आर. एस. कन्स्ट्रक्शन कंपनीविरुद्ध अद्याप कारवाई का नाही ? आम्ही पुन्हा आंदोलन करावे का ?- पराग संधान
R. S. Why is there no action against the construction company yet? Should we protest again?- Parag Sandhan
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue8 Nov , 19.00 Pm
By राजेंद्र सालकर
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : कोपरगाव शहरातील मालमत्ताधारकांचे चुकीचे सर्वेक्षण करून मालमत्ताधारकांवर वाढीव घरपट्टीचा बोजा लादणाऱ्या नागपूरच्या आर. एस. कन्स्ट्रक्शन कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करून कंपनीला काळ्या यादीत टाकण्याचे लेखी आश्वासन प्रांताधिकारी गोविंद शिंदे आणि तहसीलदार विजय बोरुडे यांनी देऊन दोन महिने उलटले तरीही अद्याप त्याबाबत कारवाई का होत नाही, असा सवाल अमृत संजीवनी शुगर केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे अध्यक्ष पराग संधान यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. यासंदर्भात तातडीने कार्यवाही न झाल्यास आम्हाला पुन्हा तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
सोमवारी (७ नोव्हेंबर) पराग संधान यांच्या अध्यक्षतेखाली येथील तहसील कार्यालयात जनता दरबार पार पडला.
याप्रसंगी मच्छिंद्र पाटील टेके, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शरद थोरात, तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, सरचिटणीस दीपक चौधरी, शहराध्यक्ष डी. आर. काले, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष विक्रम पाचोरे, बाजार समितीचे माजी सभापती अंबादास पाटोळे, कैलास राहणे, प्रकाश भाकरे, दीपक जपे, रिपाइंचे तालुकाध्यक्ष जितेंद्र रणशूर, शिंगणापूरचे सरपंच भीमा संवत्सरकर,आपेगावचे सरपंच गणपत गव्हाळे आदींनी कोपरगाव शहर व तालुक्यातील जनतेच्या विविध समस्या मांडून प्रशासकीय अधिकाऱ्यांना जाब विचारला.
याप्रसंगी निवासी नायब तहसीलदार पी. डी. पवार, कृषी विभागाचे सोनवणे, नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी ज्ञानेश्वर चाकणे आदींसह भाजप, भाजयुमोचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, आजी-माजी सरपंच, सोसायटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पराग संधान म्हणाले, आर. एस. कन्स्ट्रक्शन कंपनीने कोपरगाव शहरातील मालमत्ताधारकांचे चुकीचे सर्वेक्षण केलेले असतानाही नगर परिषद प्रशासनाने सन २०२२-२३ साठी घरपट्टीमध्ये भरमसाठ वाढ करून मालमत्ताधारकांना वाढीव घरपट्टीच्या नोटिसा बजावल्या. ही अन्यायकारक घरपट्टी रद्द करून पूर्वीप्रमाणेच घरपट्टी आकारणी करावी, मालमत्तांचे चुकीचे सर्वेक्षण करणाऱ्या आर. एस. कन्स्ट्रक्शन कंपनीला नगर परिषदेने दिलेले ७५ लाख रुपये परत घ्यावेत, या कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करावा, या कंपनीला दिलेले कंत्राट रद्द करून काळ्या यादीत टाकावे आदी मागण्यांसाठी भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि रिपाइं (आठवले गट) च्या वतीने विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर २७ सप्टेंबरपासून चार दिवस साखळी उपोषण केले. भाजपच्या प्रदेश सचिव तथा माजी आमदार स्नेहलता कोल्हे या स्वत: चौथ्या दिवशी या उपोषणात सहभागी झाल्या. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, प्रांताधिकारी गोविंद शिंदे व तहसीलदार विजय बोरुडे यांच्याशी चर्चा करून या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात आणून दिले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी निर्देश दिल्यानंतर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी वाढीव घरपट्टीला स्थगिती दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले होते.
त्यावेळी प्रांताधिकारी गोविंद शिंदे व आणि तहसीलदार विजय बोरुडे यांनी कोपरगावातील मालमत्तांचे चुकीचे सर्वेक्षण करणाऱ्या आर. एस. कन्स्ट्रक्शन कंपनीला नगर परिषदेने दिलेले ७५ लाख रुपये परत घेणे, या कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करून कंपनीला काळ्या यादीत टाकणे आदी मागण्यांबाबत त्वरित कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिले होते; परंतु दोन महिने उलटूनही अद्याप या प्रकरणात काहीही कार्यवाही झालेली नाही. प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी उपोषणकर्त्यांना दिलेले आश्वासन हवेतच विरले आहे. यासंदर्भात प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी संधान यांनी केली. अन्यथा पुन्हा एकदा आम्हाला आंदोलन करावे लागेल असा इशाराही त्दियांनी दिला.
Post Views:
228