“आयत्या पिठावर रेघा कोण ओढतं, हे कोपरगावकरांना ठाऊक”
“The people of Kopargaon know exactly who tries to take unearned credit.”
पाणी योजनेच्या श्रेयावरून नगराध्यक्ष पराग संधान यांच्यावर नगरसेवक हाजीमेहमूद सय्यद यांचा घणाघात
Rajendara C. Salkar, Portal, वृत्तवेध ऑनलाईन,May 8 TFir.20.10 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव :कोपरगाव शहराच्या पाणी योजनेच्या श्रेयावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक हाजीमेहमूद सय्यद यांनी नगराध्यक्ष पराग संधान यांच्यावर जोरदार टीका करत, “आयत्या पिठावर रेघा कोण ओढतं, हे कोपरगावकरांना चांगलेच माहिती आहे,” असा टोला लगावला आहे.
आमदार आशुतोष काळे यांनी शहराचा तब्बल चाळीस वर्षांपासून प्रलंबित असलेला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी १३१.२४ कोटी रुपयांची महत्त्वाकांक्षी पाणी योजना मंजूर करून आणली. या योजनेत ५ नंबर साठवण तलावाची निर्मिती, ९५ किलोमीटर नवीन पाइपलाईन, १ ते ४ क्रमांकाच्या साठवण तलावांची दुरुस्ती, तसेच संजयनगर, ब्रिजलाल नगर, गोरोबा नगर, मोहनीराज नगर, साईबाबा कॉर्नर येथे नवीन जलकुंभ उभारणे आणि लक्ष्मीनगर येथील जुन्या टाकीची दुरुस्ती यांचा समावेश असल्याचे सय्यद यांनी स्पष्ट केले.
“आज शहरात उभ्या राहिलेल्या जलकुंभांमुळे कोपरगावकरांची तहान भागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हे सर्व आमदार आशुतोष काळे यांच्या प्रयत्नांमुळे शक्य झाल. मात्र या कामांचे उद्घाटन करून श्रेय घेण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे,” असा आरोप त्यांनी केला.
नगराध्यक्षांनी उद्घाटन करताना ‘आयत्या पिठावर रेघा ओढण्याची’ भाषा वापरणे हे वास्तवापासून दूर असल्याचे सांगत सय्यद म्हणाले, “काम मंजूर कोणी केले, निधी कोणी आणला आणि उद्घाटन कोण करत आहे, याचा विचार जबाबदार व्यक्तींनी करणे आवश्यक आहे.”
ते पुढे म्हणाले, “दुसऱ्यांनी मंजूर करून आणलेल्या कामाचे उद्घाटन करायचे आणि सर्व काही आम्हीच केले असे भासवायचे, हीच खरी आयत्या पिठावर रेघा ओढण्याची पद्धत आहे.”
कोपरगावकरांना चाळीस वर्षे तहानलेले कोणी ठेवले, हे जनतेला चांगलेच ठाऊक असल्याचे सांगत त्यांनी सर्व जलकुंभांची तातडीने चाचणी करून नागरिकांना पूर्ण दाबाने पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी केली. “थोडे पाणी चाचणीत वाया गेले तरी चालेल; पण पुन्हा जनतेला तहानलेले ठेवू नका,” असा इशाराही त्यांनी दिला.
Post Views:
8





