साठवण तलावाच्या तांत्रिक मंजुरीमुळे लोकांमध्ये १२० कोटी ची योजना मंजूर झाल्याचा संभ्रम पसरला – राजेश मंटाला 

साठवण तलावाच्या तांत्रिक मंजुरीमुळे लोकांमध्ये १२० कोटी ची योजना मंजूर झाल्याचा संभ्रम पसरला – राजेश मंटाला

120 crore scheme approved due to technical approval of storage lake – Rajesh Mantala

पाणी दोन्हीकडून हवे आहे, हक्क सोडून देणार नाही ! Water is required from both, will not give up the right!

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Mon 15 Nov.2021,13.00Pm.

कोपरगाव : तांत्रिक मंजुरी ही मंजुरी नाही, तर ती  फक्त आराखड्याला मिळालेली मंजुरी आहे. यावर नगर विकास मंत्रालयाचे अधिकारी अभ्यास करतील, त्यातील प्रत्येक बारकावे तपासतील, त्यापुढच्या प्रक्रिया फार मोठया आहेत. त्याच्यात प्रशासकीय मंजुरी होणार, टेंडर निघणार या फार पुढच्या गोष्टी आहेत. तांत्रिक मंजुरी झाली त्याच्यामुळे लोकांमध्ये आपली १२० कोटीची पाणी योजना मंजूर झाली असल्याचा संभ्रम पसरला असल्याचे वक्तव्य शहराचा पाणी लढा देणारे सामाजिक कार्यकर्ते राजेश मंटाला यांनी रविवारी (१४) रोजी दुपारी महावीर भवन येथील पत्रकार परिषदेत केले. पाणी दोन्हीकडून हवे आहे, हक्क सोडून देणार नाही असेही मंटाला यांनी म्हटले आहे.  मी येवढे असे ठाम का म्हणतो असा अनेकांना प्रश्न पडला असेल याचे कारण मी स्वतः गेल्या तीन वर्षापासून  कोपरगाव शहरातील नागरिकांना हक्काचे नियमित शुद्ध दररोज पाणी मिळावे यासाठी पाच नंबर साठवण तलाव व शहराच्या पाणी वितरण व्यवस्थेसाठी काम करीत आहे व पाठपुरावा करीत आहे त्यामुळे त्यातील वस्तुस्थिती व सत्य मला पूर्णत: माहित आहे असा खुलासाही त्यांनी केला.

राजेश मंटाला म्हणाले, ५ नंबर साठवण तलावासाठी आमदारही प्रयत्न करीत आहे. या योजनेचे मी स्वागत करतो. या योजनेवर माझा कसलाही आक्षेप नाही. मात्र याच्यातील तांत्रिक मंजुरीतील दोन गोष्टीवर माझा आक्षेप आहे. त्या म्हणजे दोन चार दिवसापासून पेपरला आलेल्या बातम्यांमुळे मंजूर झालेल्या निळवंडे च्या पाण्यावरचा हक्क आपल्याला सोडावा लागणार आहे एकाच वेळी तुम्हाला दोन ठिकाणाहून पाणी मिळणार नाही हे म्हणण्याचा जीवन प्राधिकरणाला अधिकार आहे का ?  मला याच्यातले जास्त काही कळत नसलं तरी माझ्या माहितीप्रमाणे त्यांना हा अधिकार नसावा, मग त्यांनीही अट का टाकली  असावी ? जीवन प्राधिकरण यांनी आपल्याला जी अट टाकली आहे. इतर ठिकाणी मात्र दोन-दोन तीन-तीन ठिकाणाहून पाणी घेतले जात आहे. तिथे ही  अट का  नाही ?  कोपरगाव  करताच ही अट  का? याबाबत  मुख्याधिकारी गोसावी साहेब यांच्याशी बोललो असता त्यांनी सांगितले की आमच्या धुळ्याला ३  ठिकाणाहून पाणी येत आहे. हे त्यांनी स्वतः मला सांगितले, आपल्याला दोन्हीकडून पाणी मिळू शकते असे त्यांनी मला स्वतः सांगितले, मग ही अशी अट का टाकली ? हा तर खरे म्हणजे सर्वांच्या अभ्यासाचा विषय आहे. दुसरे असे की जीवन प्राधिकरणाला जो अहवाल पाठवला आहे. त्याला सर्व नगरसेवकांची संमती आहे का ? मुख्याधिकाऱ्यांची त्यावर सही आहे, पण नगराध्यक्ष व सर्व नगरसेवक सभागृहाची  त्याला संमती आहे का ? तसा ठराव दिला आहे का ? तो एक विषय आहे.जेंव्हा त्यांनी तुम्हाला तांत्रिक मंजुरी दिली, तेंव्हा तुम्ही निळवंडे चा हक्क सोडण्याची अट वाचली नव्हती का ? असा सवालही मंटाला यांनी  केला. 

 राजेश मंटाला पुढे म्हणाले,  निळवंडे योजना मोठ्या पाठपुरावातुन २०१८ विधानसभेत मंजूर झालेली आहे.  ती मंजूर होऊन तीन-चार वर्षे निघून गेलेली आहे आणि ती अचानक आज  सोडून द्यायची ? सरकार बदलले म्हणून योजना सोडून द्यायची असे  असेल तर आता ही जुनी पण नव्याने मांडलेली साठवण तलावाची योजना सुरू करायचे म्हटल्यास अजून काही वर्ष निघून जातील पुन्हा सरकार बदलले म्हटल्यावर ही योजना सोडून द्यायची का ? आधीच पाण्यासाठी आपले पंचवीस वर्षे गेले, अजून पुढची पंचवीस वर्षे घालवायचे का ? असा सवाल त्यांनी केला. गेल्या पंचवीस वर्षापासून आपण पाणी समस्येला तोंड देतो आठ दिवस, पंधरा दिवस, पंचवीस दिवस एकतीस दिवस आड पाणी आत्ता सहा दिवस आड  पाण्याचा भोंगा फिरला आहे मग हे आता  किती दिवस सहन करायचं ? ४२ कोटीची पाणी योजना पूर्ण होऊन सहा वर्षे झाली आहेत तिची टेस्टिंग घेतली नाही.४२ कोटीच्या पाणी योजनेचे हायड्रॉलिक टेस्टिंग करा अशा सूचना अधिकार्‍यांनी दिल्या होत्या याबाबत मंगेश पाटील, संतोष गंगवाल, तुषार  विध्वंस, मी स्वतः आम्ही हायड्रोलिक स्टेटिंगबद्दल  विचारण्यास गेलो असता त्यांनी आम्हाला ८०% हायड्रॉलिक टेस्टिंग झाली २० टक्के शिल्लक असल्याचे  उत्तर दिले. परंतु ती कधी आणि कशी झाली याचा अहवाल मात्र काही दाखवला नाही, टेक्निकल गोष्टींमध्ये मला कुठलेही सारस्थ नाही हा विषय अधिकाऱ्यांचा आहे. परंतु अजूनही ही योजना अपूर्णच आहे. याबाबत मी नगरविकास खात्याला कळविले असता त्यांनी मला याबाबत वेगळा अर्ज पाठवा मी ॲक्शन घेतो चौकशी लावतो. असे सांगितले आहे. मात्र मला या गोष्टीत पडायचे नाही असे मी त्यांना स्पष्ट सांगितले.वरचे म्हणतात कितीही कोटीची पाणी योजना आणा, वरचे अधिकारी म्हणतात आम्ही तुम्हाला सहकार्य करू परंतु नगरपालिकेचे अधिकारी मात्र कागदपत्रे देण्यास व सहकार्य करण्यास तयार नाही. 

राजेश मंटाला म्हणाले,आम्हाला नागरिकांना काय पाहिजे स्वच्छ नियमित व दररोज पाणी पाहिजे  पाचवे तळे झाले काय आणि नाही झाले काय आम्हाला पाणी पाहिजे ते निळवंडेतून आणा  किंवा दारणा मधुन आणा नाहीतर लातूर सारखं रेल्वेतुन आणा, मी वर्षाचा  पाण्याचा कर भरतो, आणि  मला पन्नास दिवसच पाणी मिळते, हे आम्ही किती दिवस सहन करायचे? २५  वर्ष होत आले हे चालू आहे. या पाणी प्रश्नामुळे अनेकांनी कोपरगाव सोडून दिले आहे. आज दिवाळीच्या सुट्टीत घरी पाहुणे आले तर अनेकांच्या अंगावर पाण्याच्या भीतीपोटी काटा येतो आहे. पाण्यामुळे आज कोपरगावात कोणी मुली द्यायला तयार नाहीत. याचा विचार होणार आहे की नाही.शहरात डेंग्यूची साथ आली तेव्हा पालिकेचे  कर्मचाऱ्यांनी घराबाहेर   साठविलेले  पाणी सांडून द्या नाही तर तुमच्यावर दंडात्मक कारवाई करू  अशा धमक्या देत होते. परंतु ते हा विचार करत नाही की घरात पिण्यासाठी आठ दिवस पाणी साठवले जाते त्याचे काय ? तुम्ही डेंग्यूचा विचार करता मग लोकांच्या विचार करा ना ? असा सवाल मंटाला यांनी केला. 

मंटाला म्हणाले,कोपरगावचे लोक आज कोणते पाणी पितात हासुद्धा महत्त्वाचा विषय आहे. कोपरगावकरानो साई पालखीला शिर्डीला  जातात  तसे एकदा कॅनलला पाणी आल्याबरोबर माझ्यासोबत येसगाव साठवण तलावावर चला  तेंव्हा प्रत्यक्ष डोळ्यांनी बघा  कॅनॉलची  अवस्था बघा ते पाणी खरच पिण्यायोग्य आहे का ? हे सर्व एकदा बघा केंद्र सरकारचे धोरण आहे की प्रत्येक घरापर्यंत थेट बंदिस्त पाइपमधून पाणी जावे, मग ते पाणी  दारणा धरणातून द्या, किंवा निळवंडे धरणामधून द्या, बंदिस्त पाईपलाईन मधूनच द्या, दोन्ही योजना ठेवा आम्हाला आमच्या हक्काचे पाणी दररोज पिण्याला मिळाले पाहिजे, कोपरगाव शहरातील नागरिकांना पिण्यासाठी त्यांचे हक्काचे पाणी दररोज मिळावे यासाठी गेल्या तीन वर्षापासून महामहीम राष्ट्रपती देशाचे पंतप्रधान जलशक्ती मंत्रालय  केंद्र सरकार नगर विकास मंत्रालय मुख्यमंत्री कार्यालय मुख्यमंत्री नगर विकास मंत्रालय जलसंपदा मंत्रालय जलसंपदामंत्री जिल्हाधिकारी अहमदनगर मुख्याधिकारी कोपरगाव सर्वत्र गेल्या तीन वर्षांपासून पाठपुरावा करीत आहे या प्रत्येकाकडे पत्रव्यवहार केलेला आहे. महामहिम राष्ट्रपती यांनी महाराष्ट्राचे मुख्य सचिव यांच्याकडे पत्र दिले होते त्यांनी हा विषय कोपरगावचा असल्याने जिल्हाधिकारी नगर यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता.  जिल्हाधिकारी यांनी सोपास्कर म्हणून ते पत्र मुख्याधिकारी यांच्याकडे पाठवून दिले. जेव्हा राष्ट्रपती पत्र देतात  तेंव्हा हा विषय किती गंभीर आहे खरे तर याची जाणीव होणे गरजेचे आहे जिल्हाधिकारी यांनी वैयक्तिक लक्ष घालणे आवश्यक होते. मात्र त्यांनी फारसे गांभीर्याने न घेता  ते पुढे  मुख्याधिकारी यांच्याकडे  पाठवून दिले कोपरगाव शहराचा पाणीप्रश्न कायम स्वरूपी सोडवा, कायमस्वरूपी निकालात काढा असे पत्र देऊनही पालिका प्रशासनाकडून नगर विकास खात्याने पालिकेने पाण्यासंदर्भात कोणत्या योजना व प्रस्ताव दाखल केले आहे याबाबतची कागदपत्रे मागवली होती परंतु मागचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे बदलून गेले त्यांच्या जागी आलेले नवीन मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी सुद्धा गेल्या दोन महिन्यांपासून पाठपुरावा करूनही अद्याप ती कागदपत्रे नगर विकास मंत्रालयाला पाठवलेली नाही ही टाळाटाळ करण्यामागे नेमका हेतू काय ? हाच प्रश्न विचारण्यासाठी आज पत्रकार परिषद घेण्यात येत असल्याची  माहिती   राजेश मंटाला यांनी दिली. 

राजेश मंटाला पुढे म्हणाले,पाण्याच्या प्रश्नावर ज्याला राजकारण करायचे त्याने ते जरूर करावे परंतु आपण एक जागरूक नागरिक म्हणून समिती गठित करून कोपरगाव च्या पाणी समस्या कायमस्वरूपी सुटावी यासाठी  सामाजिक कार्यकर्ते, संघटना वकील, डॉक्टर, इंजिनीयर, व्यापारी सर्व प्रतिष्ठित नागरिकानो एकत्र या, पुढे या हा विषयी एक दोघांचा नसून सगळ्यांनाच पाणी लागते आहे आज कोपरगाव ची अवस्था बघा प्रत्येक घराच्याबाहेर पाणी साठविण्याच्या टाक्या दिसतात घरापेक्षा भांड्यांची संख्या जास्त झाली आहे. अनेक गल्ल्यांमधून जाण्यासाठी रस्ते राहिलेले नाहीत. पाण्याच्या टाक्या ठेवण्यावरून लोकात दररोजची भांडणे होतात. एका झोपडीत तर १००० बाटल्या पाण्याच्या भरून ठेवल्या होत्या, त्या घरात लोकांना झोपण्यासाठी जागा  उरली नव्हती. आणखी किती वर्ष सहन करायचे? कर भरूनही आपल्याला पाण्यासाठी भिक मागावे लागत असेल, तर याची आपल्याला लाज वाटली पाहिजे, पत्रकार परिषद राजकीय नसली तरी परंतु रस्ते नाही, पाणी नाही, तुम्ही आम्हाला काही देऊ शकत नाही तुमचा उपयोग काय?  असा संतप्त सवाल त्यांनी शेवटी केला

जलतज्ञ तुषार विध्वंस म्हणाले, पालिकेकडे साठवण क्षमता नाही, वितरण व्यवस्था नाही, कॅनॉलची अवस्था बघता त्यातून येणाऱ्या पाण्यामुळे साठवण तलावात प्रचंड गाळ साचतो त्यासाठी बंद पाइपातून पाणी येणे गरजेचे आहे. जादा पाणी देत असली तरी ते पाणी आपल्याला नियमाप्रमाणे दोन महिने अथवा साठ दिवस पुरवायचे असते. जेंव्हा कॅनॉल बंद होतात. तेंव्हा आपल्या एक ते चार या साठवण तलावांमध्ये किती पाणी आहे. त्यानुसार पाटबंधारे खात्याच्या आदेशानुसार साठ दिवस पाणी पुरविण्याचे नियोजन करावे लागते. त्यामुळेच कोपरगाव शहराला किमान सहा ते आठ दिवसाआड पाणी द्यावे लागते ही वस्तुस्थिती आहे.

संतोष  गंगवाल म्हणाले, आम्ही ४२ कोटी च्या पाणी योजनेची हायड्रॉलिक टेस्टिंग घ्या, असे सांगितले तेंव्हा त्यांनी आम्हाला पाणी नाही असे सांगितले, परंतु जेंव्हा  कॅनॉल ओव्हर फ्लोने  चालू होते. तेंव्हा टेस्टिंगसाठी हीच योग्य वेळ आहे असे सांगितले. मात्र त्यांनी टेस्टिंग घेण्यास टाळाटाळ केली.  आदल्या दिवशी नगराध्यक्षांच्या दालनात २६ तारखेला दुपारी नगराध्यक्ष मुख्याधिकारी व पाणीपुरवठा अभियंता  त्यांच्याबरोबर आमची मीटिंग झाली. त्यात आम्ही सगळे विषय मांडले आणि रात्रीतून दुसऱ्या दिवशी २७ तारखेला सगळीकडे एकशे वीस कोटी चे तांत्रिक मंजुरीचे बोर्ड सर्व गावात लागले किती ही तत्परता आहे. अशी खिल्ली राजेश मंटाला यांनी उडवली, श्रेय  सगळे तुम्ही घ्या, मी वरती इतके करून ठेवले आहे की आता आपल्याला फक्त कागद पाठवायची आहेत ते सर्व करून द्यायला तयार आहेत.

 यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष नितीन शिंदे म्हणाले, दोन्ही कारखान्यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला ज्याप्रमाणे चितळे चे मिठाई बॉक्स सेम टू सेम येतात,   दोन्ही साखर कारखाने सरकारला वर्षाकाठी सतराशे ते अठराशे कोटी रुपये कररूपाने देतात,तर त्यांनी कोपरगाव च्या पाण्यासाठी सव्वाशे दीडशे कोटी रुपये घालवावे ,वाटल्यास कोपरगाव च्या पाणी योजनेला शंकरराव नामकरण करून पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटवावा,व श्रेयही दोघांनी वाटून घ्यावे असे आव्हान त्यांनी यावेळी केले.

 या पत्रकार परिषदेस राजेश मंटाला, जलतज्ञ तुषार विध्वंस,मनसेचे उपजिल्हाप्रमुख संतोष गंगवाल काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नितीन शिंदे, शिवसेना शहर प्रमुख कलविंदरसिंग दडियाल, शिवसेनेचे तिरोडा विधानसभा संपर्कप्रमुख प्रविण शिंदे ,साकोला विधानसभा संपर्कप्रमुख मनोज कपोते , वंचित शहर आघाडीचे शरद खरात , क्रांतीवीर लहुजी टायगर सेना संस्थापक शरद त्रिभुवण , सामाजीक कार्यकर्ते निसार शेख , आनंद टिळेकर,ॲड नितीन पोळ, छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष प्रसाद निकम , वास्तव ग्रुपचे सदस्य ,सुवर्णकार समाजाचे कृष्णाशेठ उदावंत, दिगंबर जैन समाजाचे पंच प्रविण गंगवाल, आतिश शिंदे , कोपरगांव इमारत बांधकाम कामगार संघटनेचे संस्थापक किशोर चोरगे , देशभक्ती सेवामंचचे अध्यक्ष रवि जगताप , प्रसिद्ध व्यापारी मुकुंद भुतडा ,राजेश लोंगाणी, दिपक घोडले , काशिनाथ भावसार , सौ. सुनंदा भावसार तसेच आदी राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. ॲड. नितीन पोळ यांनी आभार मानले. 

Leave a Reply

You cannot copy content of this page