गोदावरीत विसर्जनास बंदी ; विसर्जनाऐवजी पालिका करणार गणेश मुर्त्यांचे संकलन
” एक गाव एक गणपती” नंतर पालिकेचा विसर्जनाचा अभिनव उपक्रम शहरात १२ मूर्ती संकलन केंद्र”
वृत्तवेध ऑनलाईन | 30 Aug 2020, By : RajendraSalkar 15:20
कोपरगाव : मंगळवारी (१ सप्टेंबर) दहा दिवसाच्या गणपतीचे विसर्जन केले जात आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव नगरपालिकेने गोदावरी नदीमध्ये गणेश विसर्जन करण्यास बंदी घातली आहे. परंतु गणेश मंडळासह नागरिकांना गणेश विसर्जनासाठी इतरत्र जायला लागू नये, यासाठी पालिकेने ‘गणेश विसर्जन मूर्ती संकलन’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. गाव एक गणपती नंतर विसर्जना ऐवजी संकलन केंद्र या पालिकेच्या अभिनव उपक्रमाचे नागरिकांकडून जोरदार स्वागत
गणपती विसर्जनावेळी गर्दी होऊ नये यासाठी कोपरगाव नगरपालिका प्रशासनाकडून पूर्णपणे काळजी घेतली जात आहे. तसेच, प्रदूषण टाळण्यासाठी प्रशासनाने कोपरगाव शहरात १२ ठिकाणी मूर्ती संकलन केंद्राची उभारणी करण्याचे नियोजन केले आहे. अशी माहिती मुख्य अधिकारी प्रशांत सरोदे यांनी दिली आहे.
त्यामुळे नागरिकांनी श्री ची सर्व पूजा,अर्चना व आरती घरीच करून यावे. मूर्ती संकलन केंद्रावर मूर्ती संकलित करतांना आरती करू नये. मूर्ती संकलन केंद्र येथे मूर्ती देण्यास येतांना मिरवणूक काढू नये. याठिकाणी येताना मात्र एक किंवा दोन व्यक्तीनीच यावे. तसेच नागरीकांनी श्री चे निर्माल्य एक फुल मूर्ती सोबत द्यावे. त्यानुसार विसर्जनासाठी घरगुती गणेशमूर्तीचे संकलन करण्यासाठी भाग निहाय संकलन केंद्रावर दिनांक १ सप्टेंबर २०२० मंगळवार रोजी सकाळी १०.०० वा. पासून ते दुपारी ३.०० वा. पर्यंत मूर्तीचे संकलन करावे. इतर निर्माल्ये जसे हार,फुले, दुर्वा इ. आपल्या झाडांना खत म्हणून द्यावे. त्याचे पावित्र्य राखून इतरत्र टाकू नये. सर्व मूर्ती एकत्रित केल्यानंतर नगरपरिषदे मार्फत त्यांचे विधिवत विसर्जन करण्यात येणार आहे.
शहरातील मूर्ती संकलन केद्र ठिकाण पुढील (१) लोढा मंगल कार्यालय (२) गोदावरी पेट्रोलपंप समोर (३) साईबाबा तपोभूमी मंदिर (४) डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळया समोर (५) छत्रपती संभाजी महाराज सर्कल (६) आचारी हॉस्पिटल समोर (७) गोरोबानगर मंदिर (८) इंडोरगेम हॅाल (९) छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समोरील संत ज्ञानेश्वर व्यापारी संकुल समोर (१०) माधव बाग (११) येवला नाका (१२) बेट नाका वरील पैकी नगरीकांना सोयीनुसार जवळील मूर्ती संकलन केंद्रवर मूर्तीचे संकलन करण्यात यावे. कोविड -१९ चे शासनाने विहित केलेले सर्व नियम व शिस्तीचे पालन सर्व नागरिकांनी करून सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी प्रशांत सरोदे तसेच सर्व नगरसेवक व नगरसेविका यांनी केले आहे.