“अजितदादांच्या विचारांची मशाल विझू देणार नाही!”-अशोक काळे
“We will not let the torch of Ajit Dada’s vision be extinguished!” – Ashok Kale
राष्ट्रवादी काँग्रेसच्या २७ व्या वर्धापन दिनी कोपरगावात शक्तीप्रदर्शन; सुनेत्राताई पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्ष बळकट करण्याचा निर्धार
Rajendara C. Salkar, Portal, वृत्तवेध ऑनलाईन, Jun10Wed 17.20 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव :देशातील शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २७ वा वर्धापन दिन कोपरगावात उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार अशोक काळे यांच्या हस्ते पक्षध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाला पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
यावेळी बोलताना माजी आमदार अशोक काळे यांनी स्व. अजितदादा पवार यांच्या निधनाने राज्याच्या राजकारणात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात निर्माण झालेली पोकळी अधोरेखित करत कार्यकर्त्यांना भावनिक साद घातली. “स्व. अजितदादा पवार यांच्या अचानक जाण्याने महाराष्ट्राची आणि पक्षाची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे. मात्र अशा कठीण प्रसंगी खचून न जाता उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल,” असे ते म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष नेहमीच शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी लढत आला असून राज्याच्या सर्वांगीण विकासाचा विचार स्व. अजितदादा पवार यांनी दिला होता. त्याच विचारांवर पक्षाची पुढील वाटचाल सुरू राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
राज्यातील सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अधिक मजबूत होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करत उपस्थित कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्ष अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, शशिकांत देवकर, वैशाली आभाळे, संजय आगवण, विजय रक्ताटे, मंदार पहाडे, राजेंद्र वाकचौरे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views:
14





