कोपरगाव बाजार समितीत सत्ताधाऱ्यांमध्येच बंड अनागोंदी कारभार, आर्थिक उधळपट्टीचा आरोप;
Rebellion within the ruling faction at the Kopargaon Market Committee; allegations of chaotic administration and financial extravagance.
उपसभापतींसह काही सदस्यांचे सामूहिक राजीनामे
Rajendara C. Salkar, Portal, वृत्तवेध ऑनलाईन,Jun6Sat 19.30 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुरू असलेल्या कथित अनागोंदी कारभार, आर्थिक उधळपट्टी आणि शेतकरी हिताकडे होत असलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ विद्यमान उपसभापती गोवर्धन परजणे यांच्यासह काही सदस्यांनी सामूहिक राजीनामे दिल्याने बाजार समितीच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या निर्णयामुळे शेतकरी व व्यापारी वर्गातही विविध चर्चांना उधाण आले आहे.
उपसभापती गोवर्धन परजणे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकऱ्यांची कामधेनू असून आमदार आशुतोष काळे यांनी शेतकरी हित जोपासण्याच्या उद्देशाने आमच्यावर जबाबदारी सोपविली होती. मात्र गेल्या काही महिन्यांपासून बाजार समितीत उत्पन्नाचा कोणताही विचार न करता मोठ्या प्रमाणावर अनावश्यक खर्च केला जात असून आर्थिक शिस्त पूर्णपणे ढासळली आहे. सभापतींच्या सध्याच्या कारभारामुळे संस्था आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर पोहोचण्याची भीती निर्माण झाली असल्याचा आरोप त्यांनी केला.
“आम्हाला पदापेक्षा शेतकऱ्यांचे हित आणि संस्थेची प्रतिष्ठा अधिक महत्त्वाची आहे. शेतकऱ्यांच्या हिताच्या योजनांवर खर्च करण्याऐवजी गरज नसलेल्या बाबींवर निधी खर्च केला जात आहे. त्यामुळे संस्थेची आर्थिक घडी विस्कटण्याचा धोका निर्माण झाला आहे. या चुकीच्या कारभाराचे भागीदार होण्यापेक्षा आम्ही स्वखुशीने राजीनामा देण्याचा कठोर निर्णय घेतला,” असे परजणे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, बाजार समितीतील या घडामोडींमुळे राजकीय वातावरण तापले असून सभापतींच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आगामी काळात या प्रकरणावरून बाजार समितीमध्ये आणखी संघर्ष वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Post Views:
4





