राजीनामे द्या, कामचुकार अधिकाऱ्यांना आमदार काळेंची तंबी, 

राजीनामे द्या, कामचुकार अधिकाऱ्यांना आमदार काळेंची तंबी, 

Resign, MLA Kale’s warning to defaulting officers,

काही समस्यांचा  समोरासमोर जागेवरच निपटारा अधिकाऱ्यांच्या कामाचे मोजमाप करणार 

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन!  , Mon17 Feb  19.30 Pm.By  सालकर राजेंद्र

कोपरगाव: नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपली नेमणूक झाली असल्याचे लक्षात घेऊन गावकीच्या राजकारणात न पडता लोकांची कामे करा यात कुचराई करणाऱ्या कामचुकार  अधिकाऱ्यांनी राजीनामे द्यावेत अशा कडक शब्दात आ.आशुतोष काळे यांनी अधिकाऱ्यांना  तंबी दिली.

काल सोमवारी पंचायत समिती (सर्व विभाग), पशु संवर्धन विभाग व शासकीय पशु पैदास केंद्र (वळूमाता) ह्या विभागातील अधिकाऱ्यांसह  आ.आशुतोष काळे यांनी प्रथमच पंचायत समिती कार्यालयात जनता दरबार घेतला.                               
 याप्रसंगी मतदार संघातील अनेक गावातील नागरीकांनी ग्रामसेवकांबद्दल आपल्या तक्रारी मांडल्या.त्यावेळी त्या तक्रारी सविस्तरपणे जाणून घेवून त्याबाबत संबंधित ग्रामसेवकाकडून माहिती घेतली असता समाधानकारक उत्तरे न मिळाल्यामुळे ऐरवी शांत असलेल्या आ.आशुतोष काळे यांनी जनता दरबारात मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या मतदार संघातील जनतेच्या समक्ष कामचुकार अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. संबंधित प्रश्नांचे जाब त्या त्या अधिकाऱ्यांना विचारून तिथेच त्या प्रश्नाला पूर्णविराम देवून त्यांनी जागेवरच नागरीकांचे प्रश्न मिटवले.
 या समस्यांमध्ये सर्वात जास्त प्रश्न घरकुलांचे होते. त्याचबरोबर जल जीवन योजनेचे काम, जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांची कायमस्वरूपीनेमणूक,रस्त्यांचे प्रश्न,आदिवासी बांधवाना घरकुल मिळावे, आरोग्य विभागाच्या समस्या, नवीन अंगणवाडी मंजूर करणे व जुन्या अंगणवाडी नूतनीकरण करणे, कायमस्वरूपी ग्रामसेवक मिळावा, विवाह नोंदणी वेळेवर केली जात नाही,स्मशानभूमी, शिक्षण विभाग, ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न तसेच कित्येक कोटींचा विकास निधी अखर्चित आदी प्रश्नांबाबत नागरिकांनी आपल्या समस्या आमदार काळेंच्या जनता दरबारात  मांडल्या. त्यावेळी आ. आशुतोष काळे यांनी तक्रारदार नागरिक व सबंधित ग्रामविकास अधिकारी यांना समोरासमोर घेवून अनेक नागरीकांच्या  समस्यांचा जागेवरच निपटारा केला .
आ. काळे म्हणाले की, सामान्य नागरिकाला पक्ष नसतो त्याला केवळ त्याच्या समस्या सुटणे हे महत्त्वाचे असते यासाठी जनता दरबाराच्या माध्यमातून कमीत कमी त्रासात नागरिकांचे प्रश्न सोडविणे सरकारी योजनांचा लाभ मिळवून देणे हा मुख्य उद्देश आहे आणि ते आपले कर्तव्य आहे. ते सर्वांनी व्यवस्थित बजावले तर जनता दरबार घेण्याची गरजच भासणार नाही आज जनता दरबारात मांडलेल्या प्रश्नांची प्रत अधिकाऱ्यांना देणार आहे व पुढच्या  जनता दरबारात मांडलेल्या समस्या व प्रश्नांचे पुढच्या जनता दरबारात मोजमाप करणारा असल्याचे स्पष्ट संकेत  यावेळी त्यांनी दिले  त्यामुळे पुढच्या जनता दरबारात या नागरीकांच्या तक्रारी पुन्हा येणार नाही याची गांभीर्याने काळजी घ्या असा सूचनावजा ईशारा आ.आशुतोष काळे यांनी उपस्थित पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना दिला.
प्रास्तविक पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुन काळे यांनी केले तर आभार राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर यांनी मानले.
यावेळी गटविकास अधिकारी संदीप दळवी, विविध विभागांचे प्रमुख, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व संलग्न संस्थांचे पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी जिल्हा परिषद-पंचायत समिती सदस्य, माजी नगरसेवक, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट :-
पोहेगावचे ग्रामविकास अधिकारी बेकरी व्यवसायासाठी ना हरकत दाखला देत नाही अशी कैफियत पोहेगावच्या रहिवासी सौ.अश्विनी किरण औताडे यांनी जनता दरबारात आ.आशुतोष काळे यांच्यापुढे माडंली. त्यावेळी आ.आशुतोष काळे यांनी पोहेगावचे ग्रामविकास अधिकारी राजेंद्र टिळेकर यांना त्याबाबत खुलासा मागितला.त्यावेळी मी दाखला देवू शकत नाही असे सांगत उडवाउडवीची उत्तरे दिली असता आ.आशुतोष काळे यांनी त्यांना चांगलेच खडसावत सबंधित महिलेला याच ठिकाणी ना हरकत दाखला द्या. तुम्हाला वाहनाची व्यवस्था उपलब्ध करून देतो तुम्ही तुमचे दफ्तर घेवून या असे सांगितले त्यावेळी ग्रामविकास अधिकारी राजेंद्र टिळेकर यांनी उद्याच सौ.अश्विनी किरण औताडे यांना बेकरी व्यवसायासाठी ना हरकत दाखला देतो असे सांगितले. त्यामुळे सौ.अश्विनी किरण औताडे यांचा मोठा प्रश्न जनता दरबाराच्या माध्यमातून सुटल्यामुळे त्यांनी आ.आशुतोष काळे यांचे आभार मानले.

Leave a Reply

You cannot copy content of this page