अतिक्रमणावर अखेर बुलडोझर; पालिकेची ‘थातूरमातूर’ कारवाई अंगलट

अतिक्रमणावर अखेर बुलडोझर; पालिकेची ‘थातूरमातूर’ कारवाई अंगलट

Bulldozer finally rolls in on encroachments; Municipal body’s ‘half-hearted’ action backfires.

सकल हिंदू समाजाच्या इशाऱ्यानंतर प्रशासन जागे; सर्वे क्रमांक २१५ मधील अतिक्रमणावर मोठी मोहीम

Rajendara C. Salkar, Portal, वृत्तवेध ऑनलाईन,Jun6Sat 19.40 Pm.By  सालकर राजेंद्र 

कोपरगाव : शहरातील सर्वे क्रमांक २१५ मधील सुमारे २२ गुंठे जागेवरील अतिक्रमण प्रकरण अखेर पालिका प्रशासनाच्या अंगलट आले असून सकल हिंदू समाजाच्या आक्रमक भूमिकेनंतर शुक्रवारी सकाळी नगरपालिकेला मोठी अतिक्रमण हटाव कारवाई करावी लागली. विशेष म्हणजे अवघ्या अकरा दिवसांपूर्वी याच भागात पालिकेने अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबविली होती. मात्र ती कारवाई केवळ ‘थातूरमातूर’ ठरल्याची चर्चा शहरात रंगली होती. त्यानंतर हिंदू संघटनांनी दिलेल्या इशाऱ्यामुळे अखेर प्रशासनाला दुबार कारवाईची नामुष्की ओढवली.

सकल हिंदू समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित जागेवरील अतिक्रमण तातडीने हटविण्याची मागणी पालिका प्रशासनाकडे केली होती. याबाबत प्रशासनाने ५ जूनपर्यंत अतिक्रमण हटविण्याचे लेखी आश्वासनही दिले होते. मात्र मुदतीत कारवाई न झाल्यास ६ जूनपासून कोपरगाव बंद आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनांच्या वतीने देण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सकाळी पालिकेचे अतिक्रमण पथक, अधिकारी, कर्मचारी आणि मोठा पोलीस बंदोबस्त घटनास्थळी दाखल झाला.

तीन मोठ्या बुलडोझरच्या सहाय्याने संबंधित जागेवरील बांधकामे आणि अतिक्रमणे हटविण्याची मोहीम राबविण्यात आली. कारवाईदरम्यान परिसरात मोठी गर्दी झाली होती. या भागात अवैध कत्तलखाने सुरू असल्याचा तसेच कथित गोमांस विक्री होत असल्याचा आरोप सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आला होता. त्यामुळे हे प्रकरण गेल्या काही दिवसांपासून शहरात चर्चेचा विषय ठरले होते.

पालिकेने यापूर्वी केलेली कारवाई केवळ दिखाऊ स्वरूपाची होती का, असा सवाल आता उपस्थित होत आहे. पहिल्या कारवाईनंतर पुन्हा त्याच जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण कायम राहिल्याने पालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दरम्यान, आजच्या कारवाईनंतर संबंधित जागा अतिक्रमणमुक्त करण्यात आल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला असून पुढील कायदेशीर प्रक्रिया नियमानुसार राबविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

Leave a Reply

You cannot copy content of this page