पराग संधान यांचा पलटवार : श्रेयासाठी बोंब मारणे बंद करा

पराग संधान यांचा पलटवार : श्रेयासाठी बोंब मारणे बंद करा

Parag Santhan’s Counterattack: Stop Clamoring for Credit

“बंद पडलेल्या पाणी योजना आम्ही सुरू केल्या; जनता सर्व जाणते,” विरोधकांना सबुरीचा सल्ला

Rajendara C. Salkar, Portal, वृत्तवेध ऑनलाईन,May 8 TFir.20.00 Pm.By  सालकर राजेंद्र 

कोपरगाव :शहरातील पाणीपुरवठा योजनांच्या श्रेयावरून सुरू झालेल्या आरोप-प्रत्यारोपांना उत्तर देताना नगराध्यक्ष पराग संधान यांनी विरोधकांवर जोरदार पलटवार केला आहे. “श्रेयासाठी बोंब मारणे बंद करा, पांचटपणा करू नका,” असा रोखठोक सल्ला देत त्यांनी विरोधकांची चांगलीच कानउघाडणी केली.

“दोन-तीन वर्षांपूर्वीच पाण्याच्या टाक्या पूर्ण झालेल्या होत्या. मग त्या सुरू का केल्या नाहीत? तुमचे हात कोणी बांधले होते का?” असा सवाल उपस्थित करत संधान म्हणाले, “जनतेने आम्हाला निवडून दिले ते कामे करण्यासाठी. धूळ खात पडलेल्या आणि बंद असलेल्या योजना सुरू करणे हे आमचे कर्तव्य आहे आणि आम्ही तेच करत आहोत.”

ते पुढे म्हणाले, “आम्ही कुठेही श्रेय मागितलेले नाही. आम्ही फक्त पूर्ण झालेल्या पण बंद पडलेल्या योजना कार्यान्वित करत आहोत. मात्र ज्यांना स्वतःला श्रेय घेता येत नाही, तेच आता आरोप करून प्रसिद्धीच्या झोतात येण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. चोराच्या मनात चांदणे असते, तसाच हा प्रकार आहे.”

गोरोबा नगर, बेट भाग, ब्रिजलाल नगर तसेच मुख्य जलकुंभाच्या टाक्या दोन-तीन वर्षांपूर्वीच पूर्ण झालेल्या होत्या, असे सांगत त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, “त्या वेळेस सत्ता तुमची होती, प्रशासन तुमच्या हातात होते, मग लोकांना पाणी का दिले नाही? केवळ कामे वाटणे आणि मलिदा लाटणे यातच सगळे गुंतले होते का?”

“जर या टाक्या वापरात आणल्या नसत्या, तर उन्हाच्या तडाख्यात त्या तडकल्या असत्या, गळती झाली असती आणि सरकारी पैसाही वाया गेला असता. उलट आम्ही सरकारचे पैसे वाचवले आणि जनतेला पाणी देण्याचे काम केले,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

“निधी कोण आणला यापेक्षा जनतेला त्याचा उपयोग कधी झाला, हे महत्त्वाचे आहे. लोकांना पाणी मिळाले, हीच खरी गोष्ट आहे. काम करणाऱ्याला जनता डोक्यावर घेते,”आम्हाला श्रेय घेण्याची गरज नाही, जनतेने आम्हाला निवडून दिले आहे.” असे सांगत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

शेवटी त्यांनी टोला लगावत म्हटले, “जरा सबुरीने घ्या. जनता नासमझ नाही, समजदार आहे. सर्व काही पाहते. त्यामुळे श्रेयासाठी बोंब मारणे बंद करा.”

Leave a Reply

You cannot copy content of this page