कोपरगावात जोडे मारून पडळकरांच्या वक्तव्याचा निषेध
कोपरगाव :
जेष्ठ नेते शरद पवार यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करणारा भाजपचा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला आज आमदार आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली कोपरगाव राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला.
आ. आशुतोष काळे म्हणाले , महाराष्ट्राच्या विकासाला दिशा देऊन देशात राज्याला शरद पवार यांनी प्रतिष्ठा मिळवून दिली आहे. राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय कृषिमंत्री, संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी केलेले काम अजोड आहे. त्यांच्या बाबत असे वक्तव्य करणे हे अत्यंत चुकीचे असून निंदनीय आहे. पवार यांचे सर्व पक्षीय नेत्यांसोबत अतिशय जिव्हाळ्याचे संबंध असून सर्वाना त्यांच्याबद्दल आदर आहे. त्यामुळे अशी खालच्या थरावरील टीका करणाऱ्या अल्पबुद्धी पडळकरांना जनता कधीच माफ करणार नाही.
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर कडक कारवाई करावी अशा आशयाचे निवेदन मुख्यमंत्र्यांना तहसीलदार योगेश चंद्रे यांच्यामार्फत दिले आहे.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, शहराध्यक्ष सुनील गंगुले, युवक अध्यक्ष नवाज कुरेशी, महिला अध्यक्षा सौ.प्रतिभा शिलेदार, युवती अध्यक्षा सौ.माधवी वाकचौरे, गटनेते विरेन बोरावके, सर्व सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो ओळ- जेष्ठ नेते शरद पवार यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या भाजप आमदार पडळकर यांचा निषेध करतांना आमदार आशुतोष काळे समवेत राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते.