सावळीविहीर फाटा कोपरगाव १९१ कोटी रस्ता कामाची सुरुवात आमदार काळेंच्या पाठपुराव्याची फलश्रुती
Sawaliviheer Fata Kopargaon 191 crore road work started as a result of MLA Kalen’s follow-up
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onSat24 Dec22 , 17.00 Pm
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : विधानसभा मतदार संघातुन जात असलेल्या जुन्या अहमदनगर-मनमाड राज्यमार्ग सावळीविहिर पासून तोडण्यात येवून सावळीविहीर फाटा, कोपरगाव ते मनमाड या मार्गाला एन.एच.७५२ जी क्रमांक देण्यात आला आहे. या राष्ट्रीय महामार्गाच्या सावळीविहीर ते कोपरगाव पर्यंतच्या रस्त्याच्या कामास तातडीने सुरुवात करावी यासाठी करीत असलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून या रस्त्याच्या १९१ कोटीच्या कामास प्रत्यक्षात प्रारंभ झाला असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.
कोपरगाव मतदार संघातील सावळीविहीर फाटा ते कोपरगाव या जवळपास १० कि.मी. मार्गावर लहान-मोठे अनेक खड्डे पडल्यामुळे रस्त्याची चाळण होऊन सावळीविहीर फाटा ते कोपरगाव परिसरात अपघातांची संख्या वाढली होती. सावळीविहीर फाटा, कोपरगाव ते मनमाड या मार्गाला एन.एच.७५२ जी क्रमांक देण्यात आल्यामुळे या रस्त्याच्या कामासाठी आ.आशुतोष काळे यांनी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नामदार नितीनजी गडकरी यांची समक्ष भेट घेऊन व वेळोवेळी पाठपुरावा करून या रस्त्यासाठी निधी मिळावा यासाठी पाठपुरावा सुरु होता. त्या पाठपुराव्यातून सावळीविहीर फाटा ते कोपरगाव या रस्त्यासाठी १९१ कोटी निधी मंजूर करण्यात आला असून या रस्त्याच्या कामास प्रत्यक्षात सुरुवात करण्यात आली आहे.
या १९१ कोटी निधीतून कोपरगाव गोदावरी नदीवर नवीन मोठा पूल बांधणे, पुणतांबा फाटा चौफुली व बेट नाका याठिकाणी पब्लिक अंडरपास (भुयारी मार्ग), राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रम याठिकाणी पेड्स्टल अंडरपास (भूमिगत पादचारी मार्ग) तसेच भूमिगत चाऱ्यांचे ५ भुयारी मार्ग, ८.५ किलोमीटरच्या भूमिगत गटारी करण्यात येणार आहे. या मार्गाची रुंदी एकूण १८ मीटर व दोन्ही बाजूने ३ मीटर साईडपट्टी असलेला या मार्गाचे पूर्णपणे काँक्रीटीकरण केले जाणार असून सावळीविहीर फाटा ते साईबाबा तपोभूमी जवळील लुंबिनी बुद्धविहारापर्यंत ९.५ किलोमीटरचा हा रस्ता होणार असून या रस्त्यासाठी १६१ कोटी खर्च येणार आहे. यापुढे एस.एस.जी.एम. पर्यंत १ किलोमीटर रस्ता डांबरीकरण होणार असून या रस्त्यासाठी २.८६ कोटी खर्च येणार आहे. एकूण ९.५ किलोमीटर रस्त्यासाठी एकूण १९१ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. उर्वरित निधीतून वीजवाहिन्या स्थलांतरीत करणे व अंडरपास जवळील भूमीअधिग्रहण करण्यासाठी हा निधी खर्च करण्यात येणार आहे.
मागील अनेक वर्षापासून या रस्त्याचा प्रश्न प्रलंबित होता. रस्त्याचा प्रश्न सोडविण्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी निवडून आल्यापासून हा प्रश्न हाती घेऊन ते येणाऱ्या अडचणी सोडवून सातत्याने पाठपुरावा करीत होते. त्या पाठपुराव्याला अखेर यश मिळून या रस्त्याचे काम सुरु झाले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले असून वर्कऑर्डर मिळाल्यापासून १८ महिन्याच्या कालावधीत या रस्त्याचे काम संबंधित ठेकेदाराला पूर्ण करावे लागणार आहे. त्यामुळे मागील अनेक वर्षापासून या रस्त्याला लागलेलं ग्रहण आ. आशुतोष काळे यांच्या अथक प्रयत्नातून सुटले असून त्याबद्दल मतदार संघातील नागरिकांनी आ. आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.