पुणतांबा मंडळातील ६८०७ शेतकऱ्यांना १२.०२ कोटींचा दिलासा
Relief worth ₹12.02 crore for 6,807 farmers in the Puntamba circle.
अतिवृष्टीतील पिकनुकसान भरपाई मंजूर; पंतप्रधान पिक विमा योजनेतून थेट खात्यात रक्कम जमा होणार
Rajendara C. Salkar, Portal, वृत्तवेध ऑनलाईन,May 11 Mon.18.30 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव :कोपरगाव मतदारसंघातील पुणतांबा मंडळातील शेतकऱ्यांना मागील वर्षीच्या खरीप हंगामातील अतिवृष्टीचा मोठा दिलासा मिळाला आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांसाठी तब्बल १२ कोटी २ लाख रुपयांची पिक विमा नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली असून, सुमारे ६८०७ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत ही मदत मिळणार असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली.
मागील वर्षी खरीप हंगामात झालेल्या सततच्या अतिवृष्टीमुळे पुणतांबा परिसरातील अनेक शेतकऱ्यांची पिके काढणीच्या टप्प्यावर असतानाच पूर्णपणे भुईसपाट झाली होती. सोयाबीन, बाजरी, कापूस, तूर, मका तसेच इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले होते.
या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी महसूल व कृषी विभागाला सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर राज्य शासन आणि संबंधित विमा कंपनीकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला.
या प्रयत्नांना यश मिळत पुणतांबा मंडळातील ६८०७ शेतकऱ्यांसाठी १२.०२ कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. लवकरच ही रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचे सांगण्यात आले.
आमदार आशुतोष काळे म्हणाले, “शेतकरी हा देशाचा कणा आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीत महायुती शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त मदत मिळावी यासाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला. त्यातून ही मोठी मदत मंजूर झाली आहे.”
पिक विमा नुकसान भरपाईच्या रकमेने अतिवृष्टीमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी याबद्दल आमदार आशुतोष काळे यांचे आभार व्यक्त केले.
यावेळी आमदार काळे यांनी शेतकऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार , कृषी मंत्री दत्तात्रय भरणे तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले.
Post Views:
6





