कोपरगाव उद्धव ठाकरे शिवसेनेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा जल्लोषात सत्कार
Kopargaon: Newly elected office-bearers of Uddhav Thackeray’s Shiv Sena were felicitated amidst celebrations.
“शहरातील प्रत्येक विकासकामावर शिवसेनेची करडी नजर; प्रशासकीय कारभाराची चौकशी करणार” — शहरप्रमुख गगन हाडा यांचा इशारा
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन, Sun3Feb.15.20 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव :उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या नवनिर्वाचित शहर व तालुका पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा सोमवारी (२ फेब्रुवारी) दुपारी शहरप्रमुख गगन हाडा यांच्या संपर्क कार्यालयात उत्साहात पार पडला. माजी जिल्हाप्रमुख प्रमोद लबडे व माजी उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब जाधव यांच्या हस्ते तालुकाप्रमुख भरत मोरे, श्रीरंग चांदगुडे, उपजिल्हाप्रमुख अस्लम शेख, रंगनाथ गव्हाणे, शहरप्रमुख गगन हाडा व बालाजी गोर्डे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविकांत बोलतांना शहरप्रमुख गगन हाडा म्हणाले की, शिवसेना अहिल्यानगर जिल्ह्याच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा २८ जानेवारीला झाली होती.मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे नियोजित सत्कार कार्यक्रम रद्द करण्यात आला होता.
शहरातील कामकाजावर परखड भूमिका मांडताना गगन हाडा म्हणाले, “कोपरगाव शहरातील २७२ कोटींच्या भूमिगत गटार योजनेविरोधात सामाजिक कार्यकर्त्यांनी आमरण उपोषण केले होते. सध्या ते स्थगित झाले असले, तरी यापुढे शहरातील प्रत्येक विकासकाम दर्जेदार व गुणवत्तापूर्ण व्हावे, यासाठी शिवसेना सजग राहून जातीने लक्ष ठेवणार असल्याचा इशारा दिला.”
प्रशासकांच्या साडेचार वर्षांच्या कारकिर्दीत झालेल्या रस्ते, पेव्हर ब्लॉक, स्वच्छता, आरोग्य व पाणीपुरवठा आदी विकासकामांची चौकशी नगराध्यक्ष व नव्या सभागृहाने करावी, अशी मागणी लवकरच निवेदनाद्वारे करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.“हा सत्ताधारी भाजपचाच निवडणूक अजेंडा होता,” आम्ही फक्त आठवण करून देत आहोत अशी कोपरखळीही त्यांनी मारली.
उपजिल्हाप्रमुख अस्लम शेख म्हणाले, “निवडणुकीच्या तोंडावर पक्षात पडलेल्या फुटीमुळे आणि वेळेअभावी पूर्ण पॅनल उभा करता आला नाही. निवडणूक पुढे ढकलल्याने धनशक्तीपुढे आमचे नियोजन तोकडे पडले. अपेक्षित यश मिळाले नाही, मात्र लढा प्रामाणिकपणे दिला.”
अस्लम शेख पुढे म्हणाले, “आजपर्यंत शिवसेनेने आमदार, खासदार, नगराध्यक्ष, नगरसेवक घडवले. याही वेळी मतदारांनी साथ दिली. कोल्हे गटाबरोबर पाच शिवसैनिकच निवडून आले असून मोठे मताधिक्य मिळाले आहे. विशेष म्हणजे, या निवडणुकीत कुठल्याही पक्षात पाहिले तरी उभा असलेला उमेदवार शिवसैनिकच दिसत होता,” मुळात शिवसेना ही कार्यकर्ता बनवणारी फॅक्टरीच असल्याने ,”आम्ही घडवले आणि त्यांनी मढवले’ असा उपरोधिक टोला देखील त्यांनी लगावला.
तालुकाप्रमुख भरत मोरे म्हणाले, “पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व खासदार संजय राऊत यांनी आमच्यावर विश्वास ठेवून ही जबाबदारी दिली आहे. तालुक्यातील प्रत्येक सामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही काम करू. पक्षाची पुन्हा बांधणी करून आगामी निवडणुका ताकदीने लढवण्याचे नियोजन आहे.”
हा सत्कार सोहळा कोपरगाव शहर व ग्रामीण भागातील शिवसेनेच्या संघटनात्मक बळाचे दर्शन घडवणारा ठरला असून, आगामी राजकीय वाटचालीसाठी शिवसैनिकांना नवे बळ व उत्साह देणारा ठरल्याचे चित्र दिसून आले.
यावेळी मुन्नाभाई मन्सुरी, हशमभाई पटेल, निखिल कंकाळे, वैभव शेलार, कान्हा हाडा, विनय टाक, साहील परतेकर, सोहेल शेख, शक्ती हाडा, देवराज हाडा, विनीत हाडा, पारिजात सैंदाणे, चेतन हाडा, याकूब शेख, दिनेश मरसाळे,गणेश जाधव आदी शिवसैनिक उपस्थित होते.
Post Views:
9





