वादळी पावसाने कोपरगाव तालुका हादरला; पंचनामे करा आ. आशुतोष काळेंच्या सूचना
Kopargaon Taluka Rocked by Stormy Rains; MLA Ashutosh Kale Directs Officials to Conduct Damage Assessments.
घरांचे पत्रे उडाले, भिंती कोसळल्या; नुकसान
Rajendara C. Salkar, Portal, वृत्तवेध ऑनलाईन,May 23 Sat1.00 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी अचानक आलेल्या विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याने अनेक गावांना जबर तडाखा बसला. अवघ्या काही मिनिटांच्या वादळी पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक घरांचे पत्रे उडून गेले, तर काही ठिकाणी घरांच्या भिंती कोसळल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक कुटुंबांच्या संसारोपयोगी वस्तू उघड्यावर पडल्याने नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
वादळामुळे तालुक्यातील अनेक भागांत झाडे उन्मळून पडली. अनेक ठिकाणी विजेचे खांब वाकले असून वीजवाहिन्या तुटल्याने काही गावांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे नागरिकांना अंधारात रात्र काढावी लागली. काही ठिकाणी रस्त्यांवर झाडे पडल्याने वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला होता. ग्रामस्थांनी स्वतः पुढाकार घेत रस्ते मोकळे करण्याचे प्रयत्न केले.
वादळी वाऱ्याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. काढणीला आलेल्या डाळिंब बागांसह इतर फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच साठवणुकीसाठी झाकून ठेवलेल्या कांद्यावरील आच्छादन उडून गेल्याने कांदा भिजला असून शेतकऱ्यांचे अतोनात आर्थिक नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी नुकतीच काढणी केलेली पिके उघड्यावर असल्याने त्यांचेही नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे.
या पार्श्वभूमीवर आमदार आशुतोष काळे यांनी महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मतदारसंघातील एकही नुकसानग्रस्त शेतकरी अथवा नागरिक पंचनाम्यापासून वंचित राहू नये, याची काळजी घ्या, असे स्पष्ट निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.
नुकसानग्रस्तांना शासनाकडून जास्तीत जास्त आर्थिक मदत व नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचेही आ. काळे यांनी सांगितले. तसेच पंचनाम्यांमध्ये कोणतीही दिरंगाई अथवा दुजाभाव होऊ नये, असेही त्यांनी अधिकाऱ्यांना बजावले.
Post Views:
11





