दिव्यांग मंत्रालय स्थापना  निर्णय स्वागताहार्य ; दिव्यांग बांधव प्रमाणपत्र वाटप

दिव्यांग मंत्रालय स्थापना  निर्णय स्वागताहार्य ; दिव्यांग बांधव प्रमाणपत्र वाटप

The decision to establish the Ministry of Disability is welcome; Handicapped Brother Certificate Distribution

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sun13 Nov , 17.00 Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव : देशात प्रथमच महाराष्ट्रात दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याचा निर्णय शिंदे-भाजप सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या दूरदर्शी निर्णयाचे कोपरगाव भारतीय जनता पक्ष व दिव्यांग सेलच्या वतीने भाजपच्या प्रदेश सचिव  स्नेहलता कोल्हे यांच्या संपर्क कार्यालयात आज दिव्यांग बांधवांना पेढे वाटप करून व फटाके वाजवून जल्लोषात स्वागत करण्यात आले. याप्रसंगी दिव्यांग बांधवांना ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.

दिव्यांग बांधवांचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने घेतला आहे. स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय स्थापन करणारे महाराष्ट्र हे भारतातील पहिलेच राज्य आहे. येत्या ३ डिसेंबर रोजी जागतिक अपंग दिनी याची घोषणा करण्यात येणार आहे. दिव्यांगांचे प्रश्न सुटण्यासाठी या मंत्रालयाचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. या मंत्रालयाच्या माध्यमातून दिव्यांगांसाठी स्वाधार योजना, गाडगेबाबा घरकुल आदी योजनांचा लाभ मिळणार आहे. तसेच मूकबधिरांसाठी खासगी क्षेत्रात काम मिळावे यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याची आग्रही मागणी आमदार बच्चू कडू यांनी शासनाकडे केली होती. तसेच सर्व दिव्यांग व्यक्तींनी एकजुटीने यासाठी प्रयत्न केल्यामुळे महाराष्ट्रातील भाजप-शिंदे सरकारने दिव्यांगांच्या हितासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याचा निर्णय घेतल्यामुळे कोपरगाव भाजप दिव्यांग सेलच्या वतीने आज पेढे वाटून व फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. तसेच या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
यावेळी भारतीय जनता पक्ष दिव्यांग सेलच्या वतीने विद्या परजणे, नसरीन बागवान, सागर संवत्सरकर, दुर्गा यादव, विकास सोळसे, प्रतीक चाळक आदींना ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलताताई कोल्हे आणि सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे शहराध्यक्ष डी. आर. काले यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी संजीवनी सहकारी पतसंस्थेचे संचालक राजेंद्र बागुल, भाजप दिव्यांग सेलचे तालुकाध्यक्ष मुकुंद काळे, शहराध्यक्ष स्वप्नील कडू, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब सोळसे, संजय तुपसैंदर, अपंग संघटनेच्या तालुकाध्यक्षा सुवर्णा गोलेच्छा आदींची प्रमुख उपस्थिती होती. 
दिव्यांगांना एस.टी. बस प्रवासभाड्यात सवलत मिळण्यासाठी माजी मंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांनी १९८९ साली कोपरगाव मतदारसंघात सर्वप्रथम लढा उभारून हा प्रश्न मार्गी लावला. दिव्यांगांना एस. टी. बस पास, ऑनलाईन प्रमाणपत्र, दिव्यांगांसाठी निधी मिळवून देणे व दिव्यांगांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला. दिव्यांगांचे प्रश्न सोडवून त्यांना न्याय देण्यासाठी कोल्हे परिवार नेहमीच पुढे असतो.  स्नेहलता कोल्हे, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व युवा नेते विवेक कोल्हे हे सातत्याने दिव्यांगांच्या मदतीला धावून येतात. कोपरगाव मतदारसंघातील दिव्यांगांना ऑनलाईन प्रमाणपत्र, बस पासेस मिळवून देण्यासाठी कोल्हे परिवाराने नेहमीच सहकार्य केले आहे आणि आजही ते सहकार्य करत आहेत. स्नेहलता कोल्हे व विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत दिव्यांगांचे १३ कॅम्प घेतले आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा दिव्यांगांना लाभ मिळवून दिला जात आहे, असे मुकुंद काळे यांनी सांगितले. 
स्नेहलता कोल्हे, विवेक कोल्हे व कोल्हे परिवाराच्या सहकार्यामुळे दिव्यांग बंधू-भगिनी आज सक्षमपणे उभे आहेत. कोपरगाव तालुक्यातील दिव्यांगांना एस.टी. बस व रेल्वे प्रवासभाड्यात सवलत, ऑनलाईन प्रमाणपत्र व इतर अडचणी सोडविण्यात ते सतत सहकार्य करतात. त्यांच्यामुळेच दिव्यांगांचे अनेक प्रश्न सुटले आहेत, असे सांगून डी. आर. काले यांनी दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त केले. माजी नगरसेवक जयवंत मरसाळे यांनी सूत्रत्संचलन केले.

Leave a Reply

You cannot copy content of this page