योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा; प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवा
Ensure schemes reach the last beneficiary; resolve pending issues immediately.
महा-राजस्व समाधान शिबिरात दोन्ही आमदारांचा प्रशासनाला सज्जड इशारा; लाभार्थ्यांना दाखले व धनादेशांचे वाटप
Rajendara C. Salkar, Portal, वृत्तवेध ऑनलाईन,May 16 Sat.2.00 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : तहसील कार्यालयाच्या वतीने शनिवारी येथील कलश मंगल कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज महा-राजस्व अभियानांतर्गत समाधान शिबिर उत्साहात पार पडले. शासनाच्या योजना केवळ कागदावर न राहता त्या प्रत्यक्ष शेवटच्या घटकापर्यंत पोहोचल्या पाहिजेत आणि सर्वसामान्यांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावले पाहिजेत, असा ठाम संदेश आमदार विवेक कोल्हे व आमदार आशुतोष काळे यांनी प्रशासनाला दिला.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले स्वागत प्रास्ताविक तहसीलदार महेश सावंत यांनी केले याचबरोबर त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी मान्यवरांचा सत्कार केला.
आमदार विवेक कोल्हे यांनी प्रशासनाला थेट धारेवर धरत सांगितले की, शासन लोकांच्या दारात गेले पाहिजे, हाच या अभियानाचा खरा हेतू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श नेतृत्वातून प्रशासनाने काम केले पाहिजे. केवळ बैठका घेऊन प्रश्न सुटत नाहीत, तर प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचून काम झाले पाहिजे. खंडकरी शेतकऱ्यांचे १९७७ पासूनचे जमीनप्रश्न, शिंगणापूरच्या ३५ कोटी रुपयांच्या अपूर्ण योजना तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जमिनीवरील प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावावेत, अशी मागणी त्यांनी केली.
सहा महिन्यांपासून शासनाच्या १५ हजार रुपयांच्या योजनेपासून वंचित असलेल्या नागरिकांना न्याय मिळाला पाहिजे. सत्तेत असो वा नसो, जनतेच्या प्रश्नांसाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आलो आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आमदार आशुतोष काळे यांनी शासनाच्या योजना प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत पारदर्शकपणे पोहोचल्या तरच अभियानाचा उद्देश सफल होईल, असे सांगितले. अधिकारी केवळ शिबिरांपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष गावपातळीवर जाऊन जनजागृती करावी, लाभार्थ्यांना योजनांची माहिती द्यावी आणि प्रत्येक गरजू व्यक्तीला लाभ मिळवून द्यावा, असे त्यांनी नमूद केले.
“शेवटच्या घटकापर्यंत लाभ पोहोचला तरच हे अभियान यशस्वी ठरेल. विकासकामांना कुठेही अडथळा येऊ नये, यासाठी महसूल विभागाने अधिक सक्रिय राहिले पाहिजे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
नगराध्यक्ष पराग संधान यांनी शासनाच्या योजना केवळ कागदावर न राहता प्रत्यक्ष लोकांच्या दारापर्यंत पोहोचल्या पाहिजेत, असे सांगितले. महिला बचत गटांना अधिक संधी देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
यावेळी उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर, तहसीलदार महेश सावंत, कृषी अधिकारी मनोज सोनवणे, भूमिमापन अधिकारी रवींद्र खराटे, महसूल नायब तहसीलदार चंद्रशेखर कुलथे, बाजार समिती सभापती साहेबराव रोहोम यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी, महिला बचत गट व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात विविध योजनांतील लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात दाखले व ५० हजार रुपयांच्या धनादेशांचे वाटप करण्यात आले. महिला बचत गटांनी उभारलेल्या स्टॉल्सना मान्यवरांनी भेट दिली. सूत्रसंचालन निवासी नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते यांनी केले.
या कार्यक्रमाचे आयोजक कोपरगाव मंडल अधिकारी मच्छिंद्र पोकळे,ग्राम महसूल अधिकारी प्रशांत हासे, इतर कोतवाल मंडल सहाय्यक यांनी परीश्रम घेतले
Post Views:
10