महसूलची सेवा तुमच्या दारी’ प्रत्यक्षात; पोहेगाव–दहेगाव बोलक्यात महाराजस्व अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

महसूलची सेवा तुमच्या दारी’ प्रत्यक्षात; पोहेगाव–दहेगाव बोलक्यात महाराजस्व अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Revenue Services at Your Doorstep’ Becomes a Reality; Spontaneous Response to the ‘Maharajswa Abhiyan’ in Pohegaon and Dahegaon

आ. आशुतोष काळे यांच्या पुढाकारातून एकाच छताखाली शासकीय दाखले; विद्यार्थी, शेतकरी, महिला व ज्येष्ठांना मोठा दिलासा

Rajendara C. Salkar, Portal, वृत्तवेध ऑनलाईन,May 11 Mon.18.40 Pm.By  सालकर राजेंद्र

कोपरगाव :कोपरगाव मतदारसंघातील नागरिकांना आवश्यक असलेले शासकीय दाखले एकाच छताखाली, कमी वेळेत आणि कमीत कमी त्रासात उपलब्ध व्हावेत, या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिराला पोहेगाव आणि दहेगाव बोलका येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आ. आशुतोष काळे यांच्या पुढाकारातून आयोजित या शिबिरांमुळे ‘महसूलची सेवा तुमच्या दारी’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरल्याचे समाधानकारक चित्र पाहायला मिळाले.

महायुती शासनाच्या महाराजस्व अभियानांतर्गत नागरिकांचे महसूल व इतर शासकीय विभागांशी संबंधित प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी हे शिबिर आयोजित करण्यात आले. दहेगाव बोलका येथील महादेव मंदिर परिसरात आणि पोहेगाव येथील वक्रतुंड मंगल कार्यालयात झालेल्या शिबिरात शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.

उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला, जात प्रमाणपत्र, नॉन-क्रीमीलेअर, ई-रेशन कार्ड, उतारे, हयात प्रमाणपत्र आदी महत्त्वाची कागदपत्रे नागरिकांना एकाच दिवशी उपलब्ध करून देण्यात आली. यामुळे तहसील कार्यालयांच्या वारंवार फेऱ्या मारण्याचा त्रास वाचला असून वेळ आणि श्रम दोन्हींची मोठी बचत झाली आहे.

दहावी-बारावीचे निकाल नुकतेच जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची मोठी धावपळ टळली. विद्यार्थ्यांना उत्पन्न, रहिवासी, जात दाखले तसेच नॉन-क्रीमीलेअर प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांनाही हयात प्रमाणपत्र व ऑनलाईन प्रक्रियेची सुविधा मिळाल्याने वृद्धांना मोठा दिलासा मिळाला.

कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन प्रवीण शिंदे म्हणाले, “आ. आशुतोष काळे हे सर्वसामान्यांचे लोकप्रतिनिधी म्हणून सातत्याने काम करत आहेत. छोट्या-छोट्या दाखल्यांसाठी नागरिकांना अनेक दिवस तहसील कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत होते. आता सर्व सेवा एकाच ठिकाणी मिळत असल्याने नागरिकांचा मोठा त्रास वाचला आहे.”

आ. आशुतोष काळे यांच्या पुढाकारातून यापूर्वी कोकमठाण, पुणतांबा, सुरेगाव, रवंदे आणि दहेगाव बोलका मंडळातही अशी शिबिरे यशस्वीपणे पार पडली असून नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. प्रशासन अधिक लोकाभिमुख आणि पारदर्शक होत असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page