मोर्वीस उपबाजार समिती की राजकीय कुलूपबंदी?”

मोर्वीस उपबाजार समिती की राजकीय कुलूपबंदी?”

Morvi Sub-Market Committee: A Political Lockdown?

सव्वा वर्षात फक्त वजनकाटा; शेतमाल खरेदी शून्य — ‘पश्चिम भागावर सूडराजकारण?’ म्हणत ज्ञानदेव मांजरे यांचा कोल्हे गटावर घणाघात

Rajendara C. Salkar, Portal, वृत्तवेध ऑनलाईन,Jun13Sat 20.00 Pm.By  सालकर राजेंद्र 

कोपरगाव  :पश्चिम भागातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी ठरणार, अशी मोठी घोषणा करत धामोरी-मोर्वीस येथे उभारण्यात आलेली उपबाजार समिती आज सव्वा वर्ष उलटूनही प्रत्यक्ष व्यवहाराविना पडून आहे. उद्घाटनाचे फोटो, भूमिपूजनाचे फलक आणि राजकीय भाषणे यापलीकडे या समितीने शेतकऱ्यांना नेमके काय दिले? असा संतप्त सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर कृषी उत्पन्न बाजार समितीतील राजकारण पुन्हा तापले असून, माजी व्हा. चेअरमन ज्ञानदेव मांजरे यांनी थेट कोल्हे गटावर “पश्चिम भागातील शेतकऱ्यांशी सापत्न वागणूक” दिल्याचा गंभीर आरोप केला आहे.

मांजरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात उपबाजार समितीच्या कारभारावर जोरदार हल्लाबोल करताना म्हटले की, “सव्वा वर्षात फक्त वजनकाटा बसवला गेला; पण एक किलो शेतमालाची खरेदीही झाली नाही. ही उपबाजार समिती आहे की राजकीय थंडगार गोदाम?” असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.

त्यांच्या मते, पश्चिम भागातील शेतकऱ्यांना स्थानिक बाजारपेठ उपलब्ध व्हावी, वाहतूक खर्च कमी व्हावा आणि शेतमाल विक्रीसाठी गावोगावी भटकंती थांबावी, या हेतूने समितीची संकल्पना पुढे आली होती. मात्र प्रत्यक्षात समिती सुरू करण्याबाबत बाजार समिती प्रशासन आणि सत्ताधारी गटाकडून जाणीवपूर्वक उदासीनता दाखवली गेली.

“सव्वा वर्षात लाखोंचे भाडे; उत्पन्न मात्र शून्य!”

मोर्वीस येथील सहा एकर जागा कराराने घेण्यात आली असून, प्रति एकर वार्षिक ५० हजार रुपये या दराने बाजार समितीकडून भाडे दिले जात असल्याची माहितीही मांजरे यांनी दिली. “सव्वा वर्षात पावणेचार लाख रुपये खर्च झाले, पण समितीच्या तिजोरीत चार आण्याचेही उत्पन्न जमा झाले नाही. हा कारभार शेतकऱ्यांसाठी आहे की कोणाच्या राजकीय अहंकारासाठी?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

“रोहोमांची हुकूमशाही, कोल्हेंचे मौन!”

मागील तीन वर्षांपासून बाजार समितीमध्ये मनमानी आणि हुकूमशाही सुरू असल्याचा आरोप करताना मांजरे यांनी सभापती साहेबराव रोहोम यांच्यावरही निशाणा साधला. “सभापती नेत्यांच्या मर्जीप्रमाणे वागत आहेत. शेतकऱ्यांची कामधेनू असलेली बाजार समिती अधोगतीकडे जात असताना कोल्हे गट गप्प का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

काळे गटाच्या उपसभापती आणि सदस्यांनी दिलेल्या राजीनाम्याला समर्थन देताना त्यांनी म्हटले की, “शेतकऱ्यांच्या हितासाठी आवाज उठवणाऱ्यांनी या ढिसाळ कारभाराविरोधात घेतलेली भूमिका योग्यच आहे.”

चौकट | “बंधाऱ्यापासून बाजार समितीपर्यंत… पश्चिम भागावर कायम दुजाभाव?”

ज्ञानदेव मांजरे यांनी कोल्हे गटावर पश्चिम भागाकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याचाही आरोप केला. मंजूर बंधारा वारंवार वाहून गेल्यानंतरही वेळेत दुरुस्ती न झाल्याने शेतकऱ्यांच्या जमिनी, विहिरी आणि उभी पिके पुरात वाहून गेली, असा दावा त्यांनी केला.

“आज आमदार आशुतोष काळे यांच्या पाठपुराव्यामुळे बंधाऱ्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र मोर्वीस उपबाजार समिती अजूनही सुरू न होणे हे पश्चिम भागावरील राजकीय दुजाभावाचे आणखी एक जिवंत उदाहरण आहे,” असा थेट आरोप त्यांनी केला.

दरम्यान, या आरोपांमुळे कोपरगावच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांचे वादळ उठण्याची चिन्हे दिसत आहेत.

Leave a Reply

You cannot copy content of this page