देवस्थान इनाम कायद्याविरोधात गुरव समाजाचा एल्गार

देवस्थान इनाम कायद्याविरोधात गुरव समाजाचा एल्गार

Gurav Community Launches Agitation Against the Devasthan Inam Act

हक्कांवर घाला सहन करणार नाही”; राज्यव्यापी आंदोलन, हरकती आणि धरणे आंदोलनाचा इशारा

Rajendara C. Salkar, Portal, वृत्तवेध ऑनलाईन,May 20 Wed1.00 Pm.By  सालकर राजेंद्र 

कोपरगाव : महाराष्ट्र शासनाने प्रस्तावित केलेल्या ‘देवस्थान जमीन इनाम’ संदर्भातील प्रारूप स्वतंत्र कायद्याविरोधात गुरव समाजाने आता आक्रमक भूमिका घेतली असून, राज्यभरातून संघटित लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. श्री क्षेत्र बोरमलनाथ येथे झालेल्या राज्यव्यापी निर्णायक बैठकीत इनाम वर्ग ३ जमीनधारक, पुजारी समाज आणि विविध हिंदुत्ववादी संघटनांनी सरकारच्या प्रारूप मसुद्यावर तीव्र आक्षेप नोंदवत मोठ्या आंदोलनाचा इशारा दिला.
अखिल गुरव समाज संघटना आणि अखिल गृह समाज संघटनेच्या संयुक्त पुढाकारातून आयोजित या बैठकीस राज्यभरातील समाजबांधवांची मोठी उपस्थिती होती. बोरमलनाथ देवांची आरती, दीपप्रज्वलन आणि प्रमुख देवतांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली.
प्रास्ताविकात बोरमलनाथ देवस्थान ट्रस्टचे आबासाहेब शेलार यांनी देवस्थान जमिनींच्या प्रश्नाची गंभीरता अधोरेखित केली. यावेळी अण्णासाहेब शिंदे यांनी सरकारचा प्रारूप मसुदा पुजारी समाजाच्या हिताला बाधा आणणारा असल्याचा आरोप करत, “ही केवळ कायद्याची लढाई नसून अस्तित्वाची लढाई आहे,” असे ठामपणे सांगितले. समाजाने मोठ्या प्रमाणात हरकती नोंदवून शासनाला आपली ताकद दाखवावी, असे आवाहनही त्यांनी केले.
मुकुंद आगलावे यांनी प्रारूप अधिनियमातील २२ कलमी मसुद्याचे सविस्तर विश्लेषण करत अनेक तांत्रिक त्रुटींवर प्रकाश टाकला. या कायद्यावरील हरकती नोंदविण्याची अंतिम मुदत ५ जून २०२६ असली तरी १ जूनपूर्वीच मोठ्या प्रमाणावर हरकती दाखल करण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला. तसेच विद्यमान ‘पुजारी संरक्षण कायदा’ आणि ‘ट्रस्ट कायदा सुधारणा’ यांची अंमलबजावणी जाणीवपूर्वक रखडवण्यात आल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
जय मल्हार क्रांती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दौलतनाना शितोळे यांनी मुख्यमंत्री स्तरावर या मसुद्याला विरोध नोंदविल्याचे सांगत, गरज पडल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला. हिंदुत्ववादी प्रतिनिधी ललित क्षीरसागर यांनी सरकारने प्रथम श्वेतपत्रिका जाहीर करावी, अशी मागणी करत या कायद्याचे नाव ‘मंदिर संरक्षण अधिनियम’ असावे, अशी भूमिका मांडली.
संघटनेचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष शितल शिंदे यांनी हिंदुत्वाचा जागर आणि देवस्थानांचे संरक्षण यासाठी समाजाने संघटित होण्याची गरज व्यक्त केली. तर राष्ट्रीय उपकार्यकारी अध्यक्ष जयदीप बारभाई यांनी “आज एकत्र आलो नाही, तर पुढील पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत,” असे सांगत समाजाला एकजुटीचे आवाहन केले.
बैठकीत प्रारूप आराखड्याविरोधात राज्यव्यापी दौरा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयांवर धरणे आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला. यावेळी सचिन रेणुकर यांची प्रदेश मानद अध्यक्षपदी, तर भिमराव गुरव यांची प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती जाहीर करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनंजय दरे यांनी केले. सभेस डॉ. रंगनाथ गुरव, सुभाष शिंदे, संतोष वाघमारे, मनिषा पांडे, श्रद्धाताई साखरे यांच्यासह राज्यभरातील पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page