठी ताकद कोपरगाव मतदारसंघात व शिर्डी परिसरात आहे याची कल्पना सर्वच पक्षांना आहे.
शिर्डी लोकसभेत आपले राजकीय महत्व शाबूत ठेवत कोल्हेंचे सावध पावले भल्या भल्यांना कोड्यात टाकणारे आहेत.इतर मतदारसंघात निवडणुकीचा झंझावात सुरू आहे. मात्र शिर्डी मतदारसंघात असणारी शांतता शिंदे गटाला अस्वस्थ करणारी आहे
भाजपच्या कोल्हेंची मंत्री केसरकर व दादा भुसेंकडून मनधरणी
शिर्डी लोकसभेची उमेदवारी शिवसेना शिंदे गटाला मिळाली आहे मात्र विखे आणि कोल्हे यांच्यातील वाद निवडणुकीतच भाजपमध्ये माेठ्या प्रमाणावर उफाळून आल्यामुळे युतीची डाेकेदुखी वाढली आहे. समजूत काढण्याची जबाबदारी मंत्री दीपक केसरकर सह दादा भुसे यांच्यावर साेपवण्यात आली आहे.
मंत्री दादा भुसे व शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी कोल्हे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेऊन तब्बल एक ते सव्वा तास चर्चा करूनही कोल्हे यांनी आपले मौन अद्यापही कायम ठेवल्याने व पत्ते उघड न केल्याने पुढे काय होणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
लोखंडे यांच्याबद्दल मतदारसंघात असलेली नाराजी, जोडीस शिवसैनिकांची वाणवा, रिपाईची नाराजी, कोल्हे यांची वेट अँड वॉच ही भूमिका लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभेमध्ये येणाऱ्या विधानसभा डोळ्यासमोर ठेवून संभवीत उमेदवारांची हातचे राखून काम करण्याची भूमिका घेतल्यामुळे शिंदे गटाची मोठी पंचाईत वाढली आहे. या पार्श्वभूमीवर सदाशिव लोखंडे यांच्या बाबतीत केवळ विखे यांच्यावर विसंबून न राहता शिंदे गटाने सावध भूमिका घेत कोल्हे यांची मनधरणी करण्यासाठी शिंदे गटाच्या दोन्ही मंत्र्यांनी कोल्हे यांच्या वस्तीवर जाऊन त्यांची घेतलेली भेट बरेच काही सांगून जाते