मतदानाचा खेळ संपला; नगरच्या राजकारणातील गणिते कोसळली!’

मतदानाचा खेळ संपला; नगरच्या राजकारणातील गणिते कोसळली!’

The voting game is over; the political calculations in Nagar have collapsed!

अखेरच्या क्षणी माघारींचे नाट्य; प्राजक्त तनपुरे बिनविरोध, पण साडेचारशे मतदारांचा हिरमोड

Rajendara C. Salkar, Portal, वृत्तवेध ऑनलाईन,Jun5Fir 16.10 Pm.By  सालकर राजेंद्र 

कोपरगाव:विधान परिषद निवडणुकीच्या अखेरच्या क्षणापर्यंत रंगलेल्या राजकीय नाट्यानंतर अखेर प्राजक्त तनपुरे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आणि नगर जिल्ह्यातील अनेक राजकीय अपेक्षांवर अक्षरशः पाणी फिरले.

गुरुवार, दि. ४ जून रोजी राज्यभरात विधान परिषद निवडणुका बिनविरोध व्हाव्यात यासाठी सत्ताधारी पक्षांसह सर्वच राजकीय हालचालींना वेग आला होता. नगर जिल्ह्यातही शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय समीकरणे बदलत होती. अखेर जगताप-पानसरे यांनी माघार घेतल्याने प्राजक्त तनपुरे यांचा मार्ग मोकळा झाला आणि निवडणूक बिनविरोध झाली.

मात्र या घडामोडींमुळे सर्वाधिक हिरमोड झाला तो नगर जिल्ह्यातील सुमारे साडेचारशे मतदारांचा. सहा वर्षांतून एकदाच येणारी मतदानाची संधी अनेकांच्या हातातून निसटली. काही नगरसेवकांची पूर्ण टर्म संपते; पण विधान परिषद निवडणूक येत नाही, तर काहींना निवडून आल्यानंतर लगेच मतदानाचा अधिकार बजावण्याची संधी मिळते. त्यामुळे ही निवडणूक केवळ राजकीय नसून प्रतिष्ठा आणि प्रभावाचे प्रतीक मानली जाते.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघातील निवडणुकांमध्ये मतांना मोठी किंमत असते. राजकीय गाठीभेटी, पडद्यामागील हालचाली आणि आर्थिक उलाढालींच्या चर्चांमुळे अशा निवडणुकांकडे अनेकांचे लक्ष लागलेले असते. नगर जिल्ह्यातही यंदा मोठी आर्थिक उलाढाल होईल, अशी चर्चा रंगली होती.

परंतु अखेरच्या क्षणी झालेल्या नाट्यमय घडामोडींनी संपूर्ण समीकरणच बदलले. मतदान होणार नसल्याचे स्पष्ट होताच अनेकांचे राजकीय मनसुबे धुळीस मिळाले, तर काहींनी डोळ्यांसमोर उभे केलेले आर्थिक इमले क्षणात कोसळल्याची चर्चा आता दबक्या आवाजात सुरू झाली आहे.

एकीकडे प्राजक्त तनपुरे यांच्या बिनविरोध निवडीचे स्वागत होत असले, तरी दुसरीकडे “मतदानाची संधी हुकली” याची खंत अनेक नगरसेवक आणि राजकीय इच्छुकांमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page