तहसीलसमोरील रस्त्याच्या खड्ड्यांत सरकारी धान्याचा आयशर ट्रक फसला
A government grain Eicher truck crashed into a pothole in front of the tehsil
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन lMon13sep 2021, 19:00Pm.
कोपरगाव : येथील तहसील कार्यालयासमोर या रस्त्यावरील असलेल्या मोठ्या खड्ड्यांत सरकारी रेशनच्या धान्याने भरलेला आयशर ट्रक फसला होता. सोमवारी आठवडे बाजार असल्यामुळे वर्दळीच्या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली होती.

येथील तहसील कार्यालयासमोरील रस्त्यावर खड्डे झाले आहेत. त्याचप्रमाणे येथील धान्य गोडावूनच्या रस्त्यावरच माणूस पडेल, असा मोठा खड्डा आहे. हा खड्डा एवढा मोठा आहे की त्यामुळे वाहनचालकांना वाहने चालवताना चांगलीच कसरत करावी लागत आहे. नागरिकांकडून वारंवार खड्डे बुजविण्याची मागणी केली आहे. या परिसरातच पंचायत समिती, नगरपालिका, पोलीस स्टेशन अशी विविध शासकीय कार्यालये आहेत. तहसील कार्यालयात तालुक्यातील नागरिक, कर्मचारी येतात. त्यांना खराब रस्त्याला तोंड द्यावे लागते. या परिसरातील रस्त्यांचा प्रश्न कायम असून, रात्री येथे पथदीपही नाहीत. त्यामुळे अंधारात वाहनचालकांना या रस्त्यावरील खड्डेच दिसत नाही. परिणामी, अपघाताचा धोका असतोच. एकंदरीत या खड्ड्यांसह नागरिकांना मूलभूत सुविधाच मिळत नाही, यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. मंत्री किंवा मोठे अधिकारी येण्याआधी खड्डे बुजवले जातात. मात्र नंतर परिस्थिती जैसे थे होते, धान्याचा ट्रक खड्ड्यात असल्याने या ठिकाणी वाहतुकीची मोठी कोंडी झाली परंतु शहर पोलीस निरीक्षक वासुदेव देसले त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी स्वतः या ठिकाणची वाहतूक कोंडी सोडवली व क्रेन बोलावून असलेल्या धान्याचा ट्रक बाहेर काढून रस्ता मोकळा केला तेव्हा नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला