आ. आशुतोष काळेंनी मंजूर बंधाऱ्याच्या दुरुस्तीला दिलेल्या निधीची परतफेड २० तारखेला करून द्या-राजेद्र (बापू)जाधव
MLA Ashutosh Kale should repay the funds given for the repair of the approved dam on the 20th – Rajendra (Bapu) Jadhav
कोपरगाव -तालुक्याच्या पश्चिम भागातील अत्यंत जिव्हाळ्याच्या असलेल्या मंजूर बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवारयांच्याकडून आ.आशुतोष काळे यांनी ४१.५१ कोटी निधी आणला आहे. निवडणुका आटोपताच या बंधाऱ्याच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात पण होणार आहे. पण तत्पूर्वी आ.आशुतोष काळेंनी दिलेल्या निधीची परतफेड २० तारखेला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांना भरभरून मतदानातून करून द्या असे आवाहन महानंदा दुध संघाचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र (बापू)जाधव यांनी केले आहे.
कोपरगाव मतदार संघातील मायगाव देवी येथे महायुतीचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आ.आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या घोंगडी बैठकीत राजेंद्र (बापू) जाधव बोलत होते. ते म्हणाले की, आपला कोपरगाव मतदार संघ हा अवर्षणग्रस्त असल्यामुळे आपल्याकडे दरवर्षी पाऊस कमीच पडतो. गोदावरी कालवे पिण्याची आणि सिंचनाची गरज पूर्ण करीत असले तरी सातत्याने वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे पिण्याच्या पाण्याचे आरक्षण वाढत जावून सिंचनाचे पाणी कमी झाले. आपल्या कोपरगाव तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीवर के.टी.वेअर अर्थात कोल्हापूर टाईप बंधाऱ्यांची साखळी आहे. त्यामुळे गोदाकाठ समृद्ध होवून भूजल पातळी वाढण्यास देखील मोठी मदत झाली. त्यामुळे गोदातीरी असलेल्या गावांच्या शेती व शेतकऱ्यांचे भवितव्य या के.टी. वेअरमुळे प्रकाशमान झाले.मी पण शेतकरी असल्यामुळे याची मला पण जाणीव असून माझ्या देखील शेतीला माहेगाव देशमुखच्या के.टी.वेअरचा फायदा होतो त्यामुळे गोदाकाठच्या शेतकऱ्यांसाठी या सर्व के.टी. वेअरचे महत्व किती अनमोल आहे हे मी सांगण्याची गरज नाही.
नैसर्गिक आपत्तीमुळे आपला मंजूर बंधारा तीन वेळा वाहून गेल्यामुळे हजारो हेक्टर शेतीचे नुकसान तर झालेच त्याचबरोबर मंजूर, चास नळी, हंडेवाडी,धामोरी, मोर्वीस, मायगाव देवी, कारवाडी आदी गावातील शेती व शेतकऱ्यांचे भवितव्य पण अंधकारमय झाले होते. भू-गर्भातील पाणी पातळी देखील मोठ्या प्रमाणात खालावली जावून शेती सिंचनाचा सुद्धा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे या बंधाऱ्याच्या लाभक्षेत्राच्या गावातील शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या असतांना २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आ.आशुतोष काळे यांनी मंजूर बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी निधी देण्याचा शब्द दिला होता.दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न करून अखेर या मंजूर बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी ४१.५१ कोटी निधी खेचून आणलाच. त्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांना पहाटे उठवायला आ.आशुतोष काळे आले असल्याचे त्यांनी जाहीर सभेत सांगितले होते. यावरून मंजूर बंधाऱ्याच्या दुरुस्तीचा दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी त्यांना किती प्रयत्न करावे लागले याची कल्पना येते. त्यामुळे त्यांच्या ऋणातून उतराई होण्याची संधी उपलब्ध झाली आहे. येत्या २० तारखेला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आ.आशुतोष काळे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दोनच दिवसांपूर्वी कोपरगाव येथे सांगितले आहे, जास्त मतांनी निवडून द्या, जास्त निधी देतो आणि मोठी जबबादारी पण देतो.
त्यामुळे मोठी जबाबदारी मतदारांनी समजून घ्यावी. केटी वेअरचे बॅरीजेस कम पुलाध्ये रुपांतर करून दळणवळणाला अधिक गती मिळवून देण्याची आ.आशुतोष काळे यांची संकल्पना आहे.मागील पाच वर्षात त्यांनी दिलेले विकासाचे बहुतांश शब्द पूर्ण केले असून पुढील काळात उर्वरित शब्द देखील ते पूर्ण करणार आहेत. मंजूर बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम पूर्ण होताच मंजूर-मायगाव देवी ही दोन्ही गावे पुन्हा एकमेकांना जोडली जावून जाणार आहेत. तसेच मंजूर बंधाऱ्याचे बॅरीजेस कम पुलाध्ये रुपांतर झाल्यास दळणवळण वाढून अनेक गावांचा विकास होण्यास मदत होणार आहे. याचा मंजूर, चास नळी, हंडेवाडी,धामोरी, मोर्वीस, मायगाव देवी, कारवाडी आदी गावातील सुजाण मतदारांनी विचार करून आ.आशुतोष काळे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहन महानंदाचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र (बापू) जाधव यांनी केले. मंजूर बंधाऱ्याची दुरुस्ती होणार असल्यामुळे अडचणी दूर होणार असून मंजूर, चास नळी, हंडेवाडी,धामोरी, मोर्वीस, मायगाव देवी, कारवाडी आदी गावांप्रमाणेच माहेगाव देशमुख, मळेगाव थडी, कोळगाव थडी, सुरेगाव, सांगवी भुसार वेळापूर आदी गावातील शेतकऱ्यांच्या देखील अडचणी दूर होणार आहे .- राजेंद्र (बापू) जाधव (महानंदा माजी उपाध्यक्ष)