चारधाम यात्रा पूर्ण करून परतलेल्या तृतीयपंथीयांचे कोपरगावात जल्लोषात स्वागत
Transgender individuals returning after completing the Char Dham Yatra receive a jubilant welcome in Kopargaon.
१६ यात्रेकरूंची तीन रथांतून शाही मिरवणूक; गोदावरी तीरावर गंगापूजन, नगराध्यक्ष पराग संधान यांच्या हस्ते महाआरती
Rajendara C. Salkar, Portal, वृत्तवेध ऑनलाईन, Jun 2 Tue 20.00 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव, : तृतीयपंथीय समाजातील १६ जणांनी अवघ्या २५ दिवसांत चारधाम यात्रा पूर्ण करून परतल्यानंतर त्यांच्या स्वागतार्थ मंगळवारी कोपरगाव शहरात भव्य शाही मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. तीन आकर्षक रथांमधून यात्रेकरूंची काढण्यात आलेली मिरवणूक, ढोल-ताशांचा गजर आणि गोदावरी तीरावर झालेल्या गंगापूजनामुळे शहरात दिवसभर भक्तिमय वातावरण निर्माण झाले.
कृष्णाई मंगल कार्यालय येथून सकाळी कलश यात्रेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर चारधाम यात्रा पूर्ण केलेल्या १६ यात्रेकरूंना तीन सजविलेल्या रथांमध्ये विराजमान करून शहरातील प्रमुख मार्गांवरून शाही मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत तृतीयपंथीय समाजातील सदस्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. ढोल-ताशांच्या तालावर नृत्य करत त्यांनी यात्रेचा आनंद साजरा केला.
मिरवणूक मार्गावर नागरिकांनी यात्रेकरूंचे स्वागत करत शुभेच्छा दिल्या. तृतीयपंथीय समाजाची इतक्या मोठ्या प्रमाणावर काढण्यात आलेली ही मिरवणूक शहरवासीयांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली.
यानंतर मिरवणूक गोदावरी नदी तीरावर पोहोचली. येथे चारधाम यात्रा यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याबद्दल गंगा मातेला कृतज्ञतापूर्वक अभिवादन करण्यात आले. विधिवत गंगापूजन करून यात्रेचा समारोप करण्यात आला.
या सोहळ्यास सिन्नर येथील जुना आखाड्याचे महामंडलेश्वर महापवित्रनंदगिरी महाराज यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी धर्म, संस्कार आणि सामाजिक ऐक्य याविषयी मार्गदर्शन केले. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले.
यावेळी कोपरगावचे नगराध्यक्ष पराग संधान तसेच नगरसेवकांच्या हस्ते गोदावरी तीरावर महाआरती करण्यात आली. आरतीनंतर उपस्थितांनी गंगा मातेला वंदन करत यात्रेच्या यशस्वी पूर्ततेबद्दल आनंद व्यक्त केला.
गुरूवर्य पिंकी गुरू (श्रीरामपूर), गुरूवर्य शिल्पा गुरू (कोपरगाव), गुरूवर्य किरण गुरू सोनवणे, सायली ताई तसेच कोपरगाव, श्रीरामपूर आणि अहिल्यानगर येथील तृतीयपंथीय समाजाच्या सदस्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. अशी माहिती राजेश्वरी शिंगाडे यांनी दिली.
श्रद्धा, अध्यात्म आणि सामाजिक समरसतेचा संदेश देणारा हा आगळावेगळा सोहळा कोपरगावच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनात विशेष ठरला.
Post Views:
2





