एकल महिलांसाठी झटणाऱ्या संगीता मालकर यांना ‘अहिल्याबाई होळकर’ पुरस्कार
‘Ahilyabai Holkar’ Award for Sangita Malkar, who champions the cause of single women.
महिला सक्षमीकरणाच्या कार्याची शासनाकडून दखल; पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते सन्मान
Rajendara C. Salkar, Portal, वृत्तवेध ऑनलाईन,May 23 Sat1.50 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : एकल महिला आणि बालकांच्या सक्षमीकरणासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या संगीता मालकर यांना महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागातर्फे सन २०२४-२५ चा जिल्हास्तरीय ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.
सावित्रीबाई फुले प्रतिष्ठानच्या अध्यक्षा तसेच साऊ एकल महिला समिती महाराष्ट्र राज्याच्या तालुका समन्वयक म्हणून कार्यरत असलेल्या मालकर यांनी तालुक्यातील एकल महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी विविध उपक्रम राबविले आहेत. महिलांना शिलाई मशीन, शेळ्यांचे वाटप, आरोग्य शिबिरे, सॅनिटरी नॅपकिन तसेच कडधान्यांचे वितरण करण्यात त्यांनी पुढाकार घेतला. एकल महिलांच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि उच्च शिक्षणासाठी लॅपटॉप उपलब्ध करून देण्याचे कामही त्यांनी केले आहे.
विशेष म्हणजे, शिक्षक गुणगौरव पुरस्कारातून मिळालेली एक लाख दहा हजार रुपयांची रक्कम स्वतःसाठी न वापरता त्यांनी गरजू महिलांना शिवणयंत्रे देण्यासाठी खर्च केली. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य महिला आयोगानेही नुकताच त्यांचा गौरव केला होता.
कार्यक्रमास आमदार विठ्ठलराव लंघे पाटील, आमदार अमोल खताळ, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
Post Views:
14