खोटे आश्वासने देऊ नका पाण्याचे राजकारण थांबवा एकत्र बसा आणि पाणी प्रश्न सोडवा – संजय काळे
Don’t make false promises Stop water politics Sit together and solve water problem – Sanjay Kale
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Thu16 Dec.2021 17.50Pm.
कोपरगाव: कोपरगावला निवडणूक लागली की पाण्याचे राजकारण सुरू होते. कोपरगाव नगरपरिषदेच्या हद्दीत आठ दिवसा पासून वीस दिवसा आड पाणी आणि शेतीला एका वर्षात चार आवर्तने.. तरी देखील पाणी आम्हीच आणले म्हणून फ्लेक्स लागतात.तेंव्हा खोटे आश्वासने देऊ नका..पाण्याचे राजकारण थांबवा,एकत्र बसा आणि पाणी प्रश्न सोडवा.. असे जाहीर आवाहन सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
संजय काळे पुढे म्हणाले नाशिक जिल्ह्यात मुकणी वालदेवी भाम भावली धरणांचे बांधकाम चालू होते आणि पाणी आपल्यालाच मिळणार म्हणून गाजावाजा झाला आणि नांदेडचे साहेब आमच्या नाकावर टिच्चून पाणी मराठवाड्यात घेऊन गेले. हक्काच्या पाण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात एक दावा जिंकलो पण पाणी काही कायमचे वाढले नाही.. पाण्यापेक्षा हार तुरेच जास्त झाले. २०१२ ला साईबाबा समाधी शताब्दी वर्षासाठी निळवंडेतून बंद पाईपलाईन मधून पाणी आणण्याचे संस्थानने ठरवले, २०१८ मध्ये शताब्दी संपली, त्याला तीन वर्षे झाली पण योजना कागदावरच आहे. निळवंडे कृती समितीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले, भारतातील न्यायदानाची प्रक्रीया किती वेगवान आहे सर्वश्रूत आहे. २०१६च्या कोपरगाव नगरपरिषद निवडणूकीच्या प्रचारात ऐरणीवर असलेला निळवंडे पाईपलाईनचा विषय पाच वर्षे सगळे विसरले. २०१९ च्या विधानसभा निवडणूकी नंतर गायत्रीने पाच नंबर तळ्यातून माती झटपट नेली. पण दोन वर्षात दगड नेऊ शकला नाही. ना गडकरी कामाला आले ना पवार… आता इकडचे म्हणतात निळवंडेचे पाणी प्या व दारणेचे सोडा, तिकडचे म्हणतात दारणेचे प्या आणि निळवंडेचे सोडा, गावाला पाणी पाजता कि तुमचे पाणी दाखवता हेच समजत नाही. असा मिस्कील टोलाही त्यांनी लगावला.
संजय काळे पुढे म्हणाले आमचे गाव नदीतले सातभाईचे पाणी प्यायचे, रेशनवर पाणी प्यायचे, पण आमचा कोपरगावचा पाण्याचा प्रश्न कायमचा कोणीच सोडवला नाही. निळवंडेचे पाणी आले तर दारणेचे शेतीला एक आवर्तन वाढेल. असे म्हटले जाते प्रत्यक्षात शहराला एका अवर्तनाला गोदावरी डाव्या कालव्यातून ३५० क्युसेक पाणी मिळते. म्हणजे वर्षभरात २१०० क्युसेक पाणी मिळते. शेतीच्या एका आवर्तनाला गोदावरी डाव्या कालव्याला सरासरी ६००० क्युसेक पाणी लागते. मग कोपरगाव नगरपरिषदेने दारणेचा हक्क सोडला तर अवर्तन कसे वाढणार?तेंव्हा आता तरी हे बंद करा. अशी विनंती काळे यांनी पत्रकातून केली आहे.
संजय काळे पत्रकात म्हणतात आमच्या कोपरगावच्या जनतेचे हाल पाहून नराधम ब्रिटीशांना कनवाळा आला होता.. पण गेेली चार दशके पाण्याच्या नावाखाली एके काळचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखला जाणारा तालुका आता निवृत्तांचा तालुका झाला. आमच्या पिढीवर पाणी पाणी करण्याची वाट आणू नका, ऊसाचे भाव.. वार्षिक सभेची मिठाई ग्रामपंचायत, नगरपरिषद , जि प, पंचायत समिती एकत्र बसून ठरवतात तसे एकत्र बसा… पाणी दारणेचे पण द्या, आणि निळवंडेचे पण द्या … पण आता हे सर्व थांबवा !आमच्या पिढीवर पाणी पाणी करण्याची वाट आणू नका, खोटे आश्वासने देऊ नका.. पाण्याचे राजकारण थांबवा..एकत्र बसा आणि पाणी प्रश्न सोडवा असे कळकळीचे आवाहन संजय काळे यांनी शेवटी पुन्हा एकदा केले आहे .
चौकट
सातत्याने राज्यात मंत्री असूनही महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांना संगमनेर शहराला पिण्यासाठी चाळीस कीमी पाईप लाईन आणायला पंधरा ते सोळा वर्ष लागलीत हे संगमनेरकरांना विचारावे… म्हणजे आपल्याला पिण्याच्या पाण्यासाठी मंजूर झालेल्या निळवंडे शिर्डी कोपरगाव बंदिस्त पाइपलाइनच्या निळवंडे पाण्याची किंमत कळेल- संजय भास्करराव काळे