अभिनेता सोनू सूद यांच्या मदतीमुळे कोपरगावच्या ११ वर्षीय जान्हवीची अपंगत्वावर मात
With the help of actor Sonu Sood, 11-year-old Janhvi from Kopargaon overcame her disability
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Sat 8Jan.2022 14.20Pm.
कोपरगाव : कोपरगाव तालुक्यातील ११ वर्षीय जान्हवीने सामाजिक भान जपणारा अभिनेता सोनू सूद यानं केलेल्या मोलाच्या आर्थिक मदतीमुळं अपंगत्वावर मात केली आहे.
कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण शिवारातील वाबळे वस्ती येथील ११ वर्षीय जान्हवी शशिकांत वाबळे हिला लहानपणापासून पाठीत कुबड निघाल्याने अपंगत्व आले होते. याची माहिती येथील सामाजिक कार्यकर्ते सोनू सूद यांचे घनिष्ठ मित्र विनोद राक्षे यांना मिळाली होती. त्यांनी जान्हवीचे वडील शशिकांत वाबळे आणि सोनू यांची भेट घडवून आणली.
यावेळी वाबळे यांनी सोनू सूदला सर्व परिस्थिती सांगितली. यावेळी वाबळे यांनी सोनू सूदला सर्व परिस्थिती सांगितली. जान्हवीचे अनेक ठिकाणी उपचार केले. जवळील सर्व पैसा लाडक्या लेकीच्या उपचारासाठी लावला. मात्र, उपचारांना यश आले नाही. पुण्यातील संचेती रुग्णालयात जान्हवीवर शस्त्रक्रिया करण्याचा तिच्या वडिलांचा विचार होता. मात्र, त्यासाठी मोठा खर्च येणार होता. शेतकरी असलेल्या शशिकांत वाबळे यांची तो खर्च उचलण्याची ताकद नव्हती. ही व्यथा त्यांनी सोनूकडे बोलून दाखवली. त्यांची व्यथा लक्षात येताच ‘रिअल लाइफ हिरो’ म्हणून ओळख असलेल्या सोनू सूदने तात्काळ शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या सर्व खर्चाची जबाबदारी घेतली.
त्यानंतर डिसेंबर महिन्यात पुण्याच्या संचेती रुग्णालयात डॉ. मयुर कर्डिले ( ३५ ) स्पायनल सर्जन ,पुणे यांनी १० डिसेंबर रोजी जान्हवी हिच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केली. १५ दिवसांच्या उपचारानंतर २५ डिसेंबर रोजी तिला डिस्चार्ज दिला. डॉ. मयूर कर्डिले यांनी यापूर्वी अशा क्लिस्ट स्वरूपाच्या ९० शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. आज जान्हवी व्याधीमुक्त झाली आहे. जान्हवीची प्रकृती आता उत्तम असून तिचे अपंगत्व पूर्णपणे गेले आहे. अशी माहिती विनोद राक्षे यांनी दिली.
सोनू सूद हा निस्सीम साईभक्त असून तो अनेकदा साई दर्शनासाठी शिर्डीत येत असतो. ऑक्टोबर २०२१ मध्ये तो साई दर्शनाला आला होता, तेव्हा त्याने शिर्डी आणि परिसरातील विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षणासाठी चांगल्या प्रतीच्या मोबाईल चे वाटप केले होते . अभिनेता सोनू सूद हा त्याच्या अभिनयासाठी जेवढा प्रसिद्ध आहे, तितकाच तो त्याच्या सामाजिक कार्यासाठी देखील ओळखला जातो. लॉकडाऊन काळात गरजू लोकांसाठी केलेल्या त्याच्या कार्याची देशभरात प्रशंसा झाली. जान्हवी हिच्या शस्त्रक्रियेसाठीचा ७ लाख खर्च सोनू सुद यांनी केला. जान्हवीची आई मनीषा आणि वडील शशिकांत वाबळे यांनी अभिनेते सोनू सूद यांचे आभार मानले.