पर्यावरण दिनी शिवसेनेचा सरकारवर घणाघात; ‘काँक्रीटच्या विकासाने निसर्गाचा गळा घोटला’ — गगन हाडा
Shiv Sena lashes out at the government on Environment Day; ‘Concrete-led development has strangled nature’ — Gagan Hada
‘रोपे आम्ही लावायची… आणि सरकारने जंगलं तोडायची?’
Rajendara C. Salkar, Portal, वृत्तवेध ऑनलाईन,Jun5Fir 16.40 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव “एकीकडे आम्ही तरुणांमध्ये पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत तुलसीची रोपे वाटत आहोत, तर दुसरीकडे सरकारच्या आशीर्वादाने जंगलांची उघड्याडोक्याने कत्तल सुरू आहे. हा दुटप्पीपणा आता सहन केला जाणार नाही,” अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख गगन हाडा यांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सरकारच्या धोरणांवर जोरदार हल्लाबोल केला.
वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शताब्दी वर्षानिमित्त शुक्रवारी ५जुन रोजी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने कोपरगाव येथील के. जे. सोमय्या व एस. जी. एम. महाविद्यालयात प्राचार्य व प्राध्यापकांना तुलसी रोपांचे वितरण करण्यात आले. यावेळी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
गगन हाडा म्हणाले, “सरकार विकासाच्या नावाखाली लाखो झाडांची कत्तल करत आहे. जंगले तोडून सिमेंटची जंगले उभी केली जात आहेत. दरवर्षी कोट्यवधी झाडे लावल्याचे कागदी दावे केले जातात; मात्र प्रत्यक्षात डोंगरच्या डोंगर बोडके होत आहेत. ही झाडे नेमकी गेली कुठे? त्यांचे संगोपन का झाले नाही? याचे उत्तर सरकारकडे नाही.”
ते पुढे म्हणाले, “आज तापमान ४५ अंशांच्या पुढे गेले आहे. पाण्याचे स्त्रोत आटत आहेत. जंगलतोडीमुळे बिबट्यांसारखे वन्यप्राणी गावांकडे येत आहेत. या मानवनिर्मित संकटांना सरकारची निसर्गविरोधी धोरणेच जबाबदार आहेत.”
“आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे शिवसैनिक आहोत. आम्ही फक्त झाडे लावणार नाही, तर निसर्ग उद्ध्वस्त करणाऱ्या धोरणांविरोधात रस्त्यावर उतरून आवाजही उठवू,” असा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी युवासेनेचे निखिल क्रंकाळे, पाटील ऋषी खैरनार, वैभव शेलार, काना हाडा, विनय टाक, आबासाहेब पवार, याकूब शेख, गणेश वहाडणे, ओम सुरळकर, शंतनू चावरिया, वरुण टाक, रिहान शेख, राहुल लख्खन यांच्यासह शिवसैनिक व युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views:
3





