गणपतराव देशमुख यांच्या निधनाने संयमी अनुभवी विधीमंडळाचे सर्वोच्च विद्यापीठ हरपलं-शंकरराव कोल्हे.
With the demise of Ganapatrao Deshmukh, the highest university of the moderate legislature was Harpalam-Shankarrao Kolhe.
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Sat 31July 11:00
कोपरगाव : शेतकरी कामगार पक्षाची डावी विचारसरणी स्वीकारून त्याच्याशी आयुष्यभर प्रामाणिक राहून तत्वांशी कधीही तडजोड करायची नाही आणि जनतेने दिलेल्या जबाबदारीचे भान ठेवत साध्या राहणीमानाचे वागणं तसेच दुष्काळात पाण्याची किंमत पटवून देऊन ही समस्या सोडवण्यासाठी आयुष्यभर संघर्ष करत संयमी अनुभवी कर्तुत्व दाखवून विधिमंडळाचे सर्वोच्च विद्यापीठ म्हणून ख्याती असलेले माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र पोरका झाला आहे अशा शब्दात माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी प्रतिक्रिया देत संजीवनी उद्योग समुहाच्या वतीने श्रद्धांजली वाहिली.
ते म्हणाले की, सलग अकरा वेळा विधिमंडळात सांगोला सोलापूरच प्रतिनिधित्व करणं ही बाब दुर्मिळ असून 1978 व 1999 च्या सरकारमध्ये मंत्री होऊनही त्यांनी त्याचा रुबाब आपल्या अंगात कधीही भिनू दिला नाही. त्यांची व माझी विधिमंडळ अधिवेशनात सतत भेट होत असे. त्यांच्या कडून पाण्याचा प्रश्न समजाउन घेत, त्याची मांडणी कशी करायची याचे ज्ञान आम्ही आत्मसात केले. कायदे करताना त्यात सर्वसामान्यांच्या हिताला बाधा येणार नाही यासाठी ते सतत अभ्यासपूर्ण मांडणी विधिमंडळात करत असत. त्यावर सरकारला व विधिमंडळ अध्यक्षांना त्यांची भूमिका रास्त असल्याचे मत सतत व्यकत केले. एखाद्या प्रश्नावर कितीही हातघाईला परिस्थिती आली तरी त्यात समजूतदारपणा कसा घ्यायचा हे नवख्या आमदारांनी त्यांच्याकडून शिकण्यासारखं होतं. विधिमंडळात गाजलेली भाषणे हा त्यांच्या शिरपेचातील तुरा असून उर्ध्व गोदावरी खोऱ्यातील शेती पाण्याचा प्रश्न कसा सोडवायचा याची टिपणं मी अनेक वेळा त्यांच्या कडून समजावून घेतली होती. बागायतदारांच्या अडचणींची भूमिका सर्वजण मांडत पण दुष्काळ आणि जिरायती भागातील प्रश्न तसेच टांगुन राहू नये ही भूमिका ते नेहमी घेत असे नेतृत्व आपल्यातून निघून गेल आहे. त्यांच्या नावाने विधिमंडळात तरुण आमदारांसाठी मार्गदर्शन देणारे स्वतंत्र दालन सुरू करावं हीच त्यांच्या कार्याला स्मृति देणारी घटना ठरेल असेही शंकरराव कोल्हे म्हणाले. सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे, भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनीही त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली.