फ्लेक्सबंदीच्या सुप्रीम कोर्ट आदेशाला अनुसरून कोपरगाव नगरपालिकेची नियमावली; नियम मोडल्यास थेट गुन्हे दाखल

फ्लेक्सबंदीच्या सुप्रीम कोर्ट आदेशाला अनुसरून कोपरगाव नगरपालिकेची नियमावली; नियम मोडल्यास थेट गुन्हे दाखल

Kopargaon Municipal Council’s Regulations in Compliance with the Supreme Court’s Order on the Ban on Flex Banners; Options for Violations Listed Below

शहर विद्रूपीकरण रोखण्यासाठी ३० ठिकाणे निश्चित; ८० फ्लेक्सनाच परवानगी, नगराध्यक्ष पराग संधान यांचा इशारा

Rajendara C. Salkar, Portal, वृत्तवेध ऑनलाईन,May 22 Fir19.00 Pm.By  सालकर राजेंद्र 

कोपरगाव : शहराचे विद्रूपीकरण, वाहतुकीला अडथळा आणि धार्मिक-सामाजिक वाद निर्माण करणाऱ्या अनधिकृत फ्लेक्सबाजीवर सर्वोच्च न्यायालयाने घातलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव नगरपालिकेने अखेर कठोर नियमावली लागू केली आहे. नगराध्यक्ष पराग संधान यांनी फ्लेक्स व्यावसायिकांची बैठक घेत स्पष्ट शब्दांत इशारा दिला की, “नियम पाळले तरच व्यवसाय चालेल; अन्यथा शहरात संपूर्ण फ्लेक्सबंदी अपरिहार्य ठरेल.”

शुक्रवारी दिनांक २२ मे रोजी सकाळी १२ वाजता नगरपालिकेच्या नगराध्यक्ष यांच्या दालनात नगराध्यक्ष पराग संधान,  मुख्याधिकारी सुहास जगताप, शहर पोलीस उपनिरीक्षक रोठे व नगरपालिका अधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत शहरातील फ्लेक्स व्यावसायिकांना नव्या नियमांची माहिती देण्यात आली. शहरात केवळ ३० ठराविक जागांवरच फ्लेक्स लावण्यास परवानगी देण्यात आली असून, एकूण ८० बोर्डांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. प्रत्येक बोर्डाची साईज १० बाय १२ इतकी ठेवण्यात आली आहे. एका बोर्डासाठी प्रतिदिन १८० रुपये शुल्क आकारले जाणार असून, साधारण फ्लेक्सला कमाल तीन दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

रस्त्यांचे कॉर्नर, विद्युत पोल, शासकीय मालमत्ता आणि सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या जागांवर फ्लेक्सला पूर्ण बंदी राहणार आहे. खाजगी जागेवर फ्लेक्स लावायचा असल्यास जागामालकाचे लेखी संमतीपत्र बंधनकारक करण्यात आले आहे.

श्रद्धांजली, जयंती, पुण्यतिथी आणि धार्मिक स्वरूपाच्या फ्लेक्सना शुल्कातून सूट देण्यात आली असली तरी त्यांनाही संख्या मर्यादा लागू राहणार आहे. मात्र अशा फ्लेक्सवर देवी-देवता, राष्ट्रपुरुष किंवा महापुरुषांचे फोटो वापरताना संबंधित प्रकाशक व फ्लेक्स व्यावसायिकांना विशेष अंडरटेकिंग द्यावे लागणार आहे. भविष्यात फ्लेक्समुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्या किंवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्रकाशक व फ्लेक्स व्यावसायिकांची राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

प्रत्येक फ्लेक्सवर प्रकाशक आणि प्रिंटरचे नाव लिहिणे सक्तीचे करण्यात आले असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाकडून थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. शहरभर विनापरवाना झळकणारे भलेमोठे फ्लेक्स, वाढत्या तक्रारी आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे नगरपालिकेला ही कठोर भूमिका घ्यावी लागल्याचे नगराध्यक्ष पराग संधान यांनी स्पष्ट केले.

“फ्लेक्स व्यवसायिक आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कामगारांचाही विचार करूनच नियंत्रित स्वरूपात परवानगी दिली आहे. मात्र शहराची शांतता, सौंदर्य आणि कायदा सुव्यवस्था धोक्यात घालणाऱ्यांना कोणतीही माफी दिली जाणार नाही,” असा स्पष्ट इशाराही नगराध्यक्षांनी बैठकीत दिला.

Leave a Reply

You cannot copy content of this page