कोपरगाव :“समता नागरी सहकारी पतसंस्था ही केवळ आर्थिक संस्था नाही, तर हजारो कुटुंबांच्या विश्वासाची शिदोरी आहे. गेल्या ४० वर्षांत सभासदांनी समतावर जो विश्वास ठेवला, तोच आमची खरी ताकद आहे. संस्थेच्या सर्व ठेवी १०० टक्के सुरक्षित असून भविष्यातही अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि आधुनिक सेवा देण्याची आमची बांधिलकी कायम राहील,” असा ठाम विश्वास समता नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी व्यक्त केला.
समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या ४१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पुन्हा एकदा सभासदांनी संस्थेवर विश्वासाचा शिक्का उमटवला. स्व. यशवंतराव चव्हाण समता सहकार सभागृहात पार पडलेल्या सभेत संस्थेच्या आर्थिक प्रगतीचा ताळेबंद, नफातोटा पत्रक आणि विविध महत्त्वाच्या ठरावांना सभासदांनी हात वर करून एकमुखी मंजुरी दिली. दि. ३१ मार्च २०२६ अखेर संस्थेकडे तब्बल ११२८ कोटी रुपयांच्या ठेवी जमा असून ८२४ कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. ३१६ कोटी रुपयांची सुरक्षित गुंतवणूक करण्यात आली असून, जगातील सर्वाधिक सुरक्षित मानल्या जाणाऱ्या सोनेतारण कर्ज योजनेंतर्गत ५८५ कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. आर्थिक वर्षअखेर संस्थेला १३ कोटी रुपयांचा ढोबळ नफा झाल्याची माहिती सभेत मांडण्यात आली.
काका कोयटे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “सभासदांचा पैसा सुरक्षित ठेवणे हेच आमचे पहिले कर्तव्य आहे. पारदर्शक व्यवहार, मजबूत आर्थिक शिस्त आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यामुळेच समता आज राज्यातील विश्वासार्ह पतसंस्था म्हणून उभी आहे.”
व्हाईस चेअरमन अरविंद पटेल यांनी आपल्या मनोगतात समतेच्या आर्थिक बळावर भाष्य करत म्हटले, “समता म्हणजे कुबेराचा खजिना आहे. तो कधीही रिकामा होणार नाही. सभासदांच्या आशीर्वादाने तो आणखी भरत राहील.” त्यांच्या या वक्तव्याने सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.
प्रगत विविध कार्यकारी सोसायटीचे राजेंद्र गिरमे यांनी सांगितले की, समताच्या सहकार्याने सभासद शेतकऱ्यांसाठी अल्पदरात ड्रोनद्वारे औषध फवारणीचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा थेट लाभ मिळणार आहे.
सरव्यवस्थापक सचिन भट्टड यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे समताने राज्यात वेगळी ओळख निर्माण केल्याचे सांगितले. सेल्फ बँकिंग प्रणाली, व्हाऊचरलेस व्यवहार आणि मिस्ड कॉलवर ओटीपीद्वारे पैसे मिळण्याची सुविधा यामुळे व्यवहार अधिक वेगवान, सुरक्षित आणि पारदर्शक झाले आहेत. समता लिक्विडिटी बेस्ड प्रोटेक्शन स्कीमअंतर्गत ९९.९४ टक्के ठेवीदारांच्या ७० लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी पूर्णपणे सुरक्षित असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे सभासदांचा विश्वास अधिक दृढ झाल्याचे चित्र सभेत पाहायला मिळाले. सभेत सभासदांना १५ टक्के लाभांश जाहीर करण्यात आला. विशेष म्हणजे वार्षिक सभा संपताच लाभांशाची रक्कम थेट सभासदांच्या खात्यावर जमा करण्यात आली. मोबाईलवर एसएमएस प्राप्त होताच सभागृहात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
४० व्या वर्धापनदिनानिमित्त नफा वाटपातून २५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून सप्टेंबर महिन्यात सर्व सभासदांचा सन्मानपूर्वक सत्कार करून त्यांना भेटवस्तू देण्यात येणार असल्याची घोषणाही करण्यात आली.
चौकट : सभा संपताच खात्यात लाभांश; सभागृहात टाळ्यांचा कडकडाट
समता पतसंस्थेने सर्वसाधारण सभेत सभासदांना १५ टक्के लाभांश जाहीर केला. विशेष म्हणजे, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वार्षिक सभा संपताच लाभांशाची रक्कम थेट सभासदांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली. मोबाईलवर एसएमएस प्राप्त होताच सभागृहात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
सभेदरम्यान अनेक सभासद व ठेवीदारांनी संस्थेवर विश्वास दाखवत कोट्यवधी रुपयांच्या नवीन ठेवी जाहीर केल्या. याशिवाय ४० व्या वर्धापनदिनानिमित्त सप्टेंबरमध्ये सर्व सभासदांचा सन्मानपूर्वक सत्कार करून भेटवस्तू देण्यात येणार असल्याची घोषणा होताच टाळ्यांचा कडकडाट झाला.