‘जनतेचा पैसा खाताय,मग जनतेचीच कामे करा!” – तहसील कार्यालयात आ. आशुतोष काळेंचा अधिकाऱ्यांना दम
“You are eating people’s money, then do the people’s work!” — Ashutosh Kale,
who arrived at the Tehsil Office, urged the officials
जनता दरबारात कामचुकार ग्रामसेवकांवर संताप; “पक्षाचे कार्यकर्ते नव्हे, लोकसेवक म्हणून वागा”
Rajendara C. Salkar, Portal, वृत्तवेध ऑनलाईन,Jun8Mon 19.50 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : “तुम्हाला मिळणारा पगार हा जनतेच्या कराच्या पैशातून दिला जातो. त्यामुळे ठराविक पक्षाच्या लोकांचीच कामे करू नका. जनतेचे सेवक म्हणून प्रत्येक नागरिकाचे काम वेळेत पूर्ण करा,” अशा शब्दांत आमदार आशुतोष काळे यांनी तहसील कार्यालयात भरलेल्या पंचायत समितीच्या जनता दरबारात अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. कामचुकार अधिकारी आणि ग्रामसेवकांना त्यांनी थेट इशारा देत प्रशासनाला जनतेप्रती जबाबदारीची जाणीव करून दिली.
सोमवारी (दि. ८) आयोजित जनता दरबारात पंचायत समितीच्या विविध विभागांतील प्रलंबित कामांचा आढावा घेताना आ. काळे यांनी अधिकाऱ्यांना अक्षरशः धारेवर धरले. नागरिकांच्या अडचणी समजून घेत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना समोरासमोर जाब विचारला. शिक्षण, आरोग्य, पशुसंवर्धन, घरकुल, जलजीवन, मनरेगा, बांधकाम अशा विविध विभागांबाबत नागरिकांनी तक्रारींचा पाऊस पाडला.
“काही ग्रामसेवकांबाबत वारंवार तक्रारी येतात. यापुढे नागरिक त्रस्त झाले तर मी स्वतः तक्रार केल्याशिवाय राहणार नाही,” असा सज्जड इशारा त्यांनी दिला. दोन गावांचा कार्यभार असलेल्या ग्रामसेवकांनी निश्चित वेळापत्रक जाहीर करावे, गावात नियमित उपस्थित राहावे आणि नागरिकांना हेलपाटे मारायला लावू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.
घरकुल लाभार्थ्यांच्या जिओ टॅगिंग प्रक्रियेत होणाऱ्या विलंबामुळे हप्ते अडकत असल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “तात्काळ जिओ टॅगिंग पूर्ण करून लाभार्थ्यांना वेळेत निधी द्या. पावसाळ्यात कोणाचेही बांधकाम अडता कामा नये,” अशा सूचना त्यांनी दिल्या.
पावसाळा सुरू होत असल्याने आरोग्य विभागाला डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो यांसारख्या साथीच्या आजारांबाबत सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले. गावागावांत औषध फवारणी, स्वच्छता मोहीम आणि जनजागृती राबविण्याचे निर्देश देताना पशुसंवर्धन विभागालाही जनावरांच्या लसीकरण व आरोग्य शिबिरांबाबत सज्ज राहण्यास सांगण्यात आले.
दरम्यान, सोमवार (दि. १५) पासून शाळा सुरू होत असल्याने धोकादायक शाळा इमारतींचे तातडीने निर्लेखन करून उपाययोजना कराव्यात तसेच जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आदेश त्यांनी दिले.
“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेत पात्र महिलांना पैसे मिळत नसल्याच्या तक्रारींवरूनही आ. काळे संतप्त झाले. “महिलांना उडवाउडवीची उत्तरे देऊ नका. योग्य माहिती द्या, वारंवार फेऱ्या मारायला लावू नका,” असे सुनावत त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले.
आंचलगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाविरोधात नागरिकांकडून सातत्याने तक्रारी येत असल्याने संबंधित प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी गटविकास अधिकारी संदीप दळवी, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन प्रवीण शिंदे, कारभारी आगवण, सुधाकर रोहोम, दिलीपराव बोरनारे, अनिल कदम, राहुल रोहमारे, प्रशांत घुले, डॉ. मच्छिंद्र बर्डे, श्रावण आसने, विष्णू शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, गोरक्षनाथ जामदार, अर्जुनराव काळे, मधुकर टेके, वाल्मीकराव कोळपे, संभाजीराव काळे, शिवाजीराव ठाकरे, प्रशांत वाबळे, राजेंद्र निकोले, रामदास केकाण यांच्यासह पंचायत समितीच्या विविध विभागांचे अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views:
6






