२०० मीटर नियमांनुसार अवैध वाहतुकीवर कारवाईचे स्वागत; पण परमिटधारक वाहनांनाही गुन्हेगार ठरवणार का?-राजेंद्र  सालकर

२०० मीटर नियमांनुसार अवैध वाहतुकीवर कारवाईचे स्वागत; पण परमिटधारक वाहनांनाही गुन्हेगार ठरवणार का?-राजेंद्र  सालकर

Action against illegal operations within the 200-meter zone is welcome; but will permit-holding vehicles also be branded as offenders? – Rajendra Salkar

बेकायदेशीर वाहतूक बंद झालीच पाहिजे; पण कायदेशीर व्यवसाय गुदमरवू नका” 

Rajendara C. Salkar, Portal, वृत्तवेध ऑनलाईन,Jun10Wed 19.20 Pm.By  सालकर राजेंद्र 

कोपरगाव : एसटी बसस्थानक परिसरातील अवैध प्रवासी वाहतुकीवर नियंत्रण आणण्यासाठी लागू करण्यात आलेल्या २०० मीटर नियमाच्या अंमलबजावणीदरम्यान आता वैध परमिटधारक मिनीडोअर व प्रवासी वाहनांवरही कारवाई होत असल्याने वाहनधारकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. “अवैध वाहतूक बंद झालीच पाहिजे, हे आमचेही ठाम मत आहे; कारण त्या बेकायदेशीर वाहतुकीमुळे कायदेशीर व्यवसाय करणाऱ्या वाहनधारकांच्या उदरनिर्वाहावर मोठा परिणाम होत आहे. मात्र त्याच नावाखाली वैध परमिटधारकांवर कारवाई करणे अन्यायकारक आहे,” अशी स्पष्ट भूमिका कोपरगाव तालुका ऑटो रिक्षा संघटनेचे उपाध्यक्ष राजेंद्र सालकर यांनी मांडली आहे.
उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नियमानुसार एसटी बसस्थानकाच्या २०० मीटर परिसरात अवैध प्रवासी वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. खासगी एजंटगिरी, प्रवाशांची पळवापळवी, वाहतूक कोंडी आणि सुरक्षेच्या कारणांमुळे ही मोहीम राबवण्यात येत आहे. या कारवाईचे स्वागतच असल्याचे सांगत, “अवैध वाहतूक करणाऱ्यांमुळे नियम पाळणाऱ्या वाहनधारकांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे बेकायदेशीर प्रवासी वाहतुकीवर कठोर कारवाई व्हायलाच हवी,” असे सालकर यांनी स्पष्ट केले.
मात्र, प्रत्यक्ष कारवाईदरम्यान वैध परमिट, फिटनेस, विमा आणि आरटीओची मंजुरी असलेल्या वाहनांनाही थेट कारवाईला सामोरे जावे लागत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. “मोटार वाहन कायद्यानुसार वैध परवाना असलेल्या वाहनांना सरसकट अवैध ठरवणे योग्य नाही. प्रशासनाने वैध आणि अवैध वाहतुकीतील फरक स्पष्ट ठेवला पाहिजे,” अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे.
वाहनचालकांच्या मते, अनेकदा स्पष्ट नोटीस, लेखी आदेश किंवा नियमांचे स्पष्टीकरण न देता कारवाई होत असल्याने भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. “२०० मीटर नियमाचा हेतू अवैध वाहतूक रोखणे हा आहे; कायदेशीर व्यवसाय संपवणे नव्हे,” असा मुद्दाही पुढे येत आहे.

 चौकट : “अवैध वाहतूक बंद झालीच पाहिजे”
“विनापरवाना प्रवासी वाहतूक, एजंटगिरी आणि बेकायदेशीर वाहनांमुळे एसटीसह कायदेशीर व्यवसाय करणाऱ्या वाहनधारकांचेही मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे अवैध वाहतुकीवर कठोर कारवाई व्हावी, याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. मात्र कायदेशीर परमिटधारक वाहनांवर अन्याय होता कामा नये.”
— राजेंद्र सालकर,उपाध्यक्ष, कोपरगाव तालुका ऑटो रिक्षा संघटना, कोपरगाव.

Leave a Reply

You cannot copy content of this page