अबब… कोपरगावात भटक्या कुत्र्यांची दहशत, एका वर्षात हजाराहून अधिक लोकांना चावा घेतला
Abb… The terror of stray dogs in Kopargaon, bitten more than a thousand people in one year

कोपरगाव : गेल्या वर्षभरापासून शहरात मोकाट कुत्र्यांनी धुमाकूळ घातला असून, वर्षभरात विविध भागांतील १००३ जणांना चावा घेतल्याची माहीती हाती आली आहे.
कोपरगाव ग्रामीण रुग्णालय यांचेकडील आकडेवारीनुसार २०२३ पासून ते जानेवारी २०२४ पर्यंत श्वानदंशावरील उपचार करण्यात आले आहेत. यात एक हजार ३ जणांना कुत्रे चावले, २१ जणांना मांजर चावले, १८ जणांना डुक्कर चावले, व अन्य नऊ जणांना सस्तन प्राण्यांनी चावा घेतला, या सर्व जखमी झालेल्या रुग्णांवर ग्रामीण वैद्यकीय रुग्णालयात उपचार करण्यात आल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी सांगितले.
मागील वर्षापासून शहरातील विविध वर्दळीच्या भागांत मोकाट कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात मुक्तसंचार सुरू असल्याचे पाहावयास मिळत आहे. ही भटकी कुत्री टोळक्यांनी फिरत असल्याने या भटक्या कुत्र्यांच्या त्रास शालेय विद्यार्थी, महिला, वृद्ध, व्यापारी तसेच नागरिकांना सहन करावा लागत आहे.या प्रकारामुळे लहान मुलांना घराबाहेर खेळण्यास जाऊ द्यायचे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या मोकाट कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात त्रास होत असताना पालिका प्रशासन झोपा काढते का, मुख्याधिकारी या प्रश्नाकडे गांभीयनि कधी पाहणार, असा सवाल केला जात आहे.
नगरपरिषदेकडे लेखी तक्रार करूनही ठोस उपाययोजना होत नसल्याने वर्दळीच्या भागात भटक्या कुत्र्यांच्या व मोकाट जनावरांचा वावर वाढलेला असून दिवस-रात्र ही कुत्री रस्त्यावर घोळक्याने फिरत राहतात. अनेकदा ही कुत्री पादचारी तसेच दुचाकी, चारचाकीच्या मागे जोरजोरात भुंकत पळत राहिल्याने तसेच प्रसंगी दुचाकीला अचानक आडवी आल्याने दुचाकीस्वाराचा अपघात घडून काहींना शारीरिक दुखापत झाली आहे. केवळ पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रस्त्यावर फिरण्याचीही भीती वाटत असल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिक देत आहेत.मात्र, कुंभकर्णी झोपेचे सोंग घेतलेल्या नगरपालिका प्रशासनाला कधी जाग येणार असा प्रश्न सर्वासामान्य नागरिकांना पडला आहे.
नगरपालिकेने मध्यंतरी कुत्रे पकडण्याचे टेंडर दिले होते परंतु त्याचे पुढे काय झाले हा प्रश्न सर्व गुलदस्त्यात आहे या भटक्या कुत्र्यांचे निर्भीजीकरण करावे किंवा त्यांना रेबीज प्रतिबंधक लस देण्यात यावी अशा काही सूचना नागरिकांनी केले आहेत.





