‘ “मी शंभर दिवसांचा हिशोब देतो; तुम्ही ४००० कोटींचा द्या!-“पराग संधान
“I will account for my hundred days; you account for the ₹4,000 crore!” — Parag Sandhan
विकासकामांवर ठाम भूमिका, आरोपांना परखड उत्तर
Rajendara C. Salkar, Portal, वृत्तवेध ऑनलाईन,Jun 3Wed 19.20 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव :“सोशल मीडियावर एआयच्या माध्यमातून फोटो टाकून जनतेची दिशाभूल करता येईल; पण विकासाची वास्तवता लपवता येणार नाही. मी माझ्या शंभर दिवसांचा हिशोब जनतेसमोर देतो, तुम्ही ४००० कोटी रुपयांचा हिशोब द्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावर या आणि जनतेसमोर चर्चा करूया,” असे जाहीर आव्हान देत नगराध्यक्ष पराग संधान यांनी आमदार आशुतोष काळे व त्यांच्या समर्थकांवर जोरदार हल्लाबोल केला.
भारतीय जनता पक्षाच्या संपर्क कार्यालयात बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत नगराध्यक्ष संधान यांनी आपल्या शंभर दिवसांच्या कामकाजाचा लेखाजोखा मांडताना विरोधकांवर सडकून टीका केली. “४००० कोटी रुपयांचा निधी आणल्याचे फ्लेक्स लावून छाती ठोकणाऱ्यांनी तालुक्यात फिरून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामांची अवस्था पाहावी. दर्जाहीन कामांमुळे जनतेत प्रचंड नाराजी आहे. त्यामुळेच गेल्या वर्षभरापासून फ्लेक्सबाजी करणारे आता शांत झाले आहेत,” अशी खिल्लीही त्यांनी उडवली.
पालिका सक्षम असताना ६८ कोटी रुपये सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यामागचे कारण काय, असा सवाल उपस्थित करत संधान म्हणाले, “जनतेला दिलेला शब्द आम्ही पाळत आहोत. शंभर दिवसांत अनेक कामांना गती दिली. दर्जाहीन कामे खपवून घेणार नाही. आता आम्ही थांबणार नाही. जे काम करणार, त्याचे श्रेयही आम्हीच घेणार.”
विरोधकांकडून होत असलेल्या आरोपांवर पलटवार करतांना त्यांनी म्हटले, “गुंडांची पार्टी कोणती याचे आत्मपरीक्षण विरोधकांनी करावे. जुन्या बिलांसाठी दबाव टाकला जात आहे. वरच्या स्तरावरूनही दबाव आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत; मात्र मी जनतेच्या पैशाची उधळपट्टी होऊ देणार नाही.” तळ्यातल्या माशांचे टेंडर घेतलं ना ? मग आधी पैसे भरा, तळ्यातले मासे काढायचे विकायचे आणि पैसे भरायचे हे चालणार नाही असे त्यांनी ठणकावून सांगितले.
दोन-दोन वर्षांपासून रखडलेल्या कामांना गती दिल्याचा दावा करत संधान यांनी नगरपालिकेच्या नव्या इमारतीतील अग्निसुरक्षा यंत्रणेचे उदाहरण दिले. “इमारत पूर्ण होऊन वर्षानुवर्षे झाली; पण फायर सेफ्टीचा विचार झाला नव्हता. आम्ही ६५ लाखांचा निधी मंजूर करून घेतला असून लवकरच नव्या इमारतीत स्थलांतर करू,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
स्वच्छता आणि आरोग्य व्यवस्थेत मोठे बदल केल्याचा दावा करताना त्यांनी सांगितले की, आरोग्य विभागातील कर्मचारी संख्या १३४ वरून १७५ करण्यात आली आहे. महिला कर्मचाऱ्यांची संख्या ४५ वरून ८० पर्यंत वाढविण्यात आली. घंटागाड्यांची संख्या १७ वरून १९ करण्यात आली असून बायोमेट्रिक उपस्थितीमुळे कर्मचारी प्रत्यक्ष कामावर येत असल्याची खात्री होत आहे.
नालासफाई, फवारणी, पाणीपुरवठा, खड्डेमुक्ती, शौचालय उभारणी, जलशुद्धीकरण क्षमता वाढविणे, महिलांसाठी वॉशरूम उभारणी आणि फळ मार्केट सुरू करण्याच्या योजनांचाही त्यांनी यावेळी आढावा घेतला. “आम्ही कोणत्याही प्रभागाचा भेदभाव करणार नाही. कोपरगावच्या ८० हजार नागरिकांचा नगराध्यक्ष म्हणून संपूर्ण शहराचा समान विकास करू,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
प्लास्टिक बंदी, थर्माकोल बंदी, सिल्व्हर कोटिंग पत्रावळींवरील निर्बंध आणि पार्किंग नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
या पत्रकार परिषदेला नगरसेवक अतुल काले, कालू आप्पा आव्हाड, रवी कथले, सुरेखा राक्षे, विजया देवकर, निलोफर पठाण, बबलू वाणी, संदीप देवकर, विनोद राक्षे, कलविंदरसिंग दडीयाल, कैलास मंजुळ, संजय उदावंत यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Post Views:
16





